Tuesday, June 2, 2020

न्यूझीलंड,कोरोना,नागरीक आणि जेसिंडा आर्डर्न...

न्यूझीलंड,कोरोना,नागरीक आणि जेसिंडा आर्डर्न...
न्यूझीलंड देशाचा राष्ट्रध्वज
     न्यूझीलंड, प्रशांत महासागराने चौफेर वेढलेला एक बेटांचा देश. काळ्या जर्सी मध्ये मैदानावर अतिशय शांतपणे वावर ठेवणाऱ्या आणि आपल्या खिलाडुव्रत्तीने जगाची मने जिंकलेल्या क्रिकेट संघाचा हा देश. शांत आणि संयमीपणा हा बहूतेक साऱ्या न्यूझीलंड देशाचाच स्वभाव असावा. एरवी क्रिकेट, फुटबॉल आणि रग्बी या खेळांमुळे आणि जागतिक बाजारपेठेत आपल्या दर्जेदार दूध उत्पादनांनी वेगळी ओळख केलेला न्यूझीलंड आता वेगळ्याच कारणाने चर्चेत आहे.
     जगभर कोरोना विषाणूमुळे होणाऱ्या कोविड१९ या रोगाने थैमान घातले असताना न्यूझीलंडने मात्र या रोगाला हरवून जगासमोर शिस्त आणि नियोजनाच एक वेगळ उदाहरण निर्माण केलयं. न्यूझीलंडचे आरोग्य मंत्रालय त्यांच्या वेबसाईटला दररोज कोरोनाविषयक आकडेवारीचा अहवाल माध्यमांसाठी प्रकाशित करते. आज २ जून २०२० रोजी त्यांनी प्रकाशित केलेल्या या दैनिक अहवालामधील आकडेवारीवर आपण नजर फिरवली तर आपल्या लक्षात येईल की 

 • गेल्या सलग अकरा दिवसांमध्ये न्यूझीलंडमध्ये एकही नवीन कोविड१९ चा रुग्ण आढळला नाही.
 • न्यूझीलंड मध्ये आत्तापर्यंत एकूण ११५४ कोविड१९ चे निश्चित रुग्ण आढळून आले होते.
 • न्यूझीलंड मध्ये आत्तापर्यंत एकूण निश्चित आणि अंदाजित असे १५०४ कोविड१९ चे रुग्ण आढळून आले होते.
 • एकूण १५०४ रूग्णांपैकी १४८१ रुग्ण उपचारानंतर बरे होऊन घरी गेले आहेत, तर २२ रुग्णांचा उपचारादरम्यान म्रुत्यु झाला असून सध्या संपूर्ण न्यूझीलंडमध्ये फक्त एक कोविड१९ चा रुग्ण उपचार घेत आहे.
 • कालपर्यंत न्यूझीलंड मध्ये एकूण २८२,२६३ नागरीकांच्या कोविड १९ चाचण्या पूर्ण झालेल्या आहेत.
    न्यूझीलंडने मिळविलेल्या या अभूतपूर्व यशाची कारणमीमांसा करीत असताना असं लक्षात येत की न्यूझीलंडचे भौगोलिक स्थान, त्या देशाची एकूण लोकसंख्या, तिथल्या नेतृत्वाने घेतलेले निर्णय आणि त्याला नागरीकांनी शहाणपणाने दिलेला प्रतिसाद या गोष्टींमुळे न्यूझीलंड कोरोनाचा प्रादुर्भाव रोखू शकला.
न्यूझीलंड देशाचा भौगोलिक नकाशा
     चारही बाजूंनी प्रशांत महासागराने वेढलेला न्यूझीलंड ऑस्ट्रेलियापासून पूर्वेला १५०० कि.मी. अंतरावर आहे. खरतर याच्या या दुर्बल भौगोलिक स्थानामुळे जगाने शोधलेला मानवी वस्ती होऊ शकणारा हा प्रुथ्वीवरचा शेवटचा भुखंड मानला जातो. तर या देशात कोविड१९ चा पहिला रुग्ण २६ फेब्रुवारीला सापडला. हा रुग्ण सापडताच न्यूझीलंडने इराण आणि चीनवरून येणाऱ्या प्रवाशांवर देशात प्रवेशाला बंदी घातली. १९ मार्च ला न्यूझीलंडने देशाच्या सीमा पुर्णपणे बंद केल्या. खरतर न्यूझीलंडला कुठल्याच देशाची भुसीमा लागत नसल्याने त्यांना देशाच्या सीमा बंद करताना फक्त विमानसेवा आणि जहाजसेवा बंद करावी लागली. तोपर्यंत परदेश प्रवास करून येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला न्यूझीलंडमध्ये आल्याबरोबर क्वारांटाईन करण्यात येत होते.
QR Code स्कॅन करताना शारीरिक अंतर पाळणारे नगरीक व कर्मचारी
    २६ मार्चला म्हणजे पहिला रुग्ण आढळल्यानंतर एक महिन्याने न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा आर्डर्न यांनी लॉकडाऊन चा निर्णय घेतला. न्यूझीलंडमध्ये आणीबाणी लागू करताना ती वेगवेगळ्या पाच अलर्ट लेवल वरती लागू केली जाते. देशात लॉकडाऊन करत असताना न्यूझीलंडच्या पंतप्रधानांनी अलर्ट लेवल चार लागू केला. यावरून इथल्या नागरिकांना परिस्थितीचे गांभीर्य लक्षात आले असणार यात शंकाच नाही. लॉकडाऊन करण्यापूर्वी इथल्या सरकारने नागरिकांना आपापल्या घरी जाण्यासाठी आणि अत्यावश्यक वस्तूंची खरेदी करण्यासाठी ४८ तास म्हणजेच दोन दिवसांचा अवधी दिला होता. या दोन दिवसांमध्येदेखील खरेदी करीत असताना किंवा प्रवास करीत असताना इथला प्रत्येक नागरीक आरोग्य विभागाच्या गाईडलाईन्स नुसार २ मीटरचे अंतर कटाक्षाने पाळताना दिसला. सरकारवरचा लोकांचा विश्वास आणि आपल्या लोकांच्या शहाणपणावरचा सरकारचा विश्वास यातून अधोरेखित होतो. नाहीतर लॉकडाऊन करण्यापूर्वी किंवा केल्यानंतर असा अवधी देताच आमच्या देशात खरेदीला कशा झुंडी पडल्या हे वेगळ सांगायची गरज नाही. ४ आठवड्यांचा इथला लॉकडाऊन इतका शिस्तबद्ध पद्धतीने इथल्या नागरीकांनी पाळला की हा देश कोविड १९ चे सामाजिक संक्रमण टाळण्यात यशस्वी तर झालाच पण लॉकडाऊन पूर्वी वाढणारे रुग्णांचे आकडे या देशाने नुसते कमी केले नाहीत तर ते थांबवले. लॉकडाऊनदरम्यान या देशात संध्याकाळी पार्कमध्ये फिरायला नागरिकांना परवाणगी होती. संध्याकाळच्या वेळी पार्कमध्ये फिरणारे नागरीकदेखील २ मीटरचे शारीरिक अंतर इतक्या कटाक्षाने पाळत होते की हे निव्वळ कौतुकास्पद मानावे लागेल.
न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा आर्डर्न
     जेमतेम ४५ लाखांच्या जवळपास लोकसंख्या असलेल्या या देशाचा मानव विकास निर्देशांकात जगात पहिल्या दहा देशांमध्ये नंबर लागतो. यातुनच हा देश आणि इथली सरकारे लोकांचे शिक्षण, आरोग्य आणि राहणीमानाची कशी काळजी घेत असतील याचा दाखला मिळतो. या देशात झोपडपट्टी आणि स्थलांतरित मजूरांसारखे गंभीर प्रश्न नसतीलही कदाचित पण म्हणून इथल्या नागरिकांच्या शिस्तीकडे आणि संयमाकडे दुर्लक्ष करून अजिबात चालणार नाही. राहिला प्रश्न इथल्या नेतृत्वाचा तर जेसिंडा आर्डर्न हि ३९ वर्षाची महिला पंतप्रधान म्हणून या कोविडविरोधी मोहिमेचे निर्णायक नेतृत्व करीत होती. वयाच्या ३७ व्या वर्षी एखाद्या पंतप्रधानपदी विराजमान होणारी जेसिंडा जगतील सर्वात तरूण महिला तर ठरलीच पण सोबतच पंतप्रधानपदी काम करीत असताना मुलाला जन्म देणारीही जेसिंडा जगातली एकमेव महिला होती. संसदीय कामकाज चालू असताना देखील संसदेत कामकाजादरम्यान आपल्या मुलाला स्तनपान करणारी जेसिंडा जगानं पाहिलीयं. कदाचित भारतीयांनी देखील त्यावेळी तिला झाशीच्या राणीची उपमा देऊन तिच्या नेतृत्वाचं आणि मातृत्वाचं कौतुक केल असेल. तर कोविडविरोधी लढा देत असताना हि जेसिंडा दररोज पत्रकारांसमोर येत होती. रोजच्या परिस्थितीचा आढावा मांडत होती. पत्रकारांच्या प्रत्येक प्रश्नांना उत्तरे देत होती. हसून साऱ्या देशबांधवांना विश्वास देत होती. कोविडविरोधात लढण्याचाच नव्हे तर कोविडला संपविण्याचा निर्धार ती वारंवार बोलून दाखवत होती. आणि म्हणूनच कदाचित प्रत्येक ठिकाणी न्यूझीलंडवासी नागरीक शिस्तीच, नियमांचे पालन करून जगासमोर नवा आदर्श घालून देत होते. ख्राईस्टचर्च येथे मागच्या वर्षी झालेल्या दहशतवादी हल्ल्यातून देशाला सावरतानादेखील जेसिंडा  मुस्लीम समाजाला विश्वासात घेण्यासाठी बुरखा घालून त्यांच्यात मिसळली होती. एक धैर्यवान स्त्री कशाप्रकारे आपल्या नेतृत्वाने एखादा देश संकटाच्या खाईतून बाहेर काढू शकते याच मूर्तीमंत उदाहरण म्हणजे जेसिंडा आर्डर्न होय. कोविडविरोधी लढा यशस्वी होत असताना जेसिंडा तिच्या सगळ्या निर्णयांच श्रेय तिच्या सल्लागार सहकाऱ्यांना द्यायलाही विसरत नाही किंवा कुचरतदेखील नाही. 
    कमी लोकसंख्या, उत्तम मानवविकास, आणि भौगोलिक स्थान ही न्यूझीलंडची या लढ्यातील बलस्थाने होती हे खरेच पण नागरिकांचा प्रतिसाद, नेतृत्वावरचा विश्वास या गोष्टींनी हा लढा पुर्णत्वाला नेला हे नक्की.  न्यूझीलंडचे हे यश जगासाठी आशादायक आहे. कोविडविरोधी लढताना शिस्तीचा मार्ग दाखविणारे आहे. जग नक्कीच सावरेल. एकेक देश यातून बाहेर पडेल. कोविडनंतर प्रत्येक देश औद्योगिकीकरण आणि भांडवलशाहीच्या स्पर्धेतून वेगळा विचार करून स्वताच्या मानव विकासाकडे लक्ष देईल. अन्यथा...?? परिणाम आपण पाहातोच आहे.

आकडेवारी स्त्रोत- https://covid19.govt.nz (न्यूझीलंडचे कोविडविषयक शासकीय संकेतस्थळ.)
छायाचित्रे स्त्रोत- इंटरनेट
@अमित जालिंदर शिंदे.

10 comments:

 1. अप्रतिम माहिती

  ReplyDelete
 2. उत्कृष्ट लेखन अमितराव

  ReplyDelete
 3. valuable information
  keep it up Amit

  ReplyDelete
 4. अभ्यासपूर्ण आणि भारतीयांना विचार करायला लावणारा लेख.. खूप छान आहे.

  ReplyDelete
 5. उत्तम लेखन दादा..

  ReplyDelete
 6. खूपच छान👌👌👌

  ReplyDelete
 7. खूप छान लेख keep going sir��

  ReplyDelete

न्यूझीलंड,कोरोना,नागरीक आणि जेसिंडा आर्डर्न... न्यूझीलंड देशाचा राष्ट्रध्वज      न्यूझीलंड, प्रशांत महासागराने चौफेर वेढलेला एक बे...