Tuesday, June 2, 2020

न्यूझीलंड,कोरोना,नागरीक आणि जेसिंडा आर्डर्न...

न्यूझीलंड,कोरोना,नागरीक आणि जेसिंडा आर्डर्न...
न्यूझीलंड देशाचा राष्ट्रध्वज
     न्यूझीलंड, प्रशांत महासागराने चौफेर वेढलेला एक बेटांचा देश. काळ्या जर्सी मध्ये मैदानावर अतिशय शांतपणे वावर ठेवणाऱ्या आणि आपल्या खिलाडुव्रत्तीने जगाची मने जिंकलेल्या क्रिकेट संघाचा हा देश. शांत आणि संयमीपणा हा बहूतेक साऱ्या न्यूझीलंड देशाचाच स्वभाव असावा. एरवी क्रिकेट, फुटबॉल आणि रग्बी या खेळांमुळे आणि जागतिक बाजारपेठेत आपल्या दर्जेदार दूध उत्पादनांनी वेगळी ओळख केलेला न्यूझीलंड आता वेगळ्याच कारणाने चर्चेत आहे.
     जगभर कोरोना विषाणूमुळे होणाऱ्या कोविड१९ या रोगाने थैमान घातले असताना न्यूझीलंडने मात्र या रोगाला हरवून जगासमोर शिस्त आणि नियोजनाच एक वेगळ उदाहरण निर्माण केलयं. न्यूझीलंडचे आरोग्य मंत्रालय त्यांच्या वेबसाईटला दररोज कोरोनाविषयक आकडेवारीचा अहवाल माध्यमांसाठी प्रकाशित करते. आज २ जून २०२० रोजी त्यांनी प्रकाशित केलेल्या या दैनिक अहवालामधील आकडेवारीवर आपण नजर फिरवली तर आपल्या लक्षात येईल की 

  • गेल्या सलग अकरा दिवसांमध्ये न्यूझीलंडमध्ये एकही नवीन कोविड१९ चा रुग्ण आढळला नाही.
  • न्यूझीलंड मध्ये आत्तापर्यंत एकूण ११५४ कोविड१९ चे निश्चित रुग्ण आढळून आले होते.
  • न्यूझीलंड मध्ये आत्तापर्यंत एकूण निश्चित आणि अंदाजित असे १५०४ कोविड१९ चे रुग्ण आढळून आले होते.
  • एकूण १५०४ रूग्णांपैकी १४८१ रुग्ण उपचारानंतर बरे होऊन घरी गेले आहेत, तर २२ रुग्णांचा उपचारादरम्यान म्रुत्यु झाला असून सध्या संपूर्ण न्यूझीलंडमध्ये फक्त एक कोविड१९ चा रुग्ण उपचार घेत आहे.
  • कालपर्यंत न्यूझीलंड मध्ये एकूण २८२,२६३ नागरीकांच्या कोविड १९ चाचण्या पूर्ण झालेल्या आहेत.
    न्यूझीलंडने मिळविलेल्या या अभूतपूर्व यशाची कारणमीमांसा करीत असताना असं लक्षात येत की न्यूझीलंडचे भौगोलिक स्थान, त्या देशाची एकूण लोकसंख्या, तिथल्या नेतृत्वाने घेतलेले निर्णय आणि त्याला नागरीकांनी शहाणपणाने दिलेला प्रतिसाद या गोष्टींमुळे न्यूझीलंड कोरोनाचा प्रादुर्भाव रोखू शकला.
न्यूझीलंड देशाचा भौगोलिक नकाशा
     चारही बाजूंनी प्रशांत महासागराने वेढलेला न्यूझीलंड ऑस्ट्रेलियापासून पूर्वेला १५०० कि.मी. अंतरावर आहे. खरतर याच्या या दुर्बल भौगोलिक स्थानामुळे जगाने शोधलेला मानवी वस्ती होऊ शकणारा हा प्रुथ्वीवरचा शेवटचा भुखंड मानला जातो. तर या देशात कोविड१९ चा पहिला रुग्ण २६ फेब्रुवारीला सापडला. हा रुग्ण सापडताच न्यूझीलंडने इराण आणि चीनवरून येणाऱ्या प्रवाशांवर देशात प्रवेशाला बंदी घातली. १९ मार्च ला न्यूझीलंडने देशाच्या सीमा पुर्णपणे बंद केल्या. खरतर न्यूझीलंडला कुठल्याच देशाची भुसीमा लागत नसल्याने त्यांना देशाच्या सीमा बंद करताना फक्त विमानसेवा आणि जहाजसेवा बंद करावी लागली. तोपर्यंत परदेश प्रवास करून येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला न्यूझीलंडमध्ये आल्याबरोबर क्वारांटाईन करण्यात येत होते.
QR Code स्कॅन करताना शारीरिक अंतर पाळणारे नगरीक व कर्मचारी
    २६ मार्चला म्हणजे पहिला रुग्ण आढळल्यानंतर एक महिन्याने न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा आर्डर्न यांनी लॉकडाऊन चा निर्णय घेतला. न्यूझीलंडमध्ये आणीबाणी लागू करताना ती वेगवेगळ्या पाच अलर्ट लेवल वरती लागू केली जाते. देशात लॉकडाऊन करत असताना न्यूझीलंडच्या पंतप्रधानांनी अलर्ट लेवल चार लागू केला. यावरून इथल्या नागरिकांना परिस्थितीचे गांभीर्य लक्षात आले असणार यात शंकाच नाही. लॉकडाऊन करण्यापूर्वी इथल्या सरकारने नागरिकांना आपापल्या घरी जाण्यासाठी आणि अत्यावश्यक वस्तूंची खरेदी करण्यासाठी ४८ तास म्हणजेच दोन दिवसांचा अवधी दिला होता. या दोन दिवसांमध्येदेखील खरेदी करीत असताना किंवा प्रवास करीत असताना इथला प्रत्येक नागरीक आरोग्य विभागाच्या गाईडलाईन्स नुसार २ मीटरचे अंतर कटाक्षाने पाळताना दिसला. सरकारवरचा लोकांचा विश्वास आणि आपल्या लोकांच्या शहाणपणावरचा सरकारचा विश्वास यातून अधोरेखित होतो. नाहीतर लॉकडाऊन करण्यापूर्वी किंवा केल्यानंतर असा अवधी देताच आमच्या देशात खरेदीला कशा झुंडी पडल्या हे वेगळ सांगायची गरज नाही. ४ आठवड्यांचा इथला लॉकडाऊन इतका शिस्तबद्ध पद्धतीने इथल्या नागरीकांनी पाळला की हा देश कोविड १९ चे सामाजिक संक्रमण टाळण्यात यशस्वी तर झालाच पण लॉकडाऊन पूर्वी वाढणारे रुग्णांचे आकडे या देशाने नुसते कमी केले नाहीत तर ते थांबवले. लॉकडाऊनदरम्यान या देशात संध्याकाळी पार्कमध्ये फिरायला नागरिकांना परवाणगी होती. संध्याकाळच्या वेळी पार्कमध्ये फिरणारे नागरीकदेखील २ मीटरचे शारीरिक अंतर इतक्या कटाक्षाने पाळत होते की हे निव्वळ कौतुकास्पद मानावे लागेल.
न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा आर्डर्न
     जेमतेम ४५ लाखांच्या जवळपास लोकसंख्या असलेल्या या देशाचा मानव विकास निर्देशांकात जगात पहिल्या दहा देशांमध्ये नंबर लागतो. यातुनच हा देश आणि इथली सरकारे लोकांचे शिक्षण, आरोग्य आणि राहणीमानाची कशी काळजी घेत असतील याचा दाखला मिळतो. या देशात झोपडपट्टी आणि स्थलांतरित मजूरांसारखे गंभीर प्रश्न नसतीलही कदाचित पण म्हणून इथल्या नागरिकांच्या शिस्तीकडे आणि संयमाकडे दुर्लक्ष करून अजिबात चालणार नाही. राहिला प्रश्न इथल्या नेतृत्वाचा तर जेसिंडा आर्डर्न हि ३९ वर्षाची महिला पंतप्रधान म्हणून या कोविडविरोधी मोहिमेचे निर्णायक नेतृत्व करीत होती. वयाच्या ३७ व्या वर्षी एखाद्या पंतप्रधानपदी विराजमान होणारी जेसिंडा जगतील सर्वात तरूण महिला तर ठरलीच पण सोबतच पंतप्रधानपदी काम करीत असताना मुलाला जन्म देणारीही जेसिंडा जगातली एकमेव महिला होती. संसदीय कामकाज चालू असताना देखील संसदेत कामकाजादरम्यान आपल्या मुलाला स्तनपान करणारी जेसिंडा जगानं पाहिलीयं. कदाचित भारतीयांनी देखील त्यावेळी तिला झाशीच्या राणीची उपमा देऊन तिच्या नेतृत्वाचं आणि मातृत्वाचं कौतुक केल असेल. तर कोविडविरोधी लढा देत असताना हि जेसिंडा दररोज पत्रकारांसमोर येत होती. रोजच्या परिस्थितीचा आढावा मांडत होती. पत्रकारांच्या प्रत्येक प्रश्नांना उत्तरे देत होती. हसून साऱ्या देशबांधवांना विश्वास देत होती. कोविडविरोधात लढण्याचाच नव्हे तर कोविडला संपविण्याचा निर्धार ती वारंवार बोलून दाखवत होती. आणि म्हणूनच कदाचित प्रत्येक ठिकाणी न्यूझीलंडवासी नागरीक शिस्तीच, नियमांचे पालन करून जगासमोर नवा आदर्श घालून देत होते. ख्राईस्टचर्च येथे मागच्या वर्षी झालेल्या दहशतवादी हल्ल्यातून देशाला सावरतानादेखील जेसिंडा  मुस्लीम समाजाला विश्वासात घेण्यासाठी बुरखा घालून त्यांच्यात मिसळली होती. एक धैर्यवान स्त्री कशाप्रकारे आपल्या नेतृत्वाने एखादा देश संकटाच्या खाईतून बाहेर काढू शकते याच मूर्तीमंत उदाहरण म्हणजे जेसिंडा आर्डर्न होय. कोविडविरोधी लढा यशस्वी होत असताना जेसिंडा तिच्या सगळ्या निर्णयांच श्रेय तिच्या सल्लागार सहकाऱ्यांना द्यायलाही विसरत नाही किंवा कुचरतदेखील नाही. 
    कमी लोकसंख्या, उत्तम मानवविकास, आणि भौगोलिक स्थान ही न्यूझीलंडची या लढ्यातील बलस्थाने होती हे खरेच पण नागरिकांचा प्रतिसाद, नेतृत्वावरचा विश्वास या गोष्टींनी हा लढा पुर्णत्वाला नेला हे नक्की.  न्यूझीलंडचे हे यश जगासाठी आशादायक आहे. कोविडविरोधी लढताना शिस्तीचा मार्ग दाखविणारे आहे. जग नक्कीच सावरेल. एकेक देश यातून बाहेर पडेल. कोविडनंतर प्रत्येक देश औद्योगिकीकरण आणि भांडवलशाहीच्या स्पर्धेतून वेगळा विचार करून स्वताच्या मानव विकासाकडे लक्ष देईल. अन्यथा...?? परिणाम आपण पाहातोच आहे.

आकडेवारी स्त्रोत- https://covid19.govt.nz (न्यूझीलंडचे कोविडविषयक शासकीय संकेतस्थळ.)
छायाचित्रे स्त्रोत- इंटरनेट
@अमित जालिंदर शिंदे.

Wednesday, November 27, 2019

कळसुली: निसर्गरम्य कोकणी खेडं

      कळसुली: निसर्गरम्य कोकणी खेडं
     अडीच वर्षापूर्वी म्हणजे दी-१७/०६/२०१७ रोजी आमच्या बी.एस्सी. (कृषी) च्या शिक्षणाचा भाग म्हणून मी आणि माझे इतर दहा सहकारी अशी आमची ११ जणांची टीम मु. पो. कळसुली, ता- कणकवली, जि- सिंधुदुर्ग या गावामध्ये २० आठवड्यांचा ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रम  पुर्ण करण्यासाठी दाखल झालो. ३ वर्षे महाविद्यालयात शेतीबद्दल जे काही शिकलो ते शेतकऱ्यांच्या बांधावर प्रायोगिक तत्त्वावर प्रत्यक्षात उतरवून अनुभवण्याचा, अनोळखी लोकांच्या गावात राहण्याची, जेवणाची व्यवस्था करण्यापासून ते शेतीची विविध प्रात्यक्षिके घेणे, तज्ञ व्यक्तिंचे शेतीउपयोगी मार्गदर्शनाचे कार्यक्रम घेण्यापर्यंत आणि एकंदरीतच स्वताच्या हिंमतीवर जगायला शिकविणारा हा २० आठवड्यांचा ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रम. शिवराज देवकर या सहकाऱ्याच्या नेतृत्वात आणि आमच्या महाविद्यालयाच्या प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला हा कार्यक्रम पार पाडायचा होता. सुरुवातील आम्ही आमच्या इच्छेविरुद्ध मिळालेल गाव म्हणून नाराज होतो पण नंतर इथल्या लोकांनी आम्हाला दिलेल्या अभूतपूर्व प्रतिसादामुळे आम्ही या गावात चांगलेच रमलो. 
  कळसुली; शिवछत्रपतींचा अविष्कार असलेल्या सिंधुदुर्ग किल्ल्याच्या नावाने तयार झालेल्या आणि १९८१ साली रत्नागिरीपासून वेगळ्या झालेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली शहरापासून अवघ्या १५ कि.मी. अंतरावर कळसुली हे खेड वसलेलं आहे. शांत माणसांच्या या सुंदर गावात जाण्यासाठी कणकवली बसस्थानकावरून दिवसभर एस.टी. बस उपलब्ध असतात. आम्ही या कळसुली गावात घालवलेल्या ५-६ महिन्यांच्या अनुभवांवरून असं ठामपणे सांगू शकतो की 'नारळी-पोफळीच्या, आंब्या-काजूंच्या बागांमध्ये रमलेला इथला संयमी कोकणी माणूस त्यांच्याकडे येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याचं "येवा कळसुली आपलीच असा" म्हणत नुसत स्वागतच करीत नाही तर सोबतच "अतिथी देवो भव" या मराठी संस्कृतीप्रमाणे आदरातिथ्य आणि पाहुणचारदेखील करतो.
     २३७१ हे. क्षेत्रफळ असलेल्या कळसुलीमध्ये कमीत कमी ५६६ हे क्षेत्रामध्ये दरवर्षी खरीपामध्ये मोठ्या जोमाने भातपीकाची लागवड केली जाते, आणि त्यातून दरवर्षी विक्रमी उत्पादनदेखील घेतले जाते.म्हणूनच कळसुली हे गाव कणकवली तालुक्यातील भाताचे कोठार म्हणून ओळखले जाते. भाताचे उत्पादन अजून वाढविण्यासाठी सध्या कळसुली ग्रामपंचायत गावातील काही प्रगतीशील शेतकऱ्यांच्या शेतामध्ये कृषी सहाय्यकांच्या मार्गदर्शनाने डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या भाताच्या वेगवेगळ्या जाती आणि भातलागवडीच्या चारसुत्री, श्री यांसारख्या विकसित पद्धतींची प्रात्यक्षिके घेत आहे. कळसुली गावातील सेवानिवृत्त विस्तार अधिकारी श्री. भास्कर सावंत आम्हाला सांगत होते की," काही वर्षांपूर्वी गावात भातउत्पादनाच्या स्पर्धा भरवल्या जायच्या. भाताचे विक्रमी उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना यथोचित सत्काराबरोबरच आकर्षक बक्षीसे दिली जायची. त्याकाळी शेतकऱ्यांना दीलेल्या या प्रोत्साहनामुळेच कळसुलीतील भातशेतीमध्ये आमुलाग्र बदल झाले आणि भातपीक उत्पादन वाढीस चालना मिळाली.
      शेतीची प्रचंड आवड असणारे आणि आंब्याची खुंटी कलमे बांधण्यात तरबेज असलेले शेतीमित्र श्री तेली सर सांगतात की कळसुलीमध्ये आजही पूर्वापार चालत आलेली 'बुचडी' ही भातलागवडीची पद्धत बरेच शेतकरी वापरतात. त्यांच्या या पद्धतीनुसार उन्हाळ्यामध्ये शेताला शेणखत घालत असताना त्या शेणामध्ये भाताच्या बिया मिसळून घालतात. पाऊस पडला की या बिया उगवून येतात. या पद्धतीमुळे शेताला खताचा पुरवठा तर होतोच पण शेतकऱ्यांच्या वेळेची आणि कष्टाची मोठ्या प्रमाणात बचतही होते.
     श्री. प्रविण दळवी यांनी आणि त्यांच्यासारख्या काही उत्साही तरुण शेतकऱ्यांनी सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या कळसुलीच्या डोंगराउतारावर काजू आणि बांबूंची लागवड केली आहे. अशा तरुण उत्साही शेतकऱ्यांनीच कळसुलीच्या फळबाग शेतीची धुरा आपल्या खांद्यावर समर्थपणे सांभाळली आहे. शेती करायची तर कष्ट आणि उत्साहाबरोबरच अनुभवाची शिदोरीही असावी लागते. गावातील जेष्ट मंडळी आपल्या अनुभवाचा परिपूर्ण वापर करून तरुणांना वेळोवेळी मार्गदर्शन करीत असतात आणि याच कारणाने गावातील प्रत्येक कुटुंबातील तरुण आणि जेष्ट या दोन पिढ्यांमध्ये अतिशय खेळीमेळीचे वातावरण दीसून येते.
     कळसुली आणि भागातील शेतीच्या विकासासाठी आणि उन्हाळ्यातील पाण्याचा तुटवडा कमी करण्यासाठी परिसरातील तीन मोठ्या ओढ्यांवर धरणाची निर्मिती झाली आहे. हे कळसुली धरण म्हणजे गावाच्या माथ्यावरचा सुवर्णमुकूटच होय. याच धरणामुळे परिसरात सध्या ऊसलागवडीखालील क्षेत्राची वाढ होत असून इथले काही तरुण पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करून स्वतःबरोबरच इथल्या शेतीलादेखील सुशिक्षित करू पाहात आहेत. त्यांच्या या प्रयत्नांना यश मिळाल्यास कळसुलीच्या शेतीला सोन्याचे दीवस यायला आणि शेतकरी परत राजा व्हायला नक्कीच जास्त दीवस लागणार नाहीत.
     गावातील लोकांनी फक्त शेतीकडेच लक्ष दिले असे नाही. या लोकांनी इथली शेती सम्रुद्ध करण्याकडे तर लक्ष दीलंच आहे आणि सोबतच शिक्षणाकडेदेखील लक्ष दीले आहे. म्हणूनच ३१०८ लोकसंख्येच्या या गावामध्ये ७ प्राथमिक शाळा, १ हायस्कूल आणि ज्यू. कॉलेजदेखील आहे. आज हे गाव १००% साक्षर असून गावातील बरेचसे लोक सरकारी नोकरीत आहेत. पंतप्रधानांच्या स्वच्छ भारत अभियानाला सर्वतोपरी प्रतिसाद देत गावकऱ्यांनी गावाला आरोग्याच्या बाबतीतदेखील साक्षर बणविण्यात यश संपादन केलेले आहे. नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी गावात प्राथमिक आरोग्य केंद्र आणि केंद्र शासणाचे आरोग्य उपकेंद्रसुद्धा आहे. माणसांच्या आरोग्याबरोबरच जनावरांचे आरोग्य व्यवस्थित ठेवण्यासाठी गावात शासकीय पशुवैद्यकीय दवाखाना सुरू आहे.
     गावातील लोकांच्यामध्ये सामाजिक सलोका, एकीची भावना टीकून राहावी तसेच मराठी संस्कृतीचा ठेवा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे देण्यासाठी गावातील काही आध्यात्मिक मंडळींनी आवर्जून मंदिरांमध्ये ग्रंथवाचनाचे कार्यक्रम सुरू केले आहेत. वेगवेगळ्या ग्रंथांच्या वाचनातून रामाच्या,श्रीकृष्णाच्या, संत ज्ञानोबा आणि तुकामाऊलींच्या गोष्टी सांगितल्या जातात. कोकणात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो हे आजपर्यंत फक्त ऐकले होते. पण कळसुलीत आल्यावर इथला गणेशोत्सव प्रत्यक्ष पाहिला आणि अनुभवलासुद्धा. घरच्या पाटावर खरेखुरे दागिने, व्हेलवेटचे कपडे  वापरून बनवलेल्या गणपतीच्या मुर्त्यांमधला जीवंतपणा अप्रतिम असाच असतो. गणेशोत्सवाच्या निमित्ताने संपूर्ण गावच्या गाव भक्तीरसात डुंबून जाते. भजन आणि किर्तनांच्या कार्यक्रमात लहानथोर सर्वचजण तल्लीन होऊन जातात. दशावतारी नाटके आणि डबलबारीचे कार्यक्रम ही तर कोकणाची खासीयतचं. कळसुलीत कोकण अनुभवायला मिळाला.
     आकाशातून कोसळणाऱ्या धो-धो पावसाची कसलीही तमा न करता गुडघाभर चिखलात दीवसभर भातलागवडीची कामे करणारा इथला कणखर शेतकरी रात्रीच्या काळोखात देव महापुरुष, भोगनाथ आणि गिर्बादेवी मंदिराकडे भक्तीरसात तल्लीन होऊन ग्रंथवाचन ऐकण्यासाठी आणि आत्मिक शांती प्राप्त करण्यासाठी धाव घेतो. देवाकडे आपल्या सुंदर मालवणी भाषेत गार्हाणेदेखील घालतो.
अरे ये देवा रवळनाथा,भोगनाथा...
मी तुका भरलेल फळ ठेवतय रे महाराजा...
आणि बारा पाचाक पाण ठेवतय रे महाराजा...
मी चतुसुत्री भातलागवड करतय, म्रुदापरिक्षण करतय,
मोजूनमापून खत घालतय आणि वाहत्या पाण्याक बांध घालतय रे महाराजा...
ह्या जा काय करतय ता शेतीभातीसाठी करतय त्यात माका यश दे रे महाराजा...
खरच कळसुली म्हणजे निसर्गाला पडलेलं सुंदर स्वप्नच होय.
@अमित जालिंदर शिंदे
..........................................................................................
कळसुलीतील छायाचित्रे-


परबवाडी येथील गणपतीशाळेत गणपती बनवताना परबकाका 
भोगनाथवाडी येथील प्राथमिक शाळेत ध्वजारोहण प्रसंगी ग्रुप लीडर शिवराज देवकर


कळसुली इंग्लिश स्कूल येथे आयोजित विद्यालयीन भजन स्पर्धा

कळसुली इंग्लिश स्कुल येथे ग्रामीण क्रुषी कार्यानुभव अंतर्गत क्रुषी पर्यटन विषयावरील मार्गदर्शन कार्यक्रम

कळसुली येथील भातशेती व नारळीच्या बागा

भातशेतीमध्ये मशागत करताना शेतकरी

कळसुली हायस्कूल येथे शिक्षक व संचालक मंडळी सोबत आम्ही ११ सहकारी

कळसुली इंग्लिश स्कुल,कळसुली


Wednesday, October 23, 2019

हो.... बड्डे अमोल

     हो.... बड्डे अमोल, हो बड्डे अमोल
     परवा २१ तारखेला माझा तारखेनुसार वाढदिवस होता. तारखेनुसार म्हणण्याच एक कारण आहे. योगायोगाने माझा जन्म झाला त्यावर्षी २१ ऑक्टोबर आणि दसरा एकाच दिवशी होता. घरच्यांंना तेव्हा तारखेपेक्षा मुहूर्त चांगला वाटला. तसही ग्रामीण भागात अजूनही एक पिढी मराठी कँलेंडर प्रमाणेच    महिने-वर्षे यांचे मोजमाप करते. आणि म्हणून वयाची १८ वर्षे पूर्ण होईपर्यंत माझा वाढदिवस आईवडिलांनी दसऱ्याच्या मुहूर्तावरच केला. १२ वी नंतर शिक्षणासाठी घर सोडून बाहेर पडल्यापासून माझा वाढदिवस मित्रांनी तारखेनुसार साजरा केला कारण ही ग्लोबल पिढी इंग्रजी कँलेंडरनुसार चालणारी आहे.
      तर झाल असं की, यावर्षी माझा वाढदिवस आणि महाराष्ट्र विधानसभेचे सार्वत्रिक मतदान एकाच दिवशी आले. दिवसाची सुरुवातच मतदान करून झाली. पुढे पूर्ण दिवस शुभेच्छा स्वीकारण्यात आणि प्रत्येकाचे वैयक्तिक आभार मानन्यात जाणार हे अगोदरच माहिती होत. दिवसभर अनेक शुभचिंतकांनी शुभेच्छा दिल्या. एकंदरीतच दिवस चांगला गेला. संध्याकाळी घरी आल्यावर शेजारी राहणाऱ्या पमाकाकू माझे वडील आणि आजीकडे गप्पा मारायला आल्या होत्या. गावगाड्यात अजूनही शेजारधर्म जिवंत आहे. शेतशिवाराच्या, पावसापाण्याच्या आणि एकमेकांच्या सुखदुःखाच्या गप्पा अजूनही घरापुढच्या अंगणात चांदण्याला बसून चालतात. तर पमाकाकूंच खर नाव पमाबाई. पण त्यांच्या बोलक्या स्वभावामुळे आणि आपुलकीने सगळ्यांची चौकशी करण्याच्या स्वभावामुळे त्यांंना आमच्या वयाची पोरं पमाकाकूच म्हणतात. वयाची साठी गाठलेल्या पमाकाकू अनुभवाचं आणि जून्या आठवणींचं गाठोडं उराशी घेऊन आमच्या आज्जीसोबत गुजगोष्टी करायला अधूनमधून घरी येत असतात. रोजगार हमीच्या कामावर त्या सोबतच कामाला जायच्या. तिथेच त्यांच्या तळहातावरच्या रेषा मुजल्या. प्रचंड काबाडकष्ट करून हातावर पोट भरणाऱ्या या पिढीच्या कामाच्या क्षमतेची बरोबरी आत्ताची तरुण पोर करूच शकत नाहीत. पमाकाकू परवाही अशाच गप्पा मारायला आमच्या घरी आल्या होत्या. दिवसभर गाव धुंडाळून आणि मतदानाच्या दिवशी मतदार, उमेदवार, कार्यकर्ते, निवडणूक अधिकारी, सुरक्षा (पोलिस) यंत्रणा या सर्वांच्या कामाचे निरीक्षण करून संध्याकाळी घरी आल्यानंतर आईने माझ औक्षण करण्यासाठी ताट तयार केले. डोक्यावर गांधीटोपी घालून मीही पाटावर बसलो. आईने औक्षण केले. लहानपणी आमचे वाढदिवस साजरे करताना आमची सगळी दोस्तकंपनी, घराशेजारच्या बायका ओवाळायला यायच्या, केक कापताना सगळी दोस्तमंडळी Happy Birthday म्हणून सुरात शुभेच्छा द्यायची. त्यादिवशी आई औक्षण करीत असताना घरी आम्ही आई, आजी , आणि पमाकाकू असे चौघेजणच होतो. आई औक्षण करीत असताना पमाकाकूला Happy Birthday च्या सुराची कमतरता जाणवली आणि त्या उस्फुर्तपणे गाऊ लागल्या. "हो.... बड्डे अमोल, हो.... बड्डे अमोल."
     खरतर हा त्यांचा आतला आवाज होता. त्या त्यांच्या अंतकरणातून आलेल्या शुभेच्छा होत्या. ज्यावेळी भावना अशा उस्फूर्तपणे बाहेर येतात तेव्हा शब्द काय आहेत? भाषा कोणती आहे? याला महत्त्व राहत नाही. ग्रामीण मनाच्या याच भावना असतात एकमेकांविषयीच्या. त्यामुळे नाती टिकविण्यासाठी , आपुलकी जोपासण्यासाठी क्रुत्रिम औपचारिकता करण्याची गरज गावखेड्याला लागत नाही. इथल्या भावनांच्या मातीत प्रेम, आपुलकीचा ओलावा नेहमीच असतो त्यामुळे नात्यांचे, मोठमोठ्या एकत्रित कुटुंबांचे वटवृक्ष इथे जोमाने वाढतात आणि ताठ मानेने ऊन, वारा, पावसाला धीरोदात्तपणे तोंड देतात. पमाकाकूंच्या अंतकरणातून आलेल्या "हो.... बड्डे" च्या शुभेच्छा मला सदैव स्मरणात राहतील.
@अमित जालिंदर शिंदे.
..........................................................................................
टिप-"हो.... बड्डे अमोल" या वाक्यात हो नंतर दिलेले चार ठिपके हे हो चा सूर दाखविण्यासाठी दिले आहेत.

Tuesday, October 15, 2019

अमेझॉन ते आरे: Same story but different script

     अमेझॉन ते आरे: Same story but different script 
ओक्जोकुल हिमनदीला आईसलँड च्या पंतप्रधानांंचे स्मरणपत्र
     जागतिक तापमानवाढ आणि हवामानबदलामुळे आईसलँड नावाच्या देशातील ओक्जोकुल नावाची एक हिमनदी नष्ट झाल्याची घटना नुकतीच घडली. आईसलँड चे पंतप्रधान कात्रीन जँक्सोब्सदोत्तीर यांनी या नदीला स्मरणपत्र अर्पण करून श्रद्धांजली देखील वाहिली आहे. हि नदी नष्ट होण्यापाठीमागे दोन मुख्य कारणे सांगितली जात आहेत. 
१) मे २०१९ मध्ये हवेमध्ये वाढलेले ४१५ ppm इतके विक्रमी कार्बन डायऑक्साईड चे प्रमाण आणि, 
२) यावर्षीच्या जुलै महिन्यातील सर्वाधिक तापमान. खरतर या वाढलेल्या तापमानालाच Global warming म्हणायच. ग्लोबल वार्मिंग ने फक्त आईसलँड लाच फटका बसलाय अस नाही. संपूर्ण जगभरात मागील २ दशकांमध्ये जागतीक तापमानात ०.८℃ ने वाढ झाली आहे. याचाच परिणाम म्हणून हिमनद्या वितळू लागल्या आहेत. समुद्राची पाणीपातळी वाढू लागली आहे. अनेक छोट्या छोट्या बेटांना या वाढणाऱ्या पाणीपातळीचा आगामी काळात मोठा फटका बसणार आहे. भारतासारख्या मान्सूनवर आधारित असलेल्या देशातील ऋतूचक्रच बदलायला लागलय. भारतातदेखील उन्हाळ्यात प्रचंड उष्णतेच्या लाटा  अनुभवायला मिळायला लागल्या आहेत. उष्माघाताने बळी चालले आहेत. चारापाण्याच्या टंचाईमुळे गुराढोरांनादेखील उन्हाळा असह्य होतोय. तर पावसाळ्यात प्रचंड अतिवृष्टीमुळे एकाच वेळी महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश,ओडीशा,बिहार असा सर्वत्र नागरीकांना पुराचा सामना करावा लागतोय. ग्लोबल वार्मिंग मुळे पाण्याचे बाष्पीभवन जास्त होतेय. भुजल पातळीत घट होतेय तर वाळवंटीकरणाचा वेग बेसुमार वाढतोय.या घडणाऱ्या गोष्टींची कारणमिमांसा करणे आता गरजेचे आहे. ग्लोबल वार्मिंग म्हणजे नक्की काय आणि ते होतय कशामुळे याच्या मुळाशी आता सर्वसामान्य नागरिकांनी जाणे गरजेचे आहे. रोजच्या जीवनात आता माणसाला गाडी लागते, फ्रिज लागतो, वीज लागते. या गोष्टींशिवाय आता मानवी जीवन पुर्णही होऊ शकत नाही. पण या गोष्टींच्या निर्मितीमुळे किंवा या गोष्टींच्या वापरामुळे निसर्गावर,पर्यावरणावर काय परिणाम होतो याचा विचार आपण करीत नाही. निसर्गाचा समतोळ ढासळतोय म्हणून आता या गोष्टींची निर्मिती किंवा वापर आपण थांबवू शकत नाही हे सत्य आहेच. पण या सत्याचा स्वीकार करीत असताना निसर्गास आपल्याचमुळे होणारी हाणी कशी कमी करता येईल याचा विचार मानवजातीने करायला हवा. निसर्गाचा ढासळणारा समतोल, पृथ्वीचे आणि वातावरणाचे वाढणारे तापमान याला औद्योगिकीकरण हाच घटक प्रामुख्याने कारणीभूत ठरत आहे. औद्योगिकीकरणातून बाहेर पडणारी प्रदूषके, गाड्यांचा धुर, फ्रिज, एसीमधुन निघणारे वायु, हरीतग्रह वायु या गोष्टींमुळे एकीकडे वातावरणातील कार्बन वाढतोय,पृथ्वीचे  सुरक्षाकवच म्हणून ओळखला जाणार ओझोन फाटतोय तर दुसरीकडे उद्योगधंदे आणि विकासाच्या नावाखाली हजारो-लाखो वृक्षांच्या कत्तली खुद्द सरकारकडून होत आहेत. वृक्ष हा एकच उपाय सध्या वाढणाऱ्या जागतिक तापमानाला आटोक्यात आणू शकतो कारण हवेत वाढणारा कार्बन शोषून घेण्याची आणि हवेत गारवा निर्माण करण्याची क्षमता झाडांमध्ये असते. विकासासाठी म्हणजेच पर्यायाने स्वताच्या सुखसोयीसाठी आता उद्योगधंदे, गाड्या आणि यंत्रांचा वापर आपण थांबवू शकत नसलो तरी मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड आपण निश्चितच करु शकतो. असे असताना पृथ्वी वरील सर्वच विकसित आणि विकसनशील देश जागतिक तापमानवाढीची समस्या आणि त्यावरील उपाय याबाबतीत जागतीक परिषदा घेण्यापुढे जास्त काही करताना दिसत नाहीत. याउलट ब्राझील आणि भारतासारख्या जैवविविधतेने नटलेल्या विकसनशील देशांनी अमेझॉन जंगल असो किंवा आरेच जंगल असो विकासाचा कांगावा करत कशा पद्धतीने चुकीच्या भुमिका घेतल्या हे पाहण अतिशय गरजेच आहे.
अमेझॉन जंगलातील वणवा
     ऑगस्ट २०१९ मध्ये ब्राझीलच्या अमेझॉन जंगलामध्ये ठिकठिकाणी २५०० वणवे लागले होते. या वणव्यांमध्ये लाखो झाडे नष्ट झाली आणि अनेक वैशिष्ट्यपूर्ण वन्यप्राणीही म्रुत्युमुखी पडले. या आगींमुळे निर्माण झालेला धुर ३२०० कि.मी. पर्यंत पसरला होता. ब्राझीलमधील अनेक शहरांमध्ये धुराची चादर पसरली होती पण ब्राझीलचे सरकार या साऱ्या संकटाला गांभीर्याने घेत नव्हते. सारे जग समाजमाध्यमांवर अमेझॉन वाचवा म्हणून ओरडा करत असतान ब्राझीलचे सरकार जाणूनबुजून याकडे दुर्लक्ष करीत होते. त्याला कारणही तसेच आहे.अमेझॉन च्या खोऱ्यात अमुल्य असा खनिजसंपत्तीचा ठेवा आहे. हा खनिजसंपत्तीचा ठेवा उत्खनन करून बाहेर काढण्यासाठी ब्राझीलीयन सरकारने अमेरिका आणि कँनडातील काही कंपन्यांशी करार केलेले आहेत. आणि उत्खनन करण्याअगोदर ही जमीन मोकळी व्हावी या उद्देशाने त्यांनी या वणव्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप ब्राझील सरकारवर जगभरातून होतोय. ब्राझील सरकारने या वणव्यांकडे इतके दुर्लक्ष केले होते की वणवे वेळीच आटोक्यात आणलेत तर ठीक नाहीतर फ्रान्स ब्राझील आर्थिक संबंधांवर विपरीत परीणाम होतील अशी धमकी फ्रान्स ला द्यावी लागली. वास्तविक दरवर्षी लाखो टन कार्बन उत्सर्जन शोषून घेणारे अमेझॉन जंगल प्रतिमिनीटाला एका फुटबॉल मैदानाएवढे प्रचंड वेगाने कमी होऊ लागले आहे. तरीही इथल्या जाईर बोल्सोनारो सरकारने जंगलतोडीवरची बंदी उठवली आहे. केवळ खनिजसंपत्तीचे उत्खनन करून देशामध्ये औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी आणि अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी हजारो लाखो झाडांची कत्तल ब्राझील सरकार करत आहे.
आरे जंगलातील झाडे तोडताना
      जे ब्राझीलमध्ये झाले तेच ४ ऑक्टोबर ला मुंबईतल्या आरे जंगलामध्ये झाले. वास्तविक आरे जंगल आहे की नाही यावरूनच येथे न्यायालयामध्ये युक्तिवाद झाला. शुक्रवारी ४ ऑक्टोबर ला मुंबई उच्च न्यायालयाने पर्यावरण प्रेमी लोकांच्या याचिका फेटाळताच मुंबई मेट्रो च्या अधिकाऱ्यांनी आणि महाराष्ट्र सरकारने संगणमताने आरे परिसरामध्ये जमावबंदी लागू करून जंगलतोडीस सुरुवात केली. आरे परिसरातल्या सामान्य नागरिकांतुन प्रचंड जनक्षोभ होत असतानादेखील अनेक पर्यावरण वाद्यांना अटक करून सलग ४८ तास आरेच्या जंगलामध्ये २००० हुन अधिक झाडांची कत्तल केली गेली. मुंबईतील विधीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी याविषयी सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांना पत्र लिहिले आणि सोमवारी म्हणजेच ७ ऑक्टोबर ला तातडीची सुनावणी घेऊन आरेच्या जंगलतोडीस तात्पुरती स्थगिती दिली पण तोवर मुंबई मेट्रो ला हव्या असलेल्या जमीनीवरील झाडे कापून झाली होती. ब्राझील चे अमेझॉन असेल किंवा मुंबई तले आरे असेल. विकासाच्या नावाखाली जंगलतोड हाच दोन्ही ठिकाणचा समान धागा आहे. अमेझॉन आणि आरे हि बेसुमार जंगलतोडीची फक्त प्रतिकात्मक उदाहरणे आहेत. 
     मागच्या वर्षभरापासून मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाने वेग घेतला आणि झाडांचा हिरवागार शालू पांघरलेल्या कोकणामध्ये कोट्यावधी झाडे उन्मळून पडली. नव्याने होऊ घातलेल्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन च्या कामासाठी ठाणे,भिवंडी,पालघर येथे १५०००० हुन अधिक खारफुटीची झाडे कापावी लागणार आहेत. एकीकडे अशी बेसुमार वृक्षतोड आमचीच सरकारे करतात अन दुसरीकडे कोट्यावधी वृक्षलागवडीच्या मोहिमादेखील आमचीच सरकारे करत आहेत. खरतर २०१६ ला २ कोटी वृक्ष, २०१७ ला ४ कोटी वृक्ष, २०१८ ला १३ कोटी वृक्ष लागवडीसाठी महाराष्ट्र राज्याने सलग ३ वर्षे लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये रेकॉर्ड नोंदवले. पण लावलेल्या या कोट्यावधी वृक्षांमधले किती वृक्ष आज जीवंत आहेत किंवा किती रोपांचे संगोपन सरकारने केले हा खरोखर संशोधनाचा विषय आहे.
विकास व्हावा जरूर व्हावा. उद्योग यावेत. रोजगार निर्माण व्हावेत. परंतु बेसुमार वृक्षतोड थांबायला हवी. कारण नवीन वृक्ष लावून ते जगविणे आपल्याला जमत नसेल तर असलेले वृक्ष तोडण्याचा आपल्याला अधिकार नाही. खरतर निसर्गाचा मनमुराद आनंद सगळ्यांना हवा असतो पण तो निसर्ग जपायला, त्याची काळजी घ्यायला, झाडे लावायला आणि जगवायला कुणालाच वेळ नाही. सरकारे दर ५ वर्षाला बदलतात. वेळोवेळी त्यांची धोरणे बदलतात. ५ वर्षात कुठल्याच झाडाचा वृक्ष होत नाही. वृक्ष व्हायला त्याची पाळेमुळे जमीनीत खोलवर घट्ट व्हावी लागतात. त्याच्या फांद्यांनी सभोवतालचे अवकाश व्यापून घ्यावे लागते. ढगांना कवेत घ्यावे लागते. रोपट्याचा वृक्ष होण्यासाठी ऊन ,वारा, पाऊस यांच्याशी अविरत झगडा करून ताठ मानेने  परत उभा राहावे लागते. त्यामुळे आपल्या मुलाबाळांसाठी हि पृथ्वी जीवंत ठेवायची असेल. तर जगातल्या प्रत्येक व्यक्तिने निसर्गाचा आदर राखून झाडे लावायला हवीत आणि त्यांचा वृक्ष होईपर्यंत त्याची काळजी घ्यायला हवी. Global warming ला जर Green earth हेच उत्तर असेल तर झाडे लावण्याची जागतिक लोकचळवळ व्हायला हवी. हाच पर्याय आहे शाश्वत विकासाचा. 
@अमित जालिंदर शिंदे

Tuesday, October 1, 2019

आदरणीय बापूजी, तुम्ही अमर आहात.

 आदरणीय बापूजी,
 तुम्ही अमर आहात.                                                     
    

     आदरणीय बापूजी, मागील काही दीवसांमध्ये तुमच्या पुतळ्यावर एका साध्वीने गोळ्या घातल्या. पण बापू यात तुमचा मृत्यू झाला नाही कारण तुम्ही तुमच्या कार्याने या अगोदरच अमर झाला आहात.   स्वातंत्र्यापूर्वी आणि स्वातंत्र्यानंतर तुमच्या हत्येपर्यंत तुमच्यावर नऊवेळा शस्त्रास्त्र हल्ले झाले. खरतर कुठलही बुलेट प्रुफ जँकेट घातलेल नसताना. आयुष्यात कधी शस्त्राला हात लावलेला नसताना तुमच्यावर नऊ शस्त्रास्त्र हल्ले झाले. यावरूनच तुमच्या ताकदीचा अंदाज आम्हाला येतो. बापू पाचगणीला नथुराम सुरा घेऊन तुमच्या मागे लागला तेव्हा तुमच्या अनुयायांपासून नथुरामला तुम्हीच वाचवले. ज्या नथुरामला तुम्ही वाचवले त्याच नथुरामने पुढे तुमचा घात केला. आज तुमच्या मृत्यूपश्चात ७० वर्षांनी त्याच नथुरामचे चाहते तुमच्यावर परत गोळ्या झाडतात. कारण ७० वर्षांपूर्वी आणि आज ७० वर्षानंतर देखील ते फक्त तुमच्या देहावर गोळ्या घालू शकले. विचारांवर नाही. तुमचे विचार आजही आमच्यासारख्या तरुणांच्या मनावर गारुड घालून बसलेत.

    बापू, खेद एकाच गोष्टीचा वाटतो. तीन गोळ्या लागल्यानंतर तुम्ही राम नामाचा जप करत प्राण सोडलात. त्यावेळी तुमच्यावर गोळ्या घालणाऱ्या नथु'राम' च्या नावात राम आहे. आज तुमच्या पुतळ्यावर गोळ्या घालणाऱ्या साध्वी देखील रामाचेच नाव घेऊन स्वत:चे अस्तित्व टिकवते आहे. मग बापू तुमचा राम आणि त्यांचा राम यात फरक काय आहे??बापू तुम्ही ग्रामस्वराज्यासाठी रामराज्याची संकल्पना मांडत होतात. मग रामाच नाव घेऊन अस्तित्व टिकवणाऱ्यांना रामराज्य मान्य नव्हत का??
   बापू, आज देश तुमच्या जयंतीच हे १५० व वर्ष साजर करतोय. केंद्र सरकार व राज्य सरकार विविध उपक्रम राबवून तुमचे विचार अजरामर ठेवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. एकीकडे सरकार यासाठी प्रयत्न करीत असताना 'नथुराम देशभक्त था' म्हणणाऱ्या विक्रुतीला जनतेन खासदार म्हणून संसदेत पाठवलय याच खर दु:ख वाटतयं. बापू आजच्या तरुण पिढीला जेव्हा आम्ही सेवाग्राम बद्दल विचारतो तेव्हा आमचेच काही तरुण सहकारी 'तिथे झोपड्यांशिवाय आहेच काय??'अस विचारतात. तेव्हा मन सुन्न होत कारण बापू त्याच झोपडीत बसून तुम्ही देशभर स्वातंत्र्याच्या ज्वाळा पेटवल्या होत्या. त्याच झोपडीतून आलेल्या एका हाकेवर उभा हिंदूस्थान एक होऊन लढ्यात उतरत होता. आमच्या तरुण सहकाऱ्यांना सेवाग्राम मधल्या त्या झोपड्यांची ताकद आणि तिथुन मिळणाऱ्या देशभक्तीच्या ऊर्जेची महती सांगण्यात आम्हीच कमी पडलो. त्याबद्दल तुमची क्षमा मागतो. तुमच क्षमाशील व्यक्तिमत्त्व मला क्षमा करील आणि तुमच्या विचाराचा प्रसार करण्यासाठी शक्ती देईल एवढीच माफक अपेक्षा. भारतावर अनेक राजांनी महाराजांनी राज्य केलं. पण काश्मिर पासून कन्याकुमारीपर्यंत आणि लाहोर पासून अरुणाचल प्रदेश पर्यंत अखंड भारताने नेतृत्व मान्य केलेली तुम्ही पहिली व्यक्ती होतात.
     बापू, तुमच्या नावाची पांढरी गांधीटोपी घालून जेव्हा सुमार लोक उसण्या देशभक्तीबद्दल बोलतात तेव्हा माझ्यासारख्याला त्यांच्याकडून एकच अपेक्षा असते. स्वतःच्या स्वार्थी पोळ्या भाजण्यासाठी गांधी टोपी घालून खोट बोलण्यापेक्षा त्या टोपीतला विचार टोपीखालच्या डोक्यात पाझरु द्यात. बापू तुम्ही आत्मटिका करून स्वतःच्या चुका स्वतः सुधारत होतात. अलिकडे समाजात स्वतःची चुकच मान्य न करण्याची प्रवृत्ती वैगाने फैलावताना पाहिल्यावर जगभरात तुमच्या नावाने ओळखला जाणारा हा भारत देश खरच तुमचा राहिलाय का??असा प्रश्न पडतो. 
    बापू, सत्य अहिंसा आणि प्रेमाणे जग जिंकण्याचा तुमचा विचार आजच्या प्रत्येक तरुणाने अंगिकारला पाहिजे. ग्रामस्वराज्यासाठी रामराज्याची तुमची संकल्पना आजदेखील अंमलात आणण्याची गरज आहे. तुमची क्षमाशील व्रत्ती आणि औदार्य यांचे समाजामध्ये बीजारोपण होऊन शांत, सुखी, आणि सामाजिक सलोख्याने भारलेला समाज निर्माण व्हायला हवा. बापू संकल्प करतो या सगळ्या गोष्टींसाठी मी माझा खारीचा वाटा निश्चितपणाने उचलेन आणि इतरांनादेखील त्याची जाणीव करून देईन. आत्मटिका करुन स्वतःचे व्यक्तिमत्त्व पारदर्शक घडविण्याचा तुमचा गुण मी स्वतः आत्मसात करून माझ्या सहकाऱ्यांमधेही रुजविण्याचा प्रयत्न करीन. बापू यासाठी तुम्ही मला नेहमीच आशिर्वाद द्याल आणि तुमच्या विचाराची साथही द्याल एवढीच अपेक्षा करतो आणि तुम्हाला स्मरण करुन आदरांजली वाहातो.
बापू तुम्ही अमर आहात आणि अमर राहा.

                                                             तुमचाच 
                                               @अमित जालिंदर शिंदे

Thursday, August 15, 2019

महापुर

महापुर
     पुराच पाणी वाढतच होत. काही वेळापुर्वी घोट्याला लागणारं पाणी आता गुडघ्यापर्यंत आलं होतं. कृष्णामाई पहिल्यांदाच एवढी कोपली होती. नुकतीच बाळंतीण झालेली सदा आबा ची थोरली लेक अजून ओल्याची सुकी झाली नव्हती. वाढत पाणी बघुन धाकला राजू तिला घेऊन घटकाभरापूर्वीच शिरढोणाला मामाकडे गेला होता. पुराच्या वाढत्या पाण्यात बुडता संसार सदाआबा ला उघड्या डोळ्यांनी दिसत होता, पण बाळंतीण थोरली लेक आणि एकुलता एक राजू दोघांना सुखरूप मामाकडे धाडल्याचं वेगळचं समाधान त्याच्या चेहऱ्यावर दिसत होत. पावसाने जोर धरला होता. वरुणराजा काळ बनून बरसत होता. पाणी वाट मिळेल त्या दिशेने प्रवाह बदलत होतं. एकापाठोपाठ एक घरात घुसत होत. सदा आबाचं सारवलेल अंगण कधीच उखडल होतं. जणावरांची दावण पाण्याखाली गेली होती. बैलांना पाणी लागु नये म्हणून घराच्या बाजूलाच घातलेल्या बांधावर त्यान बैलांच्या खुंट्या मारल्या होत्या. शेजारच्या गावात सकाळीच पाणी घुसल्याने आणि तेथील जीवंत जनावर पुराच्या पाण्यात वाहुन गेल्यामुळे राऊतवाडी थोडी सावध झाली होती. पण घरातली राजू ची महत्त्वाची कागदपत्रे, वह्या पुस्तके, जमीनींचे दस्त, धान्य ,पिठं, आणि पाणी लागल्याने खराब होणारं सामान आवरून माळ्यावर टाकण्याच्या नादात त्याची जित्राब दोन बैल आणि एक म्हैस गावाबाहेर टेकाडावर असलेल्या पाटलाच्या मळ्यात नेता आली नाहीत.पाणी अजून वाढतच होत. आता माळ्यावरची जागाही संपली होती. भांडीकुंडी, कपडेलत्ते, अंथरूणे, इ. गोष्टी तशाच जिथल्या तिथ जागेवर पडलेल्या होत्या. आता पाणी बैलांच्या पायाला लागायला लागलं तस सदा आबाच्या काळजात धस्स झालं. एव्हाना वस्तीवरच्या सगळ्याच शेजारी पाजाऱ्यांची जमेल तेवढ सामान आटोपून घराबाहेर पडायची लगबग सुरू झालेली. सदा आबानं बायको रुक्मिणीला थोडे कपडे आणि मौल्यवान दागदागिने घेऊन घरातून बाहेर आणलं. दारावर मोठ टाळ ठोकलं, म्हशीचा दोर सोडून रुक्मिणीच्या हातात दिला. तिला म्होर घालून सदा आबा दोन्ही बैलांचे दोर घेऊन टेकावरच्या पाटलाच्या मळ्याची वाट चालू लागला. ३-४ कि.मी. अंतरावर असलेल्या पाटलाच्या मळ्यात सगळ्या राऊतवाडीच्या जनावरांची छावणी पडलेली. तिथून हाकेच्या अंतरावर जि.प. च्या प्राथमिक शाळेत गावातल्या बायकापोरांचा गलका झालेला. गावातली गडीमाणस अजून गावात अडकलेली जनावर, म्हातारी माणसं, जेवणाखाण्याच सामान गोळा करून शाळेत आणून टाकत होती. सदाआबा आणि रुक्मिणी झपाझप पावले टाकत होती. वरुन आभाळ गळतच होतं. खाली पाण्याची पातळी वाढुन पाणी कमरेला लागलं होतं. जनावरांचे पाय उचलत नव्हते. पाण्याच्या प्रवाहात तोल सावरत नव्हता. चिखलात पाय जास्तच अडकत होते. पावसान आणि पुराच्या पाण्यानं हैदोस घातला होता. दोघांचाही जीव रडकुंडीला आला होता. पण पाण्यात जलसमाधी मिळायच्या अगोदर पाटलाच्या मळ्यात पोचायच होतं. 
     सदा आबा आणि रुक्मिणी आता निम्म्याहून जास्त अंतर चालून आले होते. अंधार पडायला लागला होता. दिवस मावळायच्या अगोदर समोरचा पिंपळओढा पार करायचा होता. दुथडी वाहणारा आणि पुराच्या पाण्यानं पात्र विस्तारलेला पिंपळओढा ओलांडला की पुढं पाण्याची पातळी कमी होणार होती. राऊतवाडीच्या एका बाजूने कृष्णामाई आणि दुसऱ्या बाजूने पिंपळओढा वाहात होता. सदा आबाच्या ५७ वर्षाच्या जीवनात पहिल्यांदाच कृष्णामाईने पिंपळओढा गाठलेला होता. नदी आणि ओढ्याच पात्र एकच झालं होत. सगळ्या राऊतवाडीत पाणी घुसल होतं. पिंपळओढ्यावर पक्का पुल नव्हता. लाकडाच्या फळ्या एकमेकांना जोडून आणि लोखंडाचे डांब आडवे टाकून त्यावरून पलिकडे जायला रस्ता केलेला. एरवी या रस्त्यावरून फक्त पायी शेतात जाणारी माणसं  आणि एखाद दुसरा सायकल सवारीच जायचा. ओढ्यावचा रस्ता देखील पाण्याखालीच गेलेला. पण पाटलाच्या मळ्यात नेहमी ये-जा असल्याने सदा आबाला तो चांगलाच अंगवळणी पडला होता. रस्त्याचा अंदाज घेऊन त्यान रुक्मिणी ला पुढे जायला सांगितलं. रुक्मिणी आणि तिच्या पाठोपाठ सदा आबाची म्हैसदेखील ओढा पार करून पलिकडे गेली. पलिकडे पाणी कमी होत. आता सदा आबाला जरा हायस वाटत होतं. तोही रुक्मिणीपाठोपाठ ओढा ओलांडायला लागला. त्याच्या पाठोपाठ त्याचे दोन्ही बैल एकदमच ओढा ओलांडायचा प्रयत्न करीत होते. अरुंद फळ्यांच्या त्या रस्त्यावर दोन बैल बसणार नव्हते. इतक्यात सर्जा चा सावळ्याला धक्का बसला. सावळ्याचा एक पाय फळीवरुन खाली घसरला. गारठलेला सावळ्या ओढ्याच्या पाण्यात आडवा झाला. चिखल तुडवून तुडवून आणि कमरेएवढ्या पाण्यात चालून थकलेल्या सावळ्याला उठता येईना. सावळ्या पाण्यात आडवा झाल्याने बुजलेला सर्जा कधीच धाऊन ओढ्यापलीकडे गेलेला. जाताना सदाआबालाही धक्का देऊन गेलेला. सदाआबाने पाण्यात पडूनदेखील सावळ्याच दाव हातातून सोडलं नव्हतं. सावळ्या ओढ्याच्या प्रवाहात वाहत होता. पाय हलवुन उठण्याचा प्रयत्न करत होता. पण प्रवाहाला वेग असल्यामुळे तो अजून पुढे जात होता. सदा आबा सावळ्याला सोडायला तयार नव्हता. तोहि सावळ्यासोबत प्रवाहात ओढला जात होता. रुक्मिणी धाय मोकलून रडत होती. आरडाओरडा करत होती. अंधार पडायला लागला होता. रुक्मिणी आणि सदाआबा सोडून सगळेच पाटलाच्या मळ्यात होते. रुक्मिणीचा टाहो कुणाच्याच कानी पडत नव्हता. इतक्यात वाहणाऱ्या सदाआबाच्या हाती ओढ्याकाठच्या वडाची पारंबी लागली. सदा आबाने ती घट्ट पकडली. दुसऱ्या हातात सावळ्याच्या गळ्यात बांधलेला दोर होता. प्रवाहाबरोबर सावळ्या पुढ ओढ घेत होता. सदा आबाने वडाची पारंबी घट्ट पकडून सदाआबा ओढ्याच्या काठाला यायचा प्रयत्न करत होता. त्यामुळे सावळ्याच्या गळ्यातला दोर सावळ्याला फास आवळत होता. सावळ्या मोठ्यानं हंबरडा फोडत होता. शेवटी निसरडा झालेला दोर सदा आबाच्या हातून निसटला आणि सावळ्या ओढ्याच्या प्रवाहात पाण्याच्या गतीने वाहायला लागला.सावळ्यानं जेव्हा हंबरडा फोडला तेव्हाच गळ्याला फास लागुन जीव सोडला होता. त्यामुळे पुराच्या पाण्यातून वाहताना उभा राहण्यासाठीची त्याची धडपडदेखील बंद झालेली. सदा आबा च्या हातातून सावळ्याचा दोस सुटला पण सुटताना हात कापून सुटला. सदा आबा च्या हातातून रक्ताची लाल भडक धार पाण्यात पडत होती . वाहत्या पाण्यात पडताच नाहिशी होत होती. सावळ्या वाहुन जाताना पाहून तो सुन्न झाला होता. सदा आबाच्या दारातच जन्म झालेल्या सावळ्याला त्याच्या रंगामुळे सदा आबाने सावळ्या नाव ठेवलं होत. पोटच्या पोराप्रमाणे सावळ्याला सांभाळल होतं. सावळ्यानदेखील धन्याची मनोभावे सेवा केली होती. सावळ्या आणि सदा आबा च नात पितापुत्रासारख होत. सदा  आबा कधी बाहेर गेला तर सावळ्या गवताच्या काडीलादेखील तोंड लावत नसे. आणि सावळ्याच्या काळजीपोटी सदा आबा पण कधी घर सोडून बाहेर कुण्या पै-पाहुण्यांकडे मुक्कामी जात नव्हता. एका क्षणात सावळ्याचा सगळा जीवनप्रवास सदा आबाच्या डोळ्यासमोरून तरळून गेला. सावळ्या कधीच नजरेच्या कक्षेबाहेर गेला होता. एव्हाना तो कृष्णामाईच्या कुशीत पोहोचलादेखील असेल. अंधार चांगलाच दाटून आला होता. आणि ओढ्यापलीकडे गेलेली रुक्मिणी सदा आबाच्या मागे येऊन पाठीवरून हात फिरवत उभी होती. सावळ्याच्या दुखःत आकंठ बुडालेला सदा आबा भानावर आला. अजून १-१.५ कि.मी. अंतर चालायच होतं. सर्जा आणि म्हशीला तरी सुरक्षित न्यायच होत. सदा आबा चा पाय त्या जागेवरून निघत नव्हता. पण आपणच धीर सोडला तर पाठीमाग उभ्या असलेल्या रुक्मिणीने काय करायच?? 
     सदा आबा तिथुन माघारी फिरला रुक्मिणी ला पुढे घालून आणि सर्जा ला आणि म्हशीला घेऊन झपाझप पावले टाकू लागला. सावळ्याला सोडून जायला मन तयार होत नव्हतं पण आता पर्याय नव्हता. आपल्या संसाराचा मोडका बैलगाडा समर्थपणे ओढणारा सावळ्या तसाच डोळ्यासमोर दिसत होता. हुंदका आवरत नव्हता. डोळ्यातून एकसारखे अश्रू वाहात होते. पण प्रचंड महापुर आणि मुसळधार पावसासमोर सदा आबाच्या अश्रूंचा निभाव लागत नव्हता. साडेतीन, चार तास चालून आल्यानंतर सदा आबा आणि रुक्मिणी पाटलाच्या मळ्यात पोहोचले. सदा आबा ने सर्जा ला आणि म्हशी ला सर्जेराव पाटलाच्या शेडमध्ये दावनीला बांधलं, रुक्मिणी ला देखील सावळ्या च्या जाण्याने अतीव दुखः झालं होत. पण अगोदरच हळव्या झालेल्या नवऱ्यासमोर ते दाखवून चालणार नव्हतं. पाटलाच्या मळ्यात जो तो सदा आबा ला सावळ्याला कुठं सोडलंस म्हणून विचारत होता?? हे विचारताच सदा आबा ला हुंदका आवरत नव्हता आणि तो ढसाढसा रडायचा. शांत स्वभावाचा सावळ्या सगळ्या गावाचा लाडका होता. अगदी लहान पोरा-सोरांपासून, गावातल्या थोरामोठ्यांपर्यंत कुणीही सावळ्याच्या जवळ जाऊन त्याला कुरवाळू शकत होत, औता-गाडीला जुंपू शकत होत. सावळ्या गेल्यानंतर ४ दिवसात पुर ओसरला. पाटलाच्या मळ्यात गोळा झालेला गाव आपापल्या घराकडे पांगला. सदा आबा देखील आपल्या बायकोला आणि जित्राबांना घेऊन घरी गेला. बाळंतीन झालेली लेक मामाकडेच ठेवून राजूही घरी परत आला. सदा आबा च कुठल्याच कामात लक्ष लागत नव्हतं ,घराला कुलूप लावलेल असल्याने घरातील काहीच वाहुन गेल नव्हतं, पण सगळ्या घरात चिखलाचं साम्राज्य झालं होतं. रुक्मिणी आणि राजू सगळी आवराआवरी आणि स्वच्छता करत होती. सदा आबा मात्र दावनीला बाधलेल्या सर्जा च्या तोंडावर हात फिरवत होता. सर्जानेही त्याच तोंड सदा आबाच्या मांडीवर ठेवलं होतं. सावळ्याला जाऊन ४ दिवस झाले मात्र ना सर्जा च्या डोळ्याची धार थांबत होती ना सदाआबाच्या डोळ्याची धार थांबत होती. दोघेही एकसारखे सावळ्याच्या आठवणीत रडत होते. शेवटी त्यांच्या आयुष्याचा सखासोबती त्यांना सोडून गेला होता. तेवढ्यात दारासमोर महिंद्राचा पिक अप येऊन उभा राहिला. त्यातून राजू चा मामा खाली उतरला सोबत घरच्या गायीला वर्षाभरापूर्वी झालेल वासरू सदा आबा ला द्यायला घेऊन आलेला. सदा आबाने त्या पांढऱ्याशुभ्र वासरालापण सावळ्या हेच नाव ठेवलं. सदा आबा आता रडायचा कमी झालाय. लहानशा सावळ्याला सांभाळण्यात आणि त्याचे लाड पुरवण्यात सदा आबा  आता चांगलाच रमतो.
...............................................................................................
वरील कथा आणि कथेतील सर्व पात्रे काल्पनिक आहेत.
...............................................................................................
     सांगली आणि कोल्हापूरला आलेल्या महापुरातदेखील अशा हजारो सदा आबांच्या गायी, म्हशी, बैल, वासरे वाहुन गेली. जीवंतपणी त्यांना जलसमाधी मिळाली. कित्येकांची संपूर्ण घरदार वाहुन गेली. अंगावरच्या कपड्यांशिवाय काहीच उरल नाही. आयुष्यभर कष्ट करून उभारलेला संसार होत्याचा नव्हता झाला. ऊसाचे फड आडवे झाले. नवीन केलेली लागण जमीनीवरच्या मातीसकट वाहुन गेली. बैलांसोबत बैलगाड्या गेल्या, घरातली भांडीकुंडी गेली. स्वयंपाकाला चुली राहिल्या नाहीत की तेल-मीठ उरल नाही. लहानसहान पोरांची वह्या-पुस्तकं गेली. तरूणांची स्वप्ने पुर्ण करणारी पुस्तक स्वप्नासहित भिजून चिंब झाली. अनेक छोटे छोटे पुल वाहुन गेले. गावोगावी रस्त्यांवर, घराघरातून चिखलान आपलं साम्राज्य उभा केलं. सरकारदरबारी गरीब-श्रीमंत सगळे एकाच तराजूत मोजले जावू लागले 'पुरग्रस्त'. आता पुर ओसरल्यानंतर परत एकदा या प्रत्येकाचा संसार नव्याने उभा करायचायं. वाहुन गेलेली घर पुन्हा उभा करायची आहेत. चिखलानी माखलेली घरदारं स्वच्छ करायची आहेत. लहान मुलांना वह्या-पुस्तके, गणवेश, कपडेलत्ते पुरवायला हवेत. प्रत्येक कुटुंबाला जीवनावश्यक साहित्य, चटणी-मीठ,तेल,धान्य, कपडे,भांडी द्यायला हवीत. तरुणांच्या हाताला काम देऊन त्यांची स्वप्ने पुर्ण करायला हवीत. शेतकऱ्यांना शेती परत उभा करायला. बी-बियाणे,खते-औषधे,संपूर्ण मशागतीच्या खर्च द्यायला हवा. यासाठी सबंध महाराष्ट्राला पुरग्रस्त लोकांसोबत मदतीचा सक्षम हात देऊन उभा राहायला हवं. मदत करताना पुरग्रस्त बांधवांच्या डोळ्यात उपकारांची भावना निर्माण न होऊ देता आपले सगेसोयरे,बांधव म्हणून मदत करायला हवी. कथेतल्या सदा आबाला लहानसं वासरु देऊन त्यांच्या मेहुन्याने आनंद दिला.आशा आहे की कोल्हापूर- सांगलीच्या अशा हजारो सदा आबांना आपल्यासारखी लोक पुन्हा उभा करतील. स्वाभिमानी सांगली कोल्हापूर करांची मन न दुख वता त्यांना मदत करून आपण सारे त्यांना या परिस्थितीवर मात करण्याची ऊर्जा देऊयात...त्यांना उभा करुयात...
@अमित जालिंदर शिंदे


न्यूझीलंड,कोरोना,नागरीक आणि जेसिंडा आर्डर्न... न्यूझीलंड देशाचा राष्ट्रध्वज      न्यूझीलंड, प्रशांत महासागराने चौफेर वेढलेला एक बे...