Monday, July 15, 2019

आदर्श समाजसेवक:प्रा.नानासाहेब लिगाडे

         आदर्श समाजसेवक:प्रा.नानासाहेब लिगाडे

     माजी राष्ट्रपती आर.व्यंकटरमण संस्थापक असलेल्या गांधी फोरमच्या सोलापूर जिल्हा शाखेकडून दरवर्षी दिला जाणारा आदर्श समाजसेवक पुरस्कार सन २०१९ साठी अकोला गावचे सुपूत्र, शेतकरी सहकारी सुतगिरणी मर्यादित,सांगोला चे चेअरमन,रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य प्रा.नानासाहेब लिगाडे सरांना आज दि.-१५/०७/२०१९ रोजी सायंकाळी ४:३० वाजता हिराचंद नेमचंद वाचनालय,सोलापूर येथे मा.पालकमंत्री विजकुमार देशमुख यांच्या शुभहस्ते प्रदान होत आहे. प्रथम लिगाडे सरांचे हार्दिक अभिनंदन आणि त्यांच्या पुढील सामाजिक वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.
     भाई जगन्नाथराव लिगाडे (तात्या)  चँरिटेबल ट्रस्ट व रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून केलेल्या सामाजिक कार्यासाठी लिगाडे सरांना आदर्श समाजसेवक पुरस्कार मिळाला आहे.सरांनी भाई जगन्नाथराव लिगाडे(तात्या) चँरिटेबल ट्रस्ट च्या माध्यमातून आजपर्यंत नेत्रतपासणी शिबिर, स्त्रियांसाठी सर्वरोग निदान शिबिर, विविध विषयांवर प्रबोधनपर व्याख्याने,माजी सैनिक सन्मान सोहळा,२००७ पासून दरवर्षी राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा आयोजित केल्या आहेत.शिक्षण आणि व्यक्तिमत्व विकास या सरांच्या आवडीच्या गोष्टी असल्याने रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून सरांनी स.शा.लिगाडे विद्यालय व भाई जगन्नाथराव लिगाडे ज्यू.कॉलेज अकोला,शिवाजी विद्यालय व ज्यू.कॉलेज महुद बु.,मांजरी हायस्कूल मांजरी,यशवंत विद्यालय पंढरपूर यांच्या विविध विकासकामांमध्ये मोलाचे योगदान दिले आहे.या सर्व शाळांमधील ५वी ते १० वी च्या विद्यार्थ्यांना सरांनी रोख रकमेची बक्षीसे ठेवून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याचे काम देखील केले आहे.
     मी ५वीला गेल्यावर लिगाडे सरांना प्रथम माझ्या शाळेमध्ये पाहिले. ओघवती भाषणशैली,नेहमी शाळेच्या विकासाचाच ध्यास,आमच्या शाळेच्या मुख्याध्यापक,शिक्षक,आणि विद्यार्थ्यांना नेहमी वेगवेगळ्या विषयावर मार्गदर्शन यामुळे विद्यार्थीदशेत मला सरांच्या व्यक्तिमत्त्वाचे विशेष आकर्षण होते.सरांचे वडील आणि माणदेशी जनसेवक,सांगोला तालुक्यामध्ये होऊन गेलेला सच्चा लोकनायक,सांगोला सुतगिरणीचे चेअरमन जगन्नाथ तात्यांचे २९ डिसेंबर २००५ रोजी अकाली निधन झाले.तात्यांच्या निधनानंतर दि २१ डिसेंबर २००६ रोजी सरांची सांगोला सुतगिरणीचे चेअरमन म्हणून निवड झाली. कापड आणि सुतगिरणी व्यवसाय जगभरात मंदिच्या सावटात अडकला असतानादेखील आपल्या प्रशासकीय कौशल्याच्या जोरावर सर सांगोला सुतगिरणी मोठ्या सचोटीने चालवित आहेत.सुतगिरणीच्या चेअरमन पदावर काम करत असताना गिरणीतल्या कामगारांसोबत त्यांनी नेहमीच सलोख्याचे संबंध ठेवले.
     सरांनी आम्हा भावंडांना क्वचितच पाहिलेले पण आमच्या वडिलांना जेव्हा कधी काही कामानिमित्त त्यांना भेटाव लागे तेव्हा सर त्यांच्याकडे नेहमीच माझ्या आणि माझ्या छोट्या भावाच्या शिक्षणाबद्दल आपुलकीने विचारपूस आणि मार्गदर्शन करीत.
     मागच्या वर्षी १ व २ ऑगस्ट २०१८ रोजी औरंगाबाद येथे शेतकरी कामगार पक्षाचे १७ वे अधिवेशन भरले होते. राजकीय विषयाची आवड म्हणून मी सरांसोबत या अधिवेशनाला गेलो होतो.त्या कालावधीत लाभलेला सरांचा सहवास निश्चितच प्रेरणादायी होता.रयत शिक्षण संस्थेसारख्या आशिया खंडातील सर्वात मोठ्या शिक्षण संस्थेचा जनरल बॉडी सदस्य, कोट्यवधी रुपयांचे भागभांडवल असलेल्या सुतगिरणीचा चेअरमन असलेली व्यक्ती आपल्यासोबत राहते,सोबत आलेल्या प्रत्येक कार्यकर्त्याची आपुलकीने विचारपूस करते ह्या गोष्टी खरच शिकण्यासारख्या होत्या.दोन दिवसाच्या त्या सहवासात मी सरांना अनेकवेळा अनेक प्रश्न विचारले.शेतकरी कामगार पक्षाची स्थापना, इतिहास, मार्क्सवादी विचारसरणी,एकेकाळचा काँग्रेसचा महाराष्ट्रातील प्रमुख विरोधी पक्ष पण सध्या झालेली वाताहत,रयत शिक्षण संस्था, कर्मवीर भाऊराव पाटील, मराठा आरक्षण,सांगोला सुतगिरणी आणि अडचणीतला वस्त्रोद्योग या व अशा अनेक विषयांवर मी सरांना प्रश्न विचारले व सरांनी मुक्तकंठाने त्या सर्व प्रश्नांची समाधानकारक उत्तरे दिली.
     साधी राहणी आणि उच्च विचारसरणी या उक्तिला सर नेहमीच समानार्थी राहिले. शिस्तीचे भोक्ते,सामाजिक जाण,प्रशासकीय कौशल्य,विद्यार्थी कामगार आणि राजकीय पुढाऱ्यांशी आपुलकीचे संबंध या गुणांमुळे सर नेहमीच सर्वाना आपलेसे वाटतात.
     कधीही अडचण आली तर भेट म्हणून सांगणारे सर नेहमीच एक आदर्श गुरुदेखील वाटतात.अशा अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाला आदर्श समाजसेवक म्हणून मिळालेला पुरस्कार म्हणजे त्यांच्या कामाची पोचपावतीच होय.सरांना परत एकदा हार्दिक अभिनंदन आणि त्यांची भावी वाटचाल अशीच यशस्वी होवो ह्या शुभेच्छा.
@अमित जालिंदर शिंदे

4 comments:

न्यूझीलंड,कोरोना,नागरीक आणि जेसिंडा आर्डर्न... न्यूझीलंड देशाचा राष्ट्रध्वज      न्यूझीलंड, प्रशांत महासागराने चौफेर वेढलेला एक बे...