Sunday, October 21, 2018

पंढरीची वारी

         पंढरीची वारी-गरिबीच्या स्वप्नांना कष्टाच चांदण

राधाबाई आज निवांत पडल्या होत्या.काही केल्या त्यांचा डोळा उघडत नव्हता.दररोज ह्या वक्ताला शेणघाण काढून,जणावरांना वैरण-पाणी करुन,स्वताच आवरुन,दुपारच्या जेवणाचं गाठोडं बांधून त्या सकवराबाईंची वाट बघत बसलेल्या असायच्या.दोघी मिळून कामावर जायच्या आणि स्वताची घरे चालवायच्या.नवऱ्याच्या अकाली मरणानंतर,ऐन तारुण्यात कपाळ पांढरं झालेल्या राधाबाईंनी गावात मिळेल त्याच्या शेतावर काम करून सुषमाचं शिक्षण पूर्ण केले,लाखभर रुपये हुंडा देऊन चांगला नोकरदार मुलगा शोधून गावाचे डोळे दिपवून टाकेल अस शाही लग्न लावून दीलं.
     सुषमा ही राधाबाईची एकुलती एक मुलगी.आखीव-रेखीव चेहऱ्याची आणि गोऱ्यापान रंगाची सुषमा पहिल्या नजरेतचं कुणाच्याही डोळ्यात भरेल अशीच होती. लहानपणी डेंग्यूच्या तापाने मरणाच्या दारात पोहोचलेल्या सुषमाला राधाबाईने मुंबईच्या मोठ्या दवाखान्यात नेऊन जीवंत केले होते. सुषमाच्या दवाखान्यातील खर्चासाठी तिने शामराव पाटलाकडुन ५००००₹ कर्ज घेतल होतं.हे कर्ज फेडण्यासाठी पुढे वर्षभर राधाबाई पाटलाच्या घरी धुणीभांडी,झाडलोट, धारापाणी,खुरपणी करीत होती.सुषमाला पोटभर जेवायला मिळावं,तिला चांगले कपडे मिळावेत, वह्या-पुस्तकं वेळेत मिळावीत,तिला काही कमी पडू नये म्हणुन राधाबाई स्वतःच्या पोटाला चिमटा काढून,हौसमौज विसरून दररोज सुर्योदयापासुन,सुर्यास्तापर्यंत दुसऱ्यांच्या शेतात खपायची.अगदी गड्यावाणी काम करायची.अभ्यासात हुशार असलेल्या सुषमाचं कौतुक करताना तिचा ऊर भरून यायचा."माझी पोरगी मोठ्ठी सायबीन व्हयलं आणि मला चार चाकाच्या गाडीतनं पंढरीच्या विठुबाकडं न्हील"असा डंका राधाबाई सगळ्या गावात पिटत असे.
     सुषमादेखील शिकून पुण्याला गेली.मोठ्या आय.टी.कंपनीमध्ये मोठ्या पदावर नोकरीला लागली. तिनं मोबाईल घेतला. आईला साधा फोन घेऊन दीला.पण लग्नानंतर जसजसं शहराच वारं तिला लागत गेलं तसतसे तिच्यात बदल होऊ लागले.काबाडकष्ट करून शिकविणाऱ्या आईचा तिला विसर पडू लागला.रोज होणारा फोन आता चुकून आठवण आली की १०-१५ दीवसातुन होऊ लागला.महिन्याभराला होणारी भेट आता सहा-सहा महिने होत नव्हती. पुर्वी आईला खर्चासाठी महीन्याला २०००₹ पाठविणारी सुषमा आता २००₹ देखील वेळेत पाठवत नव्हती .त्यामुळे आख्खं आयुष्य कष्टात घालविलेल्या राधाबाईच्या नशिबी परत दारिद्र्य आलेलं.म्हातारपणी दुबळं शरीर घेऊन आता परत वितभर पोट भरण्यासाठी  कामाच्या शोधात दुसऱ्यांचे बांध पालथे घालण्याची वेळ आली होती. असं नव्हत की सुषमाला कामातुन वेळ मिळत नसेल किंवा शहरात पगार पुरत नव्हता,पण मिळालेला वेळ आणि पगारदेखील सुषमाला फँन्सी कपडे,मेक-अप,खाण्या-पिण्याच्या पार्ट्या,सिनेमे आणि इतर अव्याहत खर्चासाठी पुरत नव्हता.राधाबाईंना असही ऐकायला मिळाल होत की,"आय.टी.कंपनीत काम करुन गलेलठ्ठ पैसा मिळविणारी सुषमा नवऱ्यासोबतच दारुही प्यायला शिकलेली",पण शहरात थोड चालत असेल असा ग्रह करुन भाबड्या राधाबाईंनी मनाची समजूत घातलेली.
     एव्हाना सकवराबाई,राधाबाईंच्या घरी येऊन पोहोचलेल्या. त्या राधाबाईंना हाकारुन उठवत होत्या,पण काही केल्या राधाबाई उठत नव्हत्या.नंतर त्यांनी राधाबाईंना गदागदा हलवून उठविण्याचा देखील प्रयत्न केला पण तरीही त्या उठेनात.सकवराबाईंनी एकच टाहो फोडला.त्यांच्या जीवाभावाची, २० वर्षे कामात साथ देणारी भोळीभाबडी राधा या जगात राहिली नव्हती.ती देवाला प्यारी झाली होती.सकवराने फोडलेला टाहो ऐकून,तिच्या आरडून-ओरडून रडण्याने सगळा गाव आणि राधाबाईची आख्खी पवाराची भावकी गोळा झाली होती. सगळा गाव हळहळत होता.एव्हाना दुपार झालेली,पण सुषमा अजून आली नव्हती.सकाळीच गावकऱ्यांनी तिला निरोप पोहोचवला होता.अंत्यसंस्कारासाठी ताठकळत बसलेल्या गावकऱ्यांचा संयम आता संपत आला होता.म्हणून त्यांनी एकदा सुषमाला शेवटचा फोन करून पाहायचं ठरवलं. शेवटी सरपंच शामराव पाटलांनी पुढाकार घेऊन फोन लावला.नशेत तर्र असलेल्या सुषमाने फोन उचलताच सरपंचांनी विचारले,
"ते नव्हं,सुषमा बाळ,तु कुठवर आली हायस??आम्ही अजून किती वकुत वाट पाहायची??"

सुषमा,"तुम्ही अंत्यसंस्कार करून घ्या.माझ्या येण्याने काही ती आता जीवंत नाही होणार,आणि माझ्याकडे आता तेवढा वेळ पण नाही." 

सरपंच,"आगं पोरी आस वाईट-वंगाळ नगु बोलुस,आय हाय तुजी ती,तुला तिचा मुखडा शेवटचा एकदा बगु वाटत आसल की गं लेकरा??"

सुषमा,"मला तिचा फोटो व्हाट्स-अँप ला पाठवा की,वेळ मिळाला की पाहून घेईन मी."

सरपंच,"आगं यीडी का खुळी-बिळी झालीस तु,फुटुत तिच त्वांड मस्त बघशील ग पण तिच्या अस्थी पंढरीच्या चंद्रभागेत कोण ग सोडणार बाईई??"

सुषमा,"त्याच तुम्ही मला कुरिअर पाठवा,पुढचं माझ मी बघते,आणि खर्चाचं सांगा मी पैसे पाठवुन देते."
हे ऐकताच तळपायाची आग मस्तकात गेलेल्या शामरावांनी दणकन फोन आदळला.गावकऱ्यांनी राधाबाईंचे अंत्यसंस्कार यथोचित पार पाडले.सकवराचा थोरला ६ वी नापास झालेला लेक सुनीलने राधाबाईंना मुखाग्नी दीला.सुषमाला मात्र काबाडकष्ट करणाऱ्या आईचा विसर पडला.शिक्षित होऊन आय.टी.त काम करताना आणि शहरातल्या आभासी,अस्थायी जीवनाची भुरळ पडलेली सुषमा वास्तव जीवनातील स्थायी नाती विसरून गेली.आय.टी. तल्या यशाने तिला हुरळून घालवलं आणि कदाचित त्यामुळेच मातीशी असलेली नाळ तिने तोडली.शिकलेल्या लेकीच्या गाडीतून पंढरीच्या विठुबाकडं जायचं स्वप्न पाहणाऱ्या राधाबाईचं हे स्वप्न सुनील आणि शामरावांनी पुर्ण केलं ,तिच्या अस्थी विठुबाचरणी चंद्रभागेत अर्पण करुन.
माणुसकी हरवत चाललेल्या समाजात मुलामुलींच्या अशाच सुषमा निर्माण होऊ लागल्या तर कुटुंब व्यवस्था कोलमडून पडेल यात तिळमात्र शंका नाही.
@अमित जालिंदर शिंदे.
टिप-सदर कथेतील सर्व पात्रे आणि घटना काल्पनिक असुन त्यांचा वास्तवाशी काही संबंध नसला तरी त्या सद्यस्थितीवर भाष्य करतात.

1 comment:

  1. स्वप्नांचा पाठलाग करताना माती विसरणार्या तरूणाईचे खूप चांगल्या पद्धतीने सर्वेक्षण केले आहे.....

    ReplyDelete

न्यूझीलंड,कोरोना,नागरीक आणि जेसिंडा आर्डर्न... न्यूझीलंड देशाचा राष्ट्रध्वज      न्यूझीलंड, प्रशांत महासागराने चौफेर वेढलेला एक बे...