Sunday, February 18, 2018

मी कुणबी बोलतोय

                         मी कुणबी बोलतोय...
आज शेतकरी चोहोकडूंन मरतोय,
कधी दुष्काळाने करपतोय तर कधी गारपिटीने गारठतोय,
हाती आलेल्या पिकांवर निसर्गच अतिवृष्टीचा नांगर फिरवतोय,
मी या साऱ्या आस्मानी संकटांचा नरबळी बोलतोय,
होय तरीही न डगमगणारा मी कणखर कुणबी बोलतोय.

आस्मानाशी लढता लढता सुल्तानाशीही लढतोय,
विकासाच्या समृद्धीतल्या काळ्या आईच्या मोबदल्यासाठी मी झगडतोय,
सहन न होणाऱ्या लाचारीसाठी मी कधी मंत्रालयात विषही पितोय,
होय मी या पाशवी व्यवस्थेचा नरबळी बोलतोय,
मी या व्यवस्थेशी लढणारा लढवय्या कुणबी बोलतोय.

ऊसाच्या दरांसाठी कधी मी रस्त्यावर येतोय,
तुरी आणि सोयाबीन मधे सरकारी राक्षसच मला फसवतोय,
कापसातला बीटी मला बोंडअळीत तसाच दीसतोय,
या साऱ्यांच्या खर्चापायी अनुदानासाठी सरकारपुढे हात पसरतोय,
जगाला पोसुनदेखील मीच लाचार होतोय,
होय मी स्वाभीमानासाठी धडपडणारा कुणबी बोलतोय.

मी संकटे झेलतोय,
परत मातीत बिया टाकून शेतीचा सट्टा लावतोय,
कष्टाच्या घामाने नशिब आजमावतोय,
होय मी हार न मानता परत उभा राहणारा जिद्दी कुणबी बोलतोय.
@अमित जालिंदर शिंदे

Wednesday, February 7, 2018

शेतकऱ्याची आशावादी प्रतिमा.


सर्वसाधारणपणे शेतकरी म्हणलं की डोळ्यांसमोर एक चित्र उभा राहतं.आजच्या रंगीत दूनियेतदेखील हे चित्र ब्लॅक अँड व्हाइट च दिसतं.शेतकरी म्हणल की डोळ्यासमोर येते ती वर्षानुवर्षे दुष्काळाच्या झळा सोसलेली,पावसाच्या प्रत्येक थेंबासाठी आसुसलेली,भेगाळलेली काळीभोर जमीन;त्या जमिनीमध्ये उंचच उंच वाळलेल्या चिलार- बाभळी आणि काटेरी झुडुपे;त्या झुडूपांच्या आडोश्याला अनवाणी पायाने बसलेला,सडपातळ बांध्याचा काळ्याकभिन्न देहाचा आणि पावसाची वाट पाहात आकाशाकडे पाहणारा एक सुरकुतल्या चेहऱ्याचा जीव.पण या प्रतिमेला छेद देणारा एक फोटो सध्या इंस्टाग्राम वर प्रचंड व्हायरल होतोय.आदित्य गुंड नावाच्या तरुणाने इंस्टाग्राम वर पोस्ट केलेल्या या फोटोमध्ये एक ८-१० वर्षे वयाचा शेतकरी आपल्या नजरेस पडतो.आदित्य ने टिपलेल्या शेतकऱ्याच्या या प्रतीमेमध्ये दुष्काळाचा,शेताला पडलेल्या भेगांचा, नापिकीचा,कर्जबाजारीपणाचा लवलेशदेखील नाही.ह्या प्रतीमेतला शेतकरी कसल्याच निराशेच्या गर्तेत अडकलेला दिसतं नाही,यासाऱ्याच्या उलट शेतीची गोडी लागलेला हा शाळकरी पोरं उद्याच्या कृषिप्रधान भारताच्या समृद्ध शेतीच प्रतिकच मानावा लागेल.यांच्यासारख्या असंख्य सुशिक्षित शेतकऱ्यांची आज भारतीय शेतीला निश्चितपणे गरज आहे.कारण आजचा शेतकरी आत्महत्या शेती पिकली नाही म्हणून करत नाही तर पिकलेल योग्य दरात विकल नाही म्हणून करतो.आणि पिकलेले कसं योग्य दरात विकायचं याचं शहाणपण शेतीच वेड असल्याशिवाय आणि ग्राहकांचं मन ओळखल्याशिवाय येत नाही.हे शहाणपण या चिमुरड्याला नक्कीच आल असेल कारण या चिमुरड्याच्या डोळ्यात शेतीच्या बळावर जग जिंकण्याचा ,आणि शेती समृद्ध करण्याचा आशावाद निर्भेळपणे दिसतोच आहे.तो आशावाद ना लपवला जाऊ शकतो ना तो पाहणाऱ्याच्या दृष्टीआड होऊ शकतो.शेतीची आणि शेतकऱ्याची ही आशावादी प्रतिमा अशीच टिकून राहिली तर नक्कीच उद्याच्या शेतीला चांगले दिवस येतील यात शंका नाही.
@अमित जालिंदर शिंदे

न्यूझीलंड,कोरोना,नागरीक आणि जेसिंडा आर्डर्न... न्यूझीलंड देशाचा राष्ट्रध्वज      न्यूझीलंड, प्रशांत महासागराने चौफेर वेढलेला एक बे...