Sunday, July 29, 2018

सुस्तावलेले अधिकारी थंडावलेली व्यवस्था...

  सुस्तावलेले अधिकारी आणि थंडावलेली व्यवस्था 
यावर्षी म्हणजेच शैक्षणिक वर्ष सण २०१८/१९ साठी  च्या पदव्युत्तर  कृषी पदवीची प्रवेश प्रक्रिया अद्याप म्हणजे दि -२७/०७/२०१८ पर्यंत सुरु झाली नव्हती.मागील वर्षी हि प्रवेश प्रक्रिया दि -१०/०७/२०१७  ला सुरु झाली होती.मागील वर्षी प्रवेश पूर्ण होऊन दि १२/०८/२०१७ ला कॉलेज सुरु झाली होती. २५/०३/२०१८ ला सामाईक परीक्षा होऊनदेखील प्रवेश प्रक्रियेला उशीर  झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये घबराट आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.आणि यासंबंधी अधिक माहिती मिळवण्यासाठी किंवा चौकशी करण्यासाठी प्रवेश प्रक्रिया राबवणाऱ्या महाराष्ट्र कृषी शिक्षण आणि संशोधन परिषद पुणे याना कॉल केले असता सकाळी १० तर संध्याकाळी ५ या वेळेत त्यांचा फोन बंद असायचा आणि इतर वेळी मात्र रिंग व्हायची .त्यामुळे दि -२७/०७/२०१८ रोजी मी दैनिक ऍग्रोवन यांचे पुणे जिल्ह्यातील वार्ताहर मा.मनोज कापडे सर यांच्याकडे या संबंधित तक्रार केली.तक्रार केल्यानंतर दि -२८/०७/२०१८ रोजीच्या दैनिक ऍग्रोवन ला प्रवेश प्रक्रिया सोमवारपासून म्हणजेच दि -३०/०७/२०१८ पासून राबविण्यात येत असल्याचे विधान शिक्षण संचालक श्री हरिहर कौसडीकर यांनी केल्याचे छापून आले.या संपूर्ण घटनेवरून असेच लक्षात येते कि सुस्तावलेल्या अधिकाऱ्यांना हलवून जागे केल्याशिवाय थंडावलेली व्यवस्था गतिमान होत नाही.
दि-२८/०७/२०१८ च्या दै.अँग्रोवन मध्ये आलेली बातमी..
या फोटोमध्ये आपण केलेली तक्रार आणि सरांनी दिलेले आश्वासन यांचा उल्लेख आहे.


Wednesday, July 25, 2018

बेंदूर

   
 
     महाराष्ट्र हा शेतकऱ्यांचा प्रदेश आणि विठ्ठल हा शेतकऱ्यांचा देव.त्यामुळे खरिपाच्या पेरण्या झाल्यावर पिकाने माना वर काढल्या कि शेतकरी विठुरायाच्या वारीला जायला रिकामा होतो.जेष्टी पौर्णिमेच्या नंतर सातव्या किंवा आठव्या दिवशी संत तुकाराम महाराज,माउली ज्ञानेश्वर महाराज,आणि सर्व संतसज्जनांच्या पालख्या पंढरीकडे प्रस्थान करतात .उभ्या जगाला पोसणार पोशिंदा बळीराजा देखील या संतसज्जनांच्या सोबतीने सावळया पांडुरंगाच्या दर्शनाची आस घेऊन पायी  पंढरीची वाट चालतो.आषाढी एकादशीला हा वारकरी शेतकरी पंढरीत विठ्ठल आणि रखुमाईचं दर्शन घेतो.चंद्रभागेच्या तीर्थामध्ये पुण्याची डुबकी घेतो आणि प्रसन्न मनाने आपल्या घराकडे जातो.वारीच्या या दिवसांमध्ये तो घरदार,संसार सगळं विसरून फक्त विठ्ठलभक्तीत तल्लीन होऊन जातो.कारण २०-२२ दिवसांच्या या प्रवासात घराचा आणि त्याचा संपर्क होतच नाही.कारण काही वर्षांपूर्वीपर्यंत हे मोबाईल नावाचं फ्याड शेतकऱ्याला मिळालंच नव्हतं.वारी म्हणजे सांसारिक आणि कष्टाच्या ताणतणावातून मुक्तीचे अनमोल क्षण असायचे.या वारीमध्ये कुणी लहान नसतो कि कुणी मोठा नसतो.कुणी गरीब नसतो कि कुणी श्रीमंत नसतो.कुणी स्त्री नसते कि कुणी पुरुष नसतो.कुणी स्पृश्य नसतो कि कुणी अस्पृश्य कारण विठुरायाच्या या मांदियाळीत प्रत्येकजण फक्त माउली असतो.हि आषाढी वारी झाली कि घरी जाताच बेंदूर आलेला असतो.आषाढीच्या निमित्ताने धन्याची दिवाळी झालेली असते पण धन्यासाठी काम करणाऱ्या त्याच्या बैलांची,दूध दुभती देणाऱ्या म्हशींची,खत गोमूत्र दूध देणाऱ्या गायीची ,ताजा पैसा मिळवून देणाऱ्या शेळ्यामेंढ्यांची दिवाळी मात्र बेंदरालाच असते.

     घरच्या मुक्या जीवांच्या प्रति क्रुतज्ञता व्यक्त करण्याचा हा एक मराठी सण आहे. शेतकरी मुक्या जीवांची पूजा करतात. महाराष्ट्रासारख्या शेतीप्रधान राज्यात, व तेथील शेतकऱ्यांत या सणाला विशेष महत्त्व आहे.

     या दिवशी बैलांंचा,गायी-म्हशींचा थाट असतो. त्यांना कामापासून आराम असतो. या दिवशी जनावरांना आवरण्यासाठी चाबुक(आसुड) वापरण्यात येत नाही. बेंदुराच्या आदल्या दिवशी जनावरांना ज्वारीचा खिचडा खायला देण्यात येते. बेंदुराच्या दिवशी त्यांना नदीवर/ओढ्यात नेउन त्यांना अंघोळ घालण्यात येते. नंतर चारून घरी आणण्यात येते. या दिवशी बैलाच्या खांद्याला हळद व तुपाने शेकतात. याला 'खांद शेकणे' म्हणतात.यावेळी जनावरांना विशेष करुन बैलांना पाठीवर  नक्षी केलेली झूल, सर्वांगावर गेरूचे ठिपके, शिंगांना बेगड, डोक्याला बाशिंग,  गळ्यात कवड्या व घुंगरांच्या माळा, नवी वेसण, नवा कासरा पायात चांदीचे वा करदोड्याचे तोडे घालतात. त्याला खायला गोड पुरणपोळी व सुग्रास अन्नाचा नैवेद्य देतात. जनावरांची निगा राखणाऱ्या घरगड्यास नवीन कपडे देण्यात येतात.

     या सणासाठी शेतकऱ्यांमध्ये उत्साह असतो. गावात निघणाऱ्या मिरवणुकीत आपला बैल उठून दिसावा यासाठी शेतकरी आपल्या ऐपतीप्रमाणे त्याचा साजशृंगार खरेदी करतात. बैल सजवितात व हलगीच्या ठोक्यावर बैलांना गावातुन मिरवून आणतात.अलिकडच्या काळात मात्र माणसाच्या बदलत्या जीवनशैलीमुळे हे गावरान गावाकडचे सण साजरे करण्याच्या पद्धतीही बदलत चालल्या आहेत.ग्रामीण भागात देखील नागरी संस्कृती रुजत असल्या कारणाने काही भागात बेंदुर साजरा करणे म्हणजे केवळ ते कर्तव्य पार पाडणे असे झाले आहे.त्यातील मुक्या जणावरांविषयीची आपुलकी कमी झाली आहे.बेंदुर साजरा करण्याची हि आपली संस्कृती जतण करणे गरजेचे आहे तरच ती संस्कृती पुढच्या पिढीला ज्ञात होईल अन्यथा नामशेष होईल.
@अमित जालिंदर शिंदे

Saturday, July 14, 2018

महाराज तुम्ही खुशाल निघा...

     दि-१२ आणि १३ जुलै १६६० चा तो दिवस,हिंदवी स्वराज्याच्या इतिहासात सुमारे ३०० मावळ्यांनी रक्ताच्या अभिषेकाने घोडखिंडीला पावणखिंड बणविण्याचा दिवस,स्वराज्याच्या रयतेच्या धन्यास वाचविण्यासाठी प्रतिशिवाजी बनुन शत्रूच्या गोटात जाऊन साक्षात म्रुत्यु ला आलिंगन देण्याच्या वीर शिवा काशिद च्या धाडसाच्या अमरत्वाचा दिवस.स्वामीनिष्टा काय असावी याच सर्वोत्तम उदाहरण म्हणजे वीर शिवा काशिद यांचे बलिदान.पुढे पन्हाळगडाचा वेढा...सिद्दी जौहर...२०,००० पायदळ,१५,००० घोडदळ,आधुनिक तोफा आणि मोजक्या बंदुका...शिवा काशिद यांचे बलिदान... महाराज विशाळगडाकडे रवाना...सिद्दी मसुदने केलेला पाठलाग... बाजी प्रभु आणि फुलाजी प्रभु देशपांडे बंधूंचा दैदिप्यमान पराक्रम... घोडखिंडीत निकराची लढाई... महाराज विशाळगडावर... तोफांचे आवाज...३०० मावळ्यांसह बाजी प्रभू चे हौतात्म्य हि शिवइतिहासातील जाज्वल्य घटना तमाम मराठी जनांनाच नव्हे तर अखंड हिंदुस्थानाला मुखोद्गत आहेच.आज वीर शिवा काशिद, बाजी प्रभू आणि फुलाजी प्रभू देशपांडे बंधू आणि ३०० मावळ्यांच्या हौतात्म्याला ३५८ वर्षे पुर्ण झाली.पण या अमर कहाणी तुन आजचा आमचा महाराष्ट्र काय शिकतो हे अधिक महत्त्वाचे आहे कारण महाराजांच्या नावाने नुसतीच घोषणाबाजी करण्यापेक्षा महाराजांच्या आणि त्यांच्या मावळ्यांच्या चित्तथरारक इतिहासातुन आम्ही चांगले विचार आत्मसात करणे हिच सर्वात मोठी आदरांजली त्या इतिहासाला आणि महाराजांना असेल यात शंका नाही.सोशल मीडिया वरच्या बेधुंद आणि ध्येयाचे रस्ते चुकलेल्या तरुणाईला शिवा काशिद आणि बाजी प्रभुंचे बलिदान कसे प्रेरणादायक आहे आणि त्यातुन आजच्या तरुणाईने आणि अखंड समाजाने काय शिकावे हेच आज मला एका व्हिडीओ च्या माध्यमातून आपल्याला दाखवायचे आहे.१७ मिनिटांचा हा व्हिडीओ नक्कीच तुमच्या आयुष्यात आमुलाग्र बदल घडवून आणेल आणि आपल्या सर्वांना स्वताच्या ध्येयसाधनेसाठी आत्मबळ मिळवुन देईल अशी मला अपेक्षा आहे. शिववक्ते श्री.विनोद अनंत मेस्त्री यांनी सादर केलेले हे घोडखिंडीच्या पावणखिंड होण्याचे स्फुर्तीदायक कथानक नक्की पाहा आणि हौतात्म्यांना आदरांजली वाहा हिच विनंती🙏🏻🙏🏻🙏🏻
 टीप - या व्हिडीओ सोबत च श्री.विनोद मेस्त्री यांचीच महाराज तुम्ही खुशाल निघा ही कविता मुद्दाम जोडली आहे.


                     महाराज तुम्ही खुशाल निघा,
                     महाराज तुम्ही खुशाल निघा.
  हिंमत काय शत्रुची ही खिंड ओलांडायची जोवर इथं पर्वत                           बनुन तुमचा बाजी उभा,
                     महाराज तुम्ही खुशाल निघा.
      माहितीये मला असं निघण जड जातय राजे तुम्हाला,
   आम्हाला अस सोडून जाणं लागत असेल तुमच्या जीवाला.
        लढण्याच बळ तुम्ही दीलं आणि जगण्याला दीशा,
      तुमच्यासाठी हजारदा मरु तुम्ही स्वराज्यासाठी जगा,
                    महाराज तुम्ही खुशाल निघा.
       कल्पना आहे येतील हजारो घोंघावत वादळापरी,
    हटणार नाही किंचीतही मागे कोसळले बनुन लाट जरी.
       ताकद नाही कशातही हरवण्याची या हिंमतीला,
        निश्चयाची मुळे खोलवर रोवून राहीन मी उभा,
                    महाराज तुम्ही खुशाल निघा.
       विशाळगडावर महाराज बाजींसाठी व्याकुळलेले,
        आले बाजी पालखीमधुनी अंग अंग विखुरलेले.
     म्रुत्युलाही थोपविले त्यांनी दोन प्रहर जिद्दीने झुंजून,
          असंख्य वार झेलून शरीर गेले होते पिंजुन.
       तोफांचा आवाज होता म्रुत्युलाही हायसे वाटले ,
                   गेले बाजी खिंड पावण झाली,
            ३०० मावळ्यांच्या पराक्रमाची शर्थ झाली.
             आसवांना माझ्या मी आवर घालू कसा, 
                  माझा बाजी असा जाईनच कसा.
   अरे अमर झाला आठवेल तो सतत खिंडीच्या तोंडाशी उभा          विनवित मला आकांताने महाराज तुम्ही खुशाल निघा,
                   महाराज तुम्ही खुशाल निघा.
@अमित जालिंदर शिंदे

न्यूझीलंड,कोरोना,नागरीक आणि जेसिंडा आर्डर्न... न्यूझीलंड देशाचा राष्ट्रध्वज      न्यूझीलंड, प्रशांत महासागराने चौफेर वेढलेला एक बे...