Wednesday, July 25, 2018

बेंदूर

   
 
     महाराष्ट्र हा शेतकऱ्यांचा प्रदेश आणि विठ्ठल हा शेतकऱ्यांचा देव.त्यामुळे खरिपाच्या पेरण्या झाल्यावर पिकाने माना वर काढल्या कि शेतकरी विठुरायाच्या वारीला जायला रिकामा होतो.जेष्टी पौर्णिमेच्या नंतर सातव्या किंवा आठव्या दिवशी संत तुकाराम महाराज,माउली ज्ञानेश्वर महाराज,आणि सर्व संतसज्जनांच्या पालख्या पंढरीकडे प्रस्थान करतात .उभ्या जगाला पोसणार पोशिंदा बळीराजा देखील या संतसज्जनांच्या सोबतीने सावळया पांडुरंगाच्या दर्शनाची आस घेऊन पायी  पंढरीची वाट चालतो.आषाढी एकादशीला हा वारकरी शेतकरी पंढरीत विठ्ठल आणि रखुमाईचं दर्शन घेतो.चंद्रभागेच्या तीर्थामध्ये पुण्याची डुबकी घेतो आणि प्रसन्न मनाने आपल्या घराकडे जातो.वारीच्या या दिवसांमध्ये तो घरदार,संसार सगळं विसरून फक्त विठ्ठलभक्तीत तल्लीन होऊन जातो.कारण २०-२२ दिवसांच्या या प्रवासात घराचा आणि त्याचा संपर्क होतच नाही.कारण काही वर्षांपूर्वीपर्यंत हे मोबाईल नावाचं फ्याड शेतकऱ्याला मिळालंच नव्हतं.वारी म्हणजे सांसारिक आणि कष्टाच्या ताणतणावातून मुक्तीचे अनमोल क्षण असायचे.या वारीमध्ये कुणी लहान नसतो कि कुणी मोठा नसतो.कुणी गरीब नसतो कि कुणी श्रीमंत नसतो.कुणी स्त्री नसते कि कुणी पुरुष नसतो.कुणी स्पृश्य नसतो कि कुणी अस्पृश्य कारण विठुरायाच्या या मांदियाळीत प्रत्येकजण फक्त माउली असतो.हि आषाढी वारी झाली कि घरी जाताच बेंदूर आलेला असतो.आषाढीच्या निमित्ताने धन्याची दिवाळी झालेली असते पण धन्यासाठी काम करणाऱ्या त्याच्या बैलांची,दूध दुभती देणाऱ्या म्हशींची,खत गोमूत्र दूध देणाऱ्या गायीची ,ताजा पैसा मिळवून देणाऱ्या शेळ्यामेंढ्यांची दिवाळी मात्र बेंदरालाच असते.

     घरच्या मुक्या जीवांच्या प्रति क्रुतज्ञता व्यक्त करण्याचा हा एक मराठी सण आहे. शेतकरी मुक्या जीवांची पूजा करतात. महाराष्ट्रासारख्या शेतीप्रधान राज्यात, व तेथील शेतकऱ्यांत या सणाला विशेष महत्त्व आहे.

     या दिवशी बैलांंचा,गायी-म्हशींचा थाट असतो. त्यांना कामापासून आराम असतो. या दिवशी जनावरांना आवरण्यासाठी चाबुक(आसुड) वापरण्यात येत नाही. बेंदुराच्या आदल्या दिवशी जनावरांना ज्वारीचा खिचडा खायला देण्यात येते. बेंदुराच्या दिवशी त्यांना नदीवर/ओढ्यात नेउन त्यांना अंघोळ घालण्यात येते. नंतर चारून घरी आणण्यात येते. या दिवशी बैलाच्या खांद्याला हळद व तुपाने शेकतात. याला 'खांद शेकणे' म्हणतात.यावेळी जनावरांना विशेष करुन बैलांना पाठीवर  नक्षी केलेली झूल, सर्वांगावर गेरूचे ठिपके, शिंगांना बेगड, डोक्याला बाशिंग,  गळ्यात कवड्या व घुंगरांच्या माळा, नवी वेसण, नवा कासरा पायात चांदीचे वा करदोड्याचे तोडे घालतात. त्याला खायला गोड पुरणपोळी व सुग्रास अन्नाचा नैवेद्य देतात. जनावरांची निगा राखणाऱ्या घरगड्यास नवीन कपडे देण्यात येतात.

     या सणासाठी शेतकऱ्यांमध्ये उत्साह असतो. गावात निघणाऱ्या मिरवणुकीत आपला बैल उठून दिसावा यासाठी शेतकरी आपल्या ऐपतीप्रमाणे त्याचा साजशृंगार खरेदी करतात. बैल सजवितात व हलगीच्या ठोक्यावर बैलांना गावातुन मिरवून आणतात.अलिकडच्या काळात मात्र माणसाच्या बदलत्या जीवनशैलीमुळे हे गावरान गावाकडचे सण साजरे करण्याच्या पद्धतीही बदलत चालल्या आहेत.ग्रामीण भागात देखील नागरी संस्कृती रुजत असल्या कारणाने काही भागात बेंदुर साजरा करणे म्हणजे केवळ ते कर्तव्य पार पाडणे असे झाले आहे.त्यातील मुक्या जणावरांविषयीची आपुलकी कमी झाली आहे.बेंदुर साजरा करण्याची हि आपली संस्कृती जतण करणे गरजेचे आहे तरच ती संस्कृती पुढच्या पिढीला ज्ञात होईल अन्यथा नामशेष होईल.
@अमित जालिंदर शिंदे

No comments:

Post a Comment

न्यूझीलंड,कोरोना,नागरीक आणि जेसिंडा आर्डर्न... न्यूझीलंड देशाचा राष्ट्रध्वज      न्यूझीलंड, प्रशांत महासागराने चौफेर वेढलेला एक बे...