Thursday, August 15, 2019

महापुर

महापुर
     पुराच पाणी वाढतच होत. काही वेळापुर्वी घोट्याला लागणारं पाणी आता गुडघ्यापर्यंत आलं होतं. कृष्णामाई पहिल्यांदाच एवढी कोपली होती. नुकतीच बाळंतीण झालेली सदा आबा ची थोरली लेक अजून ओल्याची सुकी झाली नव्हती. वाढत पाणी बघुन धाकला राजू तिला घेऊन घटकाभरापूर्वीच शिरढोणाला मामाकडे गेला होता. पुराच्या वाढत्या पाण्यात बुडता संसार सदाआबा ला उघड्या डोळ्यांनी दिसत होता, पण बाळंतीण थोरली लेक आणि एकुलता एक राजू दोघांना सुखरूप मामाकडे धाडल्याचं वेगळचं समाधान त्याच्या चेहऱ्यावर दिसत होत. पावसाने जोर धरला होता. वरुणराजा काळ बनून बरसत होता. पाणी वाट मिळेल त्या दिशेने प्रवाह बदलत होतं. एकापाठोपाठ एक घरात घुसत होत. सदा आबाचं सारवलेल अंगण कधीच उखडल होतं. जणावरांची दावण पाण्याखाली गेली होती. बैलांना पाणी लागु नये म्हणून घराच्या बाजूलाच घातलेल्या बांधावर त्यान बैलांच्या खुंट्या मारल्या होत्या. शेजारच्या गावात सकाळीच पाणी घुसल्याने आणि तेथील जीवंत जनावर पुराच्या पाण्यात वाहुन गेल्यामुळे राऊतवाडी थोडी सावध झाली होती. पण घरातली राजू ची महत्त्वाची कागदपत्रे, वह्या पुस्तके, जमीनींचे दस्त, धान्य ,पिठं, आणि पाणी लागल्याने खराब होणारं सामान आवरून माळ्यावर टाकण्याच्या नादात त्याची जित्राब दोन बैल आणि एक म्हैस गावाबाहेर टेकाडावर असलेल्या पाटलाच्या मळ्यात नेता आली नाहीत.पाणी अजून वाढतच होत. आता माळ्यावरची जागाही संपली होती. भांडीकुंडी, कपडेलत्ते, अंथरूणे, इ. गोष्टी तशाच जिथल्या तिथ जागेवर पडलेल्या होत्या. आता पाणी बैलांच्या पायाला लागायला लागलं तस सदा आबाच्या काळजात धस्स झालं. एव्हाना वस्तीवरच्या सगळ्याच शेजारी पाजाऱ्यांची जमेल तेवढ सामान आटोपून घराबाहेर पडायची लगबग सुरू झालेली. सदा आबानं बायको रुक्मिणीला थोडे कपडे आणि मौल्यवान दागदागिने घेऊन घरातून बाहेर आणलं. दारावर मोठ टाळ ठोकलं, म्हशीचा दोर सोडून रुक्मिणीच्या हातात दिला. तिला म्होर घालून सदा आबा दोन्ही बैलांचे दोर घेऊन टेकावरच्या पाटलाच्या मळ्याची वाट चालू लागला. ३-४ कि.मी. अंतरावर असलेल्या पाटलाच्या मळ्यात सगळ्या राऊतवाडीच्या जनावरांची छावणी पडलेली. तिथून हाकेच्या अंतरावर जि.प. च्या प्राथमिक शाळेत गावातल्या बायकापोरांचा गलका झालेला. गावातली गडीमाणस अजून गावात अडकलेली जनावर, म्हातारी माणसं, जेवणाखाण्याच सामान गोळा करून शाळेत आणून टाकत होती. सदाआबा आणि रुक्मिणी झपाझप पावले टाकत होती. वरुन आभाळ गळतच होतं. खाली पाण्याची पातळी वाढुन पाणी कमरेला लागलं होतं. जनावरांचे पाय उचलत नव्हते. पाण्याच्या प्रवाहात तोल सावरत नव्हता. चिखलात पाय जास्तच अडकत होते. पावसान आणि पुराच्या पाण्यानं हैदोस घातला होता. दोघांचाही जीव रडकुंडीला आला होता. पण पाण्यात जलसमाधी मिळायच्या अगोदर पाटलाच्या मळ्यात पोचायच होतं. 
     सदा आबा आणि रुक्मिणी आता निम्म्याहून जास्त अंतर चालून आले होते. अंधार पडायला लागला होता. दिवस मावळायच्या अगोदर समोरचा पिंपळओढा पार करायचा होता. दुथडी वाहणारा आणि पुराच्या पाण्यानं पात्र विस्तारलेला पिंपळओढा ओलांडला की पुढं पाण्याची पातळी कमी होणार होती. राऊतवाडीच्या एका बाजूने कृष्णामाई आणि दुसऱ्या बाजूने पिंपळओढा वाहात होता. सदा आबाच्या ५७ वर्षाच्या जीवनात पहिल्यांदाच कृष्णामाईने पिंपळओढा गाठलेला होता. नदी आणि ओढ्याच पात्र एकच झालं होत. सगळ्या राऊतवाडीत पाणी घुसल होतं. पिंपळओढ्यावर पक्का पुल नव्हता. लाकडाच्या फळ्या एकमेकांना जोडून आणि लोखंडाचे डांब आडवे टाकून त्यावरून पलिकडे जायला रस्ता केलेला. एरवी या रस्त्यावरून फक्त पायी शेतात जाणारी माणसं  आणि एखाद दुसरा सायकल सवारीच जायचा. ओढ्यावचा रस्ता देखील पाण्याखालीच गेलेला. पण पाटलाच्या मळ्यात नेहमी ये-जा असल्याने सदा आबाला तो चांगलाच अंगवळणी पडला होता. रस्त्याचा अंदाज घेऊन त्यान रुक्मिणी ला पुढे जायला सांगितलं. रुक्मिणी आणि तिच्या पाठोपाठ सदा आबाची म्हैसदेखील ओढा पार करून पलिकडे गेली. पलिकडे पाणी कमी होत. आता सदा आबाला जरा हायस वाटत होतं. तोही रुक्मिणीपाठोपाठ ओढा ओलांडायला लागला. त्याच्या पाठोपाठ त्याचे दोन्ही बैल एकदमच ओढा ओलांडायचा प्रयत्न करीत होते. अरुंद फळ्यांच्या त्या रस्त्यावर दोन बैल बसणार नव्हते. इतक्यात सर्जा चा सावळ्याला धक्का बसला. सावळ्याचा एक पाय फळीवरुन खाली घसरला. गारठलेला सावळ्या ओढ्याच्या पाण्यात आडवा झाला. चिखल तुडवून तुडवून आणि कमरेएवढ्या पाण्यात चालून थकलेल्या सावळ्याला उठता येईना. सावळ्या पाण्यात आडवा झाल्याने बुजलेला सर्जा कधीच धाऊन ओढ्यापलीकडे गेलेला. जाताना सदाआबालाही धक्का देऊन गेलेला. सदाआबाने पाण्यात पडूनदेखील सावळ्याच दाव हातातून सोडलं नव्हतं. सावळ्या ओढ्याच्या प्रवाहात वाहत होता. पाय हलवुन उठण्याचा प्रयत्न करत होता. पण प्रवाहाला वेग असल्यामुळे तो अजून पुढे जात होता. सदा आबा सावळ्याला सोडायला तयार नव्हता. तोहि सावळ्यासोबत प्रवाहात ओढला जात होता. रुक्मिणी धाय मोकलून रडत होती. आरडाओरडा करत होती. अंधार पडायला लागला होता. रुक्मिणी आणि सदाआबा सोडून सगळेच पाटलाच्या मळ्यात होते. रुक्मिणीचा टाहो कुणाच्याच कानी पडत नव्हता. इतक्यात वाहणाऱ्या सदाआबाच्या हाती ओढ्याकाठच्या वडाची पारंबी लागली. सदा आबाने ती घट्ट पकडली. दुसऱ्या हातात सावळ्याच्या गळ्यात बांधलेला दोर होता. प्रवाहाबरोबर सावळ्या पुढ ओढ घेत होता. सदा आबाने वडाची पारंबी घट्ट पकडून सदाआबा ओढ्याच्या काठाला यायचा प्रयत्न करत होता. त्यामुळे सावळ्याच्या गळ्यातला दोर सावळ्याला फास आवळत होता. सावळ्या मोठ्यानं हंबरडा फोडत होता. शेवटी निसरडा झालेला दोर सदा आबाच्या हातून निसटला आणि सावळ्या ओढ्याच्या प्रवाहात पाण्याच्या गतीने वाहायला लागला.सावळ्यानं जेव्हा हंबरडा फोडला तेव्हाच गळ्याला फास लागुन जीव सोडला होता. त्यामुळे पुराच्या पाण्यातून वाहताना उभा राहण्यासाठीची त्याची धडपडदेखील बंद झालेली. सदा आबा च्या हातातून सावळ्याचा दोस सुटला पण सुटताना हात कापून सुटला. सदा आबा च्या हातातून रक्ताची लाल भडक धार पाण्यात पडत होती . वाहत्या पाण्यात पडताच नाहिशी होत होती. सावळ्या वाहुन जाताना पाहून तो सुन्न झाला होता. सदा आबाच्या दारातच जन्म झालेल्या सावळ्याला त्याच्या रंगामुळे सदा आबाने सावळ्या नाव ठेवलं होत. पोटच्या पोराप्रमाणे सावळ्याला सांभाळल होतं. सावळ्यानदेखील धन्याची मनोभावे सेवा केली होती. सावळ्या आणि सदा आबा च नात पितापुत्रासारख होत. सदा  आबा कधी बाहेर गेला तर सावळ्या गवताच्या काडीलादेखील तोंड लावत नसे. आणि सावळ्याच्या काळजीपोटी सदा आबा पण कधी घर सोडून बाहेर कुण्या पै-पाहुण्यांकडे मुक्कामी जात नव्हता. एका क्षणात सावळ्याचा सगळा जीवनप्रवास सदा आबाच्या डोळ्यासमोरून तरळून गेला. सावळ्या कधीच नजरेच्या कक्षेबाहेर गेला होता. एव्हाना तो कृष्णामाईच्या कुशीत पोहोचलादेखील असेल. अंधार चांगलाच दाटून आला होता. आणि ओढ्यापलीकडे गेलेली रुक्मिणी सदा आबाच्या मागे येऊन पाठीवरून हात फिरवत उभी होती. सावळ्याच्या दुखःत आकंठ बुडालेला सदा आबा भानावर आला. अजून १-१.५ कि.मी. अंतर चालायच होतं. सर्जा आणि म्हशीला तरी सुरक्षित न्यायच होत. सदा आबा चा पाय त्या जागेवरून निघत नव्हता. पण आपणच धीर सोडला तर पाठीमाग उभ्या असलेल्या रुक्मिणीने काय करायच?? 
     सदा आबा तिथुन माघारी फिरला रुक्मिणी ला पुढे घालून आणि सर्जा ला आणि म्हशीला घेऊन झपाझप पावले टाकू लागला. सावळ्याला सोडून जायला मन तयार होत नव्हतं पण आता पर्याय नव्हता. आपल्या संसाराचा मोडका बैलगाडा समर्थपणे ओढणारा सावळ्या तसाच डोळ्यासमोर दिसत होता. हुंदका आवरत नव्हता. डोळ्यातून एकसारखे अश्रू वाहात होते. पण प्रचंड महापुर आणि मुसळधार पावसासमोर सदा आबाच्या अश्रूंचा निभाव लागत नव्हता. साडेतीन, चार तास चालून आल्यानंतर सदा आबा आणि रुक्मिणी पाटलाच्या मळ्यात पोहोचले. सदा आबा ने सर्जा ला आणि म्हशी ला सर्जेराव पाटलाच्या शेडमध्ये दावनीला बांधलं, रुक्मिणी ला देखील सावळ्या च्या जाण्याने अतीव दुखः झालं होत. पण अगोदरच हळव्या झालेल्या नवऱ्यासमोर ते दाखवून चालणार नव्हतं. पाटलाच्या मळ्यात जो तो सदा आबा ला सावळ्याला कुठं सोडलंस म्हणून विचारत होता?? हे विचारताच सदा आबा ला हुंदका आवरत नव्हता आणि तो ढसाढसा रडायचा. शांत स्वभावाचा सावळ्या सगळ्या गावाचा लाडका होता. अगदी लहान पोरा-सोरांपासून, गावातल्या थोरामोठ्यांपर्यंत कुणीही सावळ्याच्या जवळ जाऊन त्याला कुरवाळू शकत होत, औता-गाडीला जुंपू शकत होत. सावळ्या गेल्यानंतर ४ दिवसात पुर ओसरला. पाटलाच्या मळ्यात गोळा झालेला गाव आपापल्या घराकडे पांगला. सदा आबा देखील आपल्या बायकोला आणि जित्राबांना घेऊन घरी गेला. बाळंतीन झालेली लेक मामाकडेच ठेवून राजूही घरी परत आला. सदा आबा च कुठल्याच कामात लक्ष लागत नव्हतं ,घराला कुलूप लावलेल असल्याने घरातील काहीच वाहुन गेल नव्हतं, पण सगळ्या घरात चिखलाचं साम्राज्य झालं होतं. रुक्मिणी आणि राजू सगळी आवराआवरी आणि स्वच्छता करत होती. सदा आबा मात्र दावनीला बाधलेल्या सर्जा च्या तोंडावर हात फिरवत होता. सर्जानेही त्याच तोंड सदा आबाच्या मांडीवर ठेवलं होतं. सावळ्याला जाऊन ४ दिवस झाले मात्र ना सर्जा च्या डोळ्याची धार थांबत होती ना सदाआबाच्या डोळ्याची धार थांबत होती. दोघेही एकसारखे सावळ्याच्या आठवणीत रडत होते. शेवटी त्यांच्या आयुष्याचा सखासोबती त्यांना सोडून गेला होता. तेवढ्यात दारासमोर महिंद्राचा पिक अप येऊन उभा राहिला. त्यातून राजू चा मामा खाली उतरला सोबत घरच्या गायीला वर्षाभरापूर्वी झालेल वासरू सदा आबा ला द्यायला घेऊन आलेला. सदा आबाने त्या पांढऱ्याशुभ्र वासरालापण सावळ्या हेच नाव ठेवलं. सदा आबा आता रडायचा कमी झालाय. लहानशा सावळ्याला सांभाळण्यात आणि त्याचे लाड पुरवण्यात सदा आबा  आता चांगलाच रमतो.
...............................................................................................
वरील कथा आणि कथेतील सर्व पात्रे काल्पनिक आहेत.
...............................................................................................
     सांगली आणि कोल्हापूरला आलेल्या महापुरातदेखील अशा हजारो सदा आबांच्या गायी, म्हशी, बैल, वासरे वाहुन गेली. जीवंतपणी त्यांना जलसमाधी मिळाली. कित्येकांची संपूर्ण घरदार वाहुन गेली. अंगावरच्या कपड्यांशिवाय काहीच उरल नाही. आयुष्यभर कष्ट करून उभारलेला संसार होत्याचा नव्हता झाला. ऊसाचे फड आडवे झाले. नवीन केलेली लागण जमीनीवरच्या मातीसकट वाहुन गेली. बैलांसोबत बैलगाड्या गेल्या, घरातली भांडीकुंडी गेली. स्वयंपाकाला चुली राहिल्या नाहीत की तेल-मीठ उरल नाही. लहानसहान पोरांची वह्या-पुस्तकं गेली. तरूणांची स्वप्ने पुर्ण करणारी पुस्तक स्वप्नासहित भिजून चिंब झाली. अनेक छोटे छोटे पुल वाहुन गेले. गावोगावी रस्त्यांवर, घराघरातून चिखलान आपलं साम्राज्य उभा केलं. सरकारदरबारी गरीब-श्रीमंत सगळे एकाच तराजूत मोजले जावू लागले 'पुरग्रस्त'. आता पुर ओसरल्यानंतर परत एकदा या प्रत्येकाचा संसार नव्याने उभा करायचायं. वाहुन गेलेली घर पुन्हा उभा करायची आहेत. चिखलानी माखलेली घरदारं स्वच्छ करायची आहेत. लहान मुलांना वह्या-पुस्तके, गणवेश, कपडेलत्ते पुरवायला हवेत. प्रत्येक कुटुंबाला जीवनावश्यक साहित्य, चटणी-मीठ,तेल,धान्य, कपडे,भांडी द्यायला हवीत. तरुणांच्या हाताला काम देऊन त्यांची स्वप्ने पुर्ण करायला हवीत. शेतकऱ्यांना शेती परत उभा करायला. बी-बियाणे,खते-औषधे,संपूर्ण मशागतीच्या खर्च द्यायला हवा. यासाठी सबंध महाराष्ट्राला पुरग्रस्त लोकांसोबत मदतीचा सक्षम हात देऊन उभा राहायला हवं. मदत करताना पुरग्रस्त बांधवांच्या डोळ्यात उपकारांची भावना निर्माण न होऊ देता आपले सगेसोयरे,बांधव म्हणून मदत करायला हवी. कथेतल्या सदा आबाला लहानसं वासरु देऊन त्यांच्या मेहुन्याने आनंद दिला.आशा आहे की कोल्हापूर- सांगलीच्या अशा हजारो सदा आबांना आपल्यासारखी लोक पुन्हा उभा करतील. स्वाभिमानी सांगली कोल्हापूर करांची मन न दुख वता त्यांना मदत करून आपण सारे त्यांना या परिस्थितीवर मात करण्याची ऊर्जा देऊयात...त्यांना उभा करुयात...
@अमित जालिंदर शिंदे


1 comment:

न्यूझीलंड,कोरोना,नागरीक आणि जेसिंडा आर्डर्न... न्यूझीलंड देशाचा राष्ट्रध्वज      न्यूझीलंड, प्रशांत महासागराने चौफेर वेढलेला एक बे...