जागतिक तापमानवाढ आणि हवामानबदलामुळे आईसलँड नावाच्या देशातील ओक्जोकुल नावाची एक हिमनदी नष्ट झाल्याची घटना नुकतीच घडली. आईसलँड चे पंतप्रधान कात्रीन जँक्सोब्सदोत्तीर यांनी या नदीला स्मरणपत्र अर्पण करून श्रद्धांजली देखील वाहिली आहे. हि नदी नष्ट होण्यापाठीमागे दोन मुख्य कारणे सांगितली जात आहेत.
१) मे २०१९ मध्ये हवेमध्ये वाढलेले ४१५ ppm इतके विक्रमी कार्बन डायऑक्साईड चे प्रमाण आणि,
२) यावर्षीच्या जुलै महिन्यातील सर्वाधिक तापमान. खरतर या वाढलेल्या तापमानालाच Global warming म्हणायच. ग्लोबल वार्मिंग ने फक्त आईसलँड लाच फटका बसलाय अस नाही. संपूर्ण जगभरात मागील २ दशकांमध्ये जागतीक तापमानात ०.८℃ ने वाढ झाली आहे. याचाच परिणाम म्हणून हिमनद्या वितळू लागल्या आहेत. समुद्राची पाणीपातळी वाढू लागली आहे. अनेक छोट्या छोट्या बेटांना या वाढणाऱ्या पाणीपातळीचा आगामी काळात मोठा फटका बसणार आहे. भारतासारख्या मान्सूनवर आधारित असलेल्या देशातील ऋतूचक्रच बदलायला लागलय. भारतातदेखील उन्हाळ्यात प्रचंड उष्णतेच्या लाटा अनुभवायला मिळायला लागल्या आहेत. उष्माघाताने बळी चालले आहेत. चारापाण्याच्या टंचाईमुळे गुराढोरांनादेखील उन्हाळा असह्य होतोय. तर पावसाळ्यात प्रचंड अतिवृष्टीमुळे एकाच वेळी महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश,ओडीशा,बिहार असा सर्वत्र नागरीकांना पुराचा सामना करावा लागतोय. ग्लोबल वार्मिंग मुळे पाण्याचे बाष्पीभवन जास्त होतेय. भुजल पातळीत घट होतेय तर वाळवंटीकरणाचा वेग बेसुमार वाढतोय.या घडणाऱ्या गोष्टींची कारणमिमांसा करणे आता गरजेचे आहे. ग्लोबल वार्मिंग म्हणजे नक्की काय आणि ते होतय कशामुळे याच्या मुळाशी आता सर्वसामान्य नागरिकांनी जाणे गरजेचे आहे. रोजच्या जीवनात आता माणसाला गाडी लागते, फ्रिज लागतो, वीज लागते. या गोष्टींशिवाय आता मानवी जीवन पुर्णही होऊ शकत नाही. पण या गोष्टींच्या निर्मितीमुळे किंवा या गोष्टींच्या वापरामुळे निसर्गावर,पर्यावरणावर काय परिणाम होतो याचा विचार आपण करीत नाही. निसर्गाचा समतोळ ढासळतोय म्हणून आता या गोष्टींची निर्मिती किंवा वापर आपण थांबवू शकत नाही हे सत्य आहेच. पण या सत्याचा स्वीकार करीत असताना निसर्गास आपल्याचमुळे होणारी हाणी कशी कमी करता येईल याचा विचार मानवजातीने करायला हवा. निसर्गाचा ढासळणारा समतोल, पृथ्वीचे आणि वातावरणाचे वाढणारे तापमान याला औद्योगिकीकरण हाच घटक प्रामुख्याने कारणीभूत ठरत आहे. औद्योगिकीकरणातून बाहेर पडणारी प्रदूषके, गाड्यांचा धुर, फ्रिज, एसीमधुन निघणारे वायु, हरीतग्रह वायु या गोष्टींमुळे एकीकडे वातावरणातील कार्बन वाढतोय,पृथ्वीचे सुरक्षाकवच म्हणून ओळखला जाणार ओझोन फाटतोय तर दुसरीकडे उद्योगधंदे आणि विकासाच्या नावाखाली हजारो-लाखो वृक्षांच्या कत्तली खुद्द सरकारकडून होत आहेत. वृक्ष हा एकच उपाय सध्या वाढणाऱ्या जागतिक तापमानाला आटोक्यात आणू शकतो कारण हवेत वाढणारा कार्बन शोषून घेण्याची आणि हवेत गारवा निर्माण करण्याची क्षमता झाडांमध्ये असते. विकासासाठी म्हणजेच पर्यायाने स्वताच्या सुखसोयीसाठी आता उद्योगधंदे, गाड्या आणि यंत्रांचा वापर आपण थांबवू शकत नसलो तरी मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड आपण निश्चितच करु शकतो. असे असताना पृथ्वी वरील सर्वच विकसित आणि विकसनशील देश जागतिक तापमानवाढीची समस्या आणि त्यावरील उपाय याबाबतीत जागतीक परिषदा घेण्यापुढे जास्त काही करताना दिसत नाहीत. याउलट ब्राझील आणि भारतासारख्या जैवविविधतेने नटलेल्या विकसनशील देशांनी अमेझॉन जंगल असो किंवा आरेच जंगल असो विकासाचा कांगावा करत कशा पद्धतीने चुकीच्या भुमिका घेतल्या हे पाहण अतिशय गरजेच आहे.
अमेझॉन जंगलातील वणवा |
ऑगस्ट २०१९ मध्ये ब्राझीलच्या अमेझॉन जंगलामध्ये ठिकठिकाणी २५०० वणवे लागले होते. या वणव्यांमध्ये लाखो झाडे नष्ट झाली आणि अनेक वैशिष्ट्यपूर्ण वन्यप्राणीही म्रुत्युमुखी पडले. या आगींमुळे निर्माण झालेला धुर ३२०० कि.मी. पर्यंत पसरला होता. ब्राझीलमधील अनेक शहरांमध्ये धुराची चादर पसरली होती पण ब्राझीलचे सरकार या साऱ्या संकटाला गांभीर्याने घेत नव्हते. सारे जग समाजमाध्यमांवर अमेझॉन वाचवा म्हणून ओरडा करत असतान ब्राझीलचे सरकार जाणूनबुजून याकडे दुर्लक्ष करीत होते. त्याला कारणही तसेच आहे.अमेझॉन च्या खोऱ्यात अमुल्य असा खनिजसंपत्तीचा ठेवा आहे. हा खनिजसंपत्तीचा ठेवा उत्खनन करून बाहेर काढण्यासाठी ब्राझीलीयन सरकारने अमेरिका आणि कँनडातील काही कंपन्यांशी करार केलेले आहेत. आणि उत्खनन करण्याअगोदर ही जमीन मोकळी व्हावी या उद्देशाने त्यांनी या वणव्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप ब्राझील सरकारवर जगभरातून होतोय. ब्राझील सरकारने या वणव्यांकडे इतके दुर्लक्ष केले होते की वणवे वेळीच आटोक्यात आणलेत तर ठीक नाहीतर फ्रान्स ब्राझील आर्थिक संबंधांवर विपरीत परीणाम होतील अशी धमकी फ्रान्स ला द्यावी लागली. वास्तविक दरवर्षी लाखो टन कार्बन उत्सर्जन शोषून घेणारे अमेझॉन जंगल प्रतिमिनीटाला एका फुटबॉल मैदानाएवढे प्रचंड वेगाने कमी होऊ लागले आहे. तरीही इथल्या जाईर बोल्सोनारो सरकारने जंगलतोडीवरची बंदी उठवली आहे. केवळ खनिजसंपत्तीचे उत्खनन करून देशामध्ये औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी आणि अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी हजारो लाखो झाडांची कत्तल ब्राझील सरकार करत आहे.
आरे जंगलातील झाडे तोडताना |
जे ब्राझीलमध्ये झाले तेच ४ ऑक्टोबर ला मुंबईतल्या आरे जंगलामध्ये झाले. वास्तविक आरे जंगल आहे की नाही यावरूनच येथे न्यायालयामध्ये युक्तिवाद झाला. शुक्रवारी ४ ऑक्टोबर ला मुंबई उच्च न्यायालयाने पर्यावरण प्रेमी लोकांच्या याचिका फेटाळताच मुंबई मेट्रो च्या अधिकाऱ्यांनी आणि महाराष्ट्र सरकारने संगणमताने आरे परिसरामध्ये जमावबंदी लागू करून जंगलतोडीस सुरुवात केली. आरे परिसरातल्या सामान्य नागरिकांतुन प्रचंड जनक्षोभ होत असतानादेखील अनेक पर्यावरण वाद्यांना अटक करून सलग ४८ तास आरेच्या जंगलामध्ये २००० हुन अधिक झाडांची कत्तल केली गेली. मुंबईतील विधीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी याविषयी सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांना पत्र लिहिले आणि सोमवारी म्हणजेच ७ ऑक्टोबर ला तातडीची सुनावणी घेऊन आरेच्या जंगलतोडीस तात्पुरती स्थगिती दिली पण तोवर मुंबई मेट्रो ला हव्या असलेल्या जमीनीवरील झाडे कापून झाली होती. ब्राझील चे अमेझॉन असेल किंवा मुंबई तले आरे असेल. विकासाच्या नावाखाली जंगलतोड हाच दोन्ही ठिकाणचा समान धागा आहे. अमेझॉन आणि आरे हि बेसुमार जंगलतोडीची फक्त प्रतिकात्मक उदाहरणे आहेत.
मागच्या वर्षभरापासून मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाने वेग घेतला आणि झाडांचा हिरवागार शालू पांघरलेल्या कोकणामध्ये कोट्यावधी झाडे उन्मळून पडली. नव्याने होऊ घातलेल्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन च्या कामासाठी ठाणे,भिवंडी,पालघर येथे १५०००० हुन अधिक खारफुटीची झाडे कापावी लागणार आहेत. एकीकडे अशी बेसुमार वृक्षतोड आमचीच सरकारे करतात अन दुसरीकडे कोट्यावधी वृक्षलागवडीच्या मोहिमादेखील आमचीच सरकारे करत आहेत. खरतर २०१६ ला २ कोटी वृक्ष, २०१७ ला ४ कोटी वृक्ष, २०१८ ला १३ कोटी वृक्ष लागवडीसाठी महाराष्ट्र राज्याने सलग ३ वर्षे लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये रेकॉर्ड नोंदवले. पण लावलेल्या या कोट्यावधी वृक्षांमधले किती वृक्ष आज जीवंत आहेत किंवा किती रोपांचे संगोपन सरकारने केले हा खरोखर संशोधनाचा विषय आहे.
विकास व्हावा जरूर व्हावा. उद्योग यावेत. रोजगार निर्माण व्हावेत. परंतु बेसुमार वृक्षतोड थांबायला हवी. कारण नवीन वृक्ष लावून ते जगविणे आपल्याला जमत नसेल तर असलेले वृक्ष तोडण्याचा आपल्याला अधिकार नाही. खरतर निसर्गाचा मनमुराद आनंद सगळ्यांना हवा असतो पण तो निसर्ग जपायला, त्याची काळजी घ्यायला, झाडे लावायला आणि जगवायला कुणालाच वेळ नाही. सरकारे दर ५ वर्षाला बदलतात. वेळोवेळी त्यांची धोरणे बदलतात. ५ वर्षात कुठल्याच झाडाचा वृक्ष होत नाही. वृक्ष व्हायला त्याची पाळेमुळे जमीनीत खोलवर घट्ट व्हावी लागतात. त्याच्या फांद्यांनी सभोवतालचे अवकाश व्यापून घ्यावे लागते. ढगांना कवेत घ्यावे लागते. रोपट्याचा वृक्ष होण्यासाठी ऊन ,वारा, पाऊस यांच्याशी अविरत झगडा करून ताठ मानेने परत उभा राहावे लागते. त्यामुळे आपल्या मुलाबाळांसाठी हि पृथ्वी जीवंत ठेवायची असेल. तर जगातल्या प्रत्येक व्यक्तिने निसर्गाचा आदर राखून झाडे लावायला हवीत आणि त्यांचा वृक्ष होईपर्यंत त्याची काळजी घ्यायला हवी. Global warming ला जर Green earth हेच उत्तर असेल तर झाडे लावण्याची जागतिक लोकचळवळ व्हायला हवी. हाच पर्याय आहे शाश्वत विकासाचा.
@अमित जालिंदर शिंदे
@अमित जालिंदर शिंदे
No comments:
Post a Comment