Monday, September 10, 2018

पांडुरंग करो आणि पाऊस पडो...



PHOTO-BY AMIT SHINDE
@AKOLA(WASUD,TAL-SANGOLA
पिढ्यानपिढ्या कोरड्या दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या सांगोला तालुक्यात सप्टेंबर उजाडला पण अद्याप पावसाचा थेंब पडला नाही.पाण्याअभावी खरीपाच्या पेरण्या झाल्याच नाहीत. काही तुरळक शेतकऱ्यांनी धाडसाने तुरी-बाजरी-मुग-मटकी पेरली पण जमीनीत ओलावाच नसल्याने बी ला अंकुर फुटलेच नाहीत. पावसाळ्यातल्या कडक उन्हाने बोरीचे मोहोर जळुन गेले.यंदा आशा होती डाळिंबाला तरी चांगले दर मिळतील पण यंदाच्या खराब वातावरणामुळे सरसकट डाळिंब बागांमध्ये तेल्या रोगाने शिरकाव केला.अद्याप पाऊसच नाही त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.कांद्याची रोपे तयार आहेत पण लागवडीसाठी पाणीच नसल्याने टँकरने पाणी विकत घेऊन कांदालागवड सुरू आहे.१०००-१२०० फुटांपर्यंत बोअरवेल घेतल्या तरी फक्त धुरळाच उडतो इतकी भुजल पातळी खाली गेली आहे.पाण्याच्या आणि पावसाच्या या भयावह परिस्थितीमुळे सध्या शेतातील पिके तर वाया गेलीच आहेत पण आगामी काळात माणुस आणि जणावरे यांची तहान भागविण्यासाठी सुद्धा पाणी उरणार नाही. पाणीच नसल्याने गुरांना हिरवा चारा देखील मिळायचा बंद झालाय.त्यामुळे सध्या तालुक्यातील दुध उत्पादक शेतकरी हिरव्या चाऱ्यासाठी शेजारच्या पंढरपूर,अकलूज भागातुन ऊसाची खरेदी करतोय.एकिकडे दुधाचे दर मातीमोल झाले असताना दुसरीकडे चाऱ्याचे दर मात्र गगणाला भिडले आहेत.सध्या सांगोल्यातला दुध उत्पादक शेतकरी ३०००₹ प्रतिटन दराने उसाची खरेदी जनावरांच्या चाऱ्यासाठी करतोय. त्याच ऊसाला जिल्ह्यातील साखर कारखाने एफ.आर.पी.सह २५००-२७००₹ प्रतिटनापेक्षा जास्त दर देत नाहीत. जो ऊस कारखानदारांना साखर करायला २७००₹ प्रतिटन घ्यायला परवडत नाही,तोच ऊस सांगोला तालुक्यातला पावसाच्या प्रतीक्षेत पिचलेला आणि पावसाअभावी शेतातील नापिकीने डबघाईला आलेला शेतकरी जनावरांच्या चाऱ्यासाठी ३०००₹ प्रतिटन दराने खरेदी करतोय.एवढा महागडा चारा घेऊनदेखील उत्पादित होणाऱ्या दुधाचे दर मात्र स्वताचे पोट भरण्याइतपतदेखील मिळत नाहीत.मुळातच शेतकऱ्यांचा हा खटाटोप उत्पन्न मिळविण्यापेक्षा पोटच्या लेकराप्रमाणे सांभाळलेली जणावरे जगविण्यासाठी चाललाय.आगामी काळात जर पाऊस पडलाच नाही तर तालुक्यातील शेतकऱ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठा संघर्ष तर करावाच लागेल पण जनावरे विकण्याची आणि शेती सोडून रोजगारासाठी दुसरे मार्ग शोधण्याची देखील वेळ येऊ शकते.शासणाने यापुढे व्रुक्षलागवडीसोबतच व्रुक्षजतनाकडे लक्ष देऊन पर्यावरणीय समतोल सांभाळुन या गंभीर संकटाला तोंड देण्याची तयारी ठेवायला हवी.
पांडुरंगाच्या आशिर्वादाने पाऊस व्हावेत आणि हे भीषण संकट दुर व्हावे हिच सदिच्छा...
@अमित जालिंदर शिंदे

No comments:

Post a Comment

न्यूझीलंड,कोरोना,नागरीक आणि जेसिंडा आर्डर्न... न्यूझीलंड देशाचा राष्ट्रध्वज      न्यूझीलंड, प्रशांत महासागराने चौफेर वेढलेला एक बे...