*गोल्ड मेडल...*
२१ व्या शतकाला एक समानार्थी शद्ब आहे,स्पर्धेचे जग.लोकसंख्या प्रचंड वाढल्यामुळे खरतर जगण्याचीच स्पर्धा निर्माण झालीये.त्यातुनच हार -जीत नावाच्या संकल्पना देखील निर्माण झाल्या.रोजच्या जीवनात अशा अनेक स्पर्धा चालू असतात. या स्पर्धांमध्ये जिकणाऱ्यांना मेडल्स किंवा ट्रॉफी वगैरे बक्षीसे दिली जातात.अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय असे मानाचे पुरस्कार देखील ठराविक रकमेचे मानधन आणि मेडल याच स्वरूपात दिले जातात.मग ते बक्षीस किंवा पुरस्कार ऑलिम्पिक चा असो,भारतरत्न चा असो किंवा नोबेल चा असो.शाळा महाविद्यालयांमध्ये देखील त्यांच्या गुणवंतांना मेडल देऊन सन्मान करण्याची प्रथा सुरु झालीये.पण मी प्राथमिक शाळेत प्राथमिक शिक्षण घेत होतो त्याकाळी मला ही मेडल वगैरे या गोष्टी फक्त चित्रात किंवा टि.व्ही.मधे पाहुन माहिती होत्या,पण स्पर्धा माहिती होती कारण मी ४ थी मधे असताना माझा लहान भाऊ १ ली मधे होता.तरीदेखील आमच्या मार्कांची त्यावेळी एकमेकांशी स्पर्धा व्हायची.अर्थात ती स्पर्धा आम्हीच करायचो ,त्याला एक कारणदेखील होतं.आम्ही दोघ जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत जायचो तेव्हा आम्हाला अभ्यासाची सवय लागावी म्हणून आमच्या दोघांपैकी ज्याला पैकीच्या पैकी मार्क पडतील त्याला २ रू.आणि दुसऱ्याला १ रू. च नाण बक्षीस म्हणून आजोबांकडून मिळायचं.२००१-२००५ चा तो काळ होता. त्यावेळी २ ₹ ला पण आवडीच्या गोळ्या,छोटी सुटी खारी बिस्किटे, पापड्या असा खाऊ जवळच्या दुकानामध्ये मिळायचा.मग तो खाऊ मिळवायचा म्हणून आम्ही भरपूर अभ्यास करायचो.चांगले मार्क मिळवायचो.बऱ्याचदा दोघांनाही पैकीच्या पैकी मार्क मिळायचे.आणि दोघेही घराच्या बाजूला कुठेतरी शेळ्या फिरवणाऱ्या आजोबांच्याकडे धावत जाऊन २₹ मागायचो.हातावर पडणार ते २₹ च नाण आम्हाला गोल्ड मेडल मिळाल्यासारखच वाटायचं. ते घेताना मनातला आनंद चेहऱ्यावर फुलणाऱ्या हास्यातुन स्पष्टपणे झळकायचा.त्या गोल्ड मेडलची बरोबरी आयुष्यात दुसऱ्या कुठल्याच मेडलने आणि बक्षीसाने होऊ शकणार नाही. कारण माणसाला माणूस म्हणून जगण्यासाठी आवश्यक असणाऱ्या शिक्षणाच्या प्राथमिक वर्गांचा पाया त्या मिळणाऱ्या गोल्ड मेडलरुपी नाण्यांनी मजबूत केला.माझ्या बालपणापासून ते आता २०१९ येईपर्यंतच्या या १२-१५ वर्षांच्या काळात आम्ही सज्ञान झालो.मतदानासारखा नागरिक म्हणून जबाबदारी दाखवणारा हक्क मिळाला.आम्ही क्रुषीपदवीधर झालो.सगळ काही बदलल पण ती बक्षीसरुपी नाणी आजही शिकायला आणि कोणतही काम करायला प्रेरणा देतात.त्या गोल्ड मेडलसारख्या वाटणाऱ्या २₹ च्या नाण्यांची किंमत आज लाखो रुपये मोजूनदेखील होऊ शकणार नाही.
@अमित जालिंदर शिंदे.
No comments:
Post a Comment