Monday, July 29, 2019

आठवणीतले जे.आर.डी.टाटा

आठवणीतले जे.आर.डी.टाटा


     JRD TATA म्हणजेच जहांगीर रतनजी दादाभॉय टाटा,एअर इंडियाचे जनक आणि वैमानिक होण्याचा परवाना मिळविणारे पहिले भारतीय वैमानिक, जगद्-विख्यात उद्योगपती.जर मनात आणल असत तर कधीच जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती झाले असते.पण त्यांना व्यवसाय पैसे कमविण्यासाठी नव्हे तर जगाला कमी पैशात दर्जेदार सेवा पुरविण्यासाठी करायचा होता.इंग्लिश खाडी विमानाद्वारे पहिल्यांदा पार करणाऱ्या सुप्रसिद्ध फ्रेंच वैमानिक लुईस ब्लेरिअट यांच्या जीवनकार्याने जेआरडी खुप प्रभावित झाले होते.त्यामुळे त्यांनीही वैमानिक होण्याचा ध्यास घेतला.सर जमशेदजी टाटांनी उभारलेल्या टाटा उद्योग समुहाचे चेअरमन म्हणून त्यांची वयाच्या अवघ्या ३४ व्या वर्षी निवड झाली.त्यांनी त्या वयातदेखील १४ कंपन्या असलेल्या टाटा उद्योग समुहाच्या चेअरमनपदाची जबाबदारी लिलया पेलली आणि पुढची तब्बल ५३ वर्षे टाटा उद्योग समुहाच्या विकासाची विमाणे अशी चालवली की आज भारताच्या अवघ्या उद्योग विश्वाचे अवकाश या विमाणांनी व्यापून टाकले आहे.जेआरडी टाटांच्या काळात टाटा उद्योग समुहामध्ये ९१ नव्या कंपन्यांची भर पडली.
     आपण व्यावसायिक आहोत आणि आपण फक्त व्यवसाय करायला हवा या संकुचित विचाराने कधीही त्यांच्या मनाला शिवले नाही. आणि म्हणूनच सामाजिक भाण म्हणून जेआरडी टाटांनी भारतात मुलभूत संशोधन होऊन सर्वसामान्य माणसांचे जीवन सुखकर व्हावे या हेतूने टाटा समाजविज्ञान संस्था(१९३६) आणि टाटा मूलभूत संशोधन संस्था(१९४५) स्थापन केल्या.इतकेच नव्हे तर आशिया खंडातील पहिले कर्करोग रुग्णालय त्यांनी मुंबई येथे सुरु करुन रुग्णसेवेला देखील प्राधान्य दिले.
     जेष्ट समाजसेविका आणि प्रसिद्ध लेखिका सुधाताई मुर्ती जेआरडी टाटांची एक आठवण सांगतात.एकदा जेआरडी टाटा चेअरमन असलेल्या टाटा उद्योग समुहाच्या टेल्को या कंपनीला ट्रेनी इंजिनिअर्स हवे होते.तशी जाहिरात टेल्को ने वर्तमानपत्रामधे दिली होती. ती जाहिरात सुधाताईंनी पाहिली.सुधाताई जाहिरातीतील पात्रतेच्या सर्व अटी पुर्ण करु शकत होत्या पण जाहिरातीच्या शेवटी एक वाक्य लिहिले होते,"महिलांनी या नोकरीसाठी अर्ज करू नयेत." पात्र असतानादेखील केवळ आपण महिला आहोत म्हणून आपल्याला नोकरी मिळत नाही हि गोष्ट सुधाताईंच्या मनाला पटत नव्हती. सुधाताईंनी लगेचच जेआरडी टाटांना एक पत्र लिहिले.
 "आदरणीय सर,
     टाटा हे नेहमीच बदलांचे आद्यप्रवर्तक राहिले आहेत.त्यांनीच भारतात पहिल्यांदा पायाभूत सुविधा पुरविणाऱ्या उद्योगांची सुरुवात केली.आज टाटा सर्वच क्षेत्रात काम करतात.टाटांनी भारतात ई.स. १९०० पासून उच्च शिक्षणासाठी प्रयत्न केले आहेत आणि भारतात इंडियन इंस्टिट्यूट ऑफ सायन्स सुरु करण्यामध्ये टाटांची मुख्य भुमिका होती.आणि योगायोगाने मी त्यामध्येच शिक्षण घेतले आहे.पण मला आश्चर्य वाटतयं कि टाटा चालवित असलेल्या टेल्को सारख्या कंपनीमधे नोकरीसाठी लिंगभेद कसा असु शकतो??".


       सुधाताईंनी लिहिलेले हे पत्र स्वता जेआरडींनी वाचले आणि स्वता सुधाताईंना मुलाखतीसाठी बोलावून टेल्को मधे त्यांची निवड केली.एवढ्या मोठ्या उद्योग समुहाचा चेअरमन असलेली व्यक्ती सर्वसामान्य कुटुंबातील मुलीचे पत्र स्वता वाचतात आणि तिला बोलावून घेतात.हे फक्त जे आर डी टाटाच करू शकतात.नंतरच्या आयुष्यात सुधाताईंनी नारायण मुर्तींशी विवाह केला.ईन्फोसिस सारखी सॉफ्टवेअर कंपनी उभारण्यात मोलाचे योगदान दिले.समाजसेवेसाठी ईन्फोसिस फाऊंडेशनची स्थापना केली.सुधाताई बेस्ट सेलिंग लेखिका झाल्या.पण आजही त्या या यशाचे श्रेय जेआरडी टाटांनाच देतात.माणसे उगाच महान होत नसतात त्यासाठी माणुसकी आणि समाजिक भान जागृत ठेवावे लागते.जेआरडींनी ते ठेवले होते.साधेपणा त्यांच्या अंगी होता.कामगारांप्रति आपुलकीची भावना त्यांच्या ठायी होती.देशाप्रती आदर,निष्टा आणि देशभक्ती त्यांच्याकडे होती.बदल करण्याची प्रचंड ईच्छाशक्ती त्यांच्याकडे होती.आणि म्हणून जेआरडी टाटा भारतातल्या सर्वात महान १० व्यक्तीमधे गणले जातात.त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून जेआरडी टाटांना भारत सरकारने १९९२ साली भारतरत्न देवून सन्मानित केले.अशा जेआरडी टाटांना त्यांच्या जयंती दिनानिमित्त विनम्र अभिवादन.
@अमित जालिंदर शिंदे

No comments:

Post a Comment

न्यूझीलंड,कोरोना,नागरीक आणि जेसिंडा आर्डर्न... न्यूझीलंड देशाचा राष्ट्रध्वज      न्यूझीलंड, प्रशांत महासागराने चौफेर वेढलेला एक बे...