Monday, December 4, 2017

अस्वस्थ करणाऱ्या प्रश्र्नांची पेरणी...

             अस्वस्थ करणाऱ्या प्रश्नांची पेरणी...
     दि-१८/०८/२०१७ शुक्रवार,दै.सकाळ वर्तमानपत्रामधे एक बातमी नजरेस पडते, " *कोमेजल्या जीवांना रयतची संजीवनी"* . या शीर्षकाने प्रसिद्ध झालेल्या बातमीने मनामध्ये विचारांची खलबते सुरू केली आणि मनामध्ये अनेक अस्वस्थ करणाऱ्या प्रश्नांची पेरणी उत्तराचे पिक मिळवण्यासाठी सुरू झाली. याच साऱ्या बीजरुपी प्रश्नांचा पिकरुपी उत्तरे मिळवण्यासाठी सुवर्ण महोत्सवी महाराष्ट्रातील प्रत्येक नवतरुणाच्या मेंदुमधील कल्पनारुपी खत वापरुन घेण्यासाठी केलेला हा लेखनप्रपंच.....
 " *स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद* " हे ब्रीद घेऊन महाराष्ट्रातील गोरगरीबांच्या मुलांच्या हातातील नांगराच्यामुठी सोडवून त्यामधे लेखणी-पुस्तक देऊन त्यांना साक्षर करण्यासाठी कर्मवीर भाऊराव पाटील यांनी सातारा येथे रयत शिक्षण संस्थेची स्थापणा केली. आजदेखील भाऊरावांचा तोच विधायक उद्देश डोळ्यांसमोर ठेवून रयतने आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या  ४१ मुलांना सातारा येथे खुद्द भाऊरावांनीच सुरू केलेल्या धनीनीच्या बागेतील शाहु बोर्डिंग मधे प्रवेश देऊन त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मोफत शिक्षणाची व्यवस्था केली आहे.
ही बातमी वाचली आणि आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना मिळालेल्या आधाराबद्दल आणि रयतने दाखवलेल्या सामाजिक जाणिवेबद्दल जितके कौतुक वाटले अगदी तितकेच मन विषण्ण झाले ह्या बातमीच्या मथळ्यातील " *आत्महत्या* "या महाराष्ट्रातील शेतक-यांच्या आयुष्याला ब्रेक लावणाऱ्या क्रुर शब्दाने.रोज येणाऱ्या वर्तमानपत्रामधे एकतरी काळजाला घाव घालणारी  शेतकऱ्याच्या आत्महत्येची,हृदय पिळवटून टाकणारी करुण कहानी वाचायला मिळते.कुठे कर्जबाजारी शेतकरी आत्महत्या करतो,कुठे एस.टी.पासला पैसे नाहीत म्हणुन शेतकऱ्याची अंकुरासारखी कोवळी पोरगी आत्महत्या करते,कुठे हुंडा देण्यासाठी पैसे नाहीत म्हणुन शेतकऱ्याची वयात आलेली सोण्यासारखी मुलगी आत्महत्या करते.तर कुठे कर्जाच ओझ कमी होईना म्हणुन शेतकरी आपल्या लेकरांना पोटाला बांधुन विहीरीत उडी घेतो.
या अशा घटनांमुळे मनात पहीलाच प्रश्न येतो *"कृषीप्रधान"* असा सोनेरी मुकुट शिरावर अभिमानाने मिरवणाऱ्या,महासत्तेची स्वप्ने पाहणाऱ्या,डिजिटल क्रांतीच्या दीशेने पावले टाकणाऱ्या,मेक इन इंडीया चे डोहाळे लागलेल्या,बुलेट ट्रेनमधुन प्रवास करु इच्छिणाऱ्या,सर्जिकल स्ट्राइक चे धाडसी कृत्य करणाऱ्या,गोरक्षणाचे शिवधनुष्य लिलया पेलणाऱ्या माझ्या सारे जहाँ से अच्छा असलेल्या आणि अच्छे दीनों मे जगणाऱ्या भारतामध्ये अवघ्या जगाला पोसणारा पोशिंदा बळीराजाच का स्वतःच्या जीवाची आहुती देतो??कारण??
 कारण खुप सोप्पयं,कारण माझ्या राजाला पावसाने लागोपाठ दगा दीलायं, पेरलेल्या पिकाला कोंबच    फुटले नाहीत, घरशेतावर काढलेल कर्ज वाढतच गेलं.आणि  म्हणुन माझा शेतकरी बा सारख्या विचांरात असायचां.एक दिवस बानं रात्री झोपायच्या आधी माझ्या न् तायडीच्या चेहऱ्यावरुन हात फिरवला.बानं माझ्या भाबड्या कष्टाळु माईकडं बघीतलं अन् तोंड फिरवून त्यो झोपाय गेला. मलानं तायडीला सकाळी जाग आली ती आईच्या हंबरड्यानं. माझा बाप घरातल्या तुळवीला लटकला होता.आयुष्यभर ज्यानं धरणीला माई मानलं, कपाळी कुंकवाचा नव्हे तर मातीचा मळवट भरला,बैलांना ज्यानं पोटच्या लेकरावानी जीव लावला,टीफन-नांगराला ज्यानं स्वताची ताकद मानलं, लेकरांच्या हट्टापायी ज्यानं बैलगाडी चा रथ केला,दुष्कालाला ज्यानं वेळोवेळी पराभवाचं आस्मान दाखवलं, वाळल्या मातीत फुटणाऱ्या अंकुराला ज्यानं कष्टाच्या घामाचा अभिषेक घातला,वाढणाऱ्या पिकाच्या डोक्यातुन हात फिरवून ज्यानं वात्सल्यानं आंजारल- गोंजारल आणि मिळालेल उत्पन्नाच २४ कँरेट सोन कवडीमोल दामानं बाजारात विकुन बापाप्रमाने अवघ्या जगाच्या पोटाची भुक भागवली त्याच माझ्या शेतकरी बालां आयुष्याचं वाक्य पुर्ण होण्याआधीच आत्महत्येसारखा पुर्णविराम द्यावा लागला आणि अस्वस्थ करणाऱ्या प्रश्नांच दुसर बीजं माझ्या मनाच्या कसदार मातीमध्ये रुजलं आणि अंकुररुपी प्रश्न मनातून बाहेर पडले,माझ्या बालां कर्जाच्या खाईत ओढणारा सततचा दुष्काळ,हातातोंडाला आलेल पीक मातीमोल करणारी गारपीट, अवकाळी पावसासारखी संकट, सतत गडगडलेले शेतपिकांचे बाजारभाव तर गगणाला भिडलेल्या खते-बियाण्यांच्या किंमती,व्यापाऱ्यांकडून होणारी पिळवणुक,शासकीय योजनांमध्ये होणारी फसवणुक, कृषीपुरक व्यवसायांना लागणारं अपुर भांडवल,या आणि *अशा अनेक संकटांमधून माझ्या बालां कोन बाहेर काढणार??त्याला "समृद्ध शिवार सुखी शेतकरी"या संकल्पनेतला सुखी शेतकरी कोन बनवणार??दुष्काळ, गारपीट या संकटांमधून शेती कशी व कोन वाचवणारं??शेतपिकांना योग्य बाजारभाव कोन मिळवून देणार??खते आणि बियाण्यांवरच्या शेतकऱ्याच्या अतिरिक्त खर्चावर टाळे ठोकुन पर्यायी योजना कोन करणार??बाजारातील व्यापाऱ्यांकडून होणारी पिळवणुक कोन थांबवणार??शासकीय योजना थेट शेतशिवारापर्यंत कोन पोहोचवणार??* हे व असे असंख्य प्रश्न मनःपटलावर अस्वस्थतेचा तांडव घालत असताणाच याच सर्व प्रश्नांची उत्तरेदेखील अस्वस्थ करणारीच मिळतात.
शेतकऱ्यांच्या या अडचणींवर तोडगा काढण्याची जबाबदारी शहरी भारतीयांनी घेतली तर??पण नाही, असे होने नाही कारण माझ्या भारताच्या शहरांच रुपांतर  आधुनिक इंग्रजाळलेल्या इंडिया मध्ये झालयं आणि म्हणुनच एकीकडे खेड्यांमधे शेतकरी अगोदरच गळ्याभोवती आलेला कर्जाचा गळफास आवळुन आत्महत्या करत असताना शहरांमध्ये कुणी सेल्फीच्या नादात स्वतःचा जीव गमावतं, कुणी मद्यधुंद अवस्थेत रिक्षा चालवताना अनेक निष्पापांचे बळी घेते,तर कुणी तरुण ड्रग्ज आणि हेरॉईनची नशा करुन रेव्ह पार्ट्या करण्यात दंग आहेत त्यामुळे भारतातील शहरी नागरिकांकडून अशी अपेक्षा करणेच चुकीचे आहे.
त्यामुळे या सगळ्या अडचणींच्या अंधारात शेतकऱ्यांना एकच आशेचा कीरण मिळू शकतो आणि तो म्हणजे सध्या कृषीक्षेत्रामधे शिक्षण घेणारा विद्यार्थी. सध्या महाराष्ट्रामध्ये जवळपास १५००० मुले दरवर्षी कृषीपदवीचे शिक्षण पुर्ण करतात.या सर्व विद्यार्थ्यांपैकी किमान ८५% विद्यार्थी शेतकऱ्यांचीच मुले आहेत.पण तरीदेखील या मुलांमध्ये सध्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांबद्दल म्हणावी तितकी संवेदनशीलता आलेली नाही. खरतरं या विद्यार्थ्यांना शेतकऱ्यांचे सर्व प्रश्न ठाऊक आहेत.त्याबरोबरच कृषिसुशिक्षीत असल्याने आपल्याच शेतकरी वडीलांचे प्रश्न ही मुलं योग्य पद्धतीने हाताळुन अभ्यासाने सर्व अडचणींवर तोडगा काढु शकतात आणि शेतकरी वडीलांना आपल्या कल्पक बुद्धिमत्तेच्या जोरावर समृद्ध करू शकतात.
अजून एक मुद्दा म्हणजे मुळातच भारतामध्ये विद्यापीठांची निर्मिती होत असताना समाजातील अनेक अडचणी सोडवून समाजामध्ये आमुलाग्र बदल घडवणे हा एकमेव उद्देश ठेवण्यात आला होता.पण महाराष्ट्रातील कृषि विद्यापीठे या उद्देशापासुन भरकटताना दीसत आहेत.ती फक्त विद्यार्थ्यांना शिक्षण देणे आणि फक्त परीक्षा घेऊन पास करणे एवढेच मर्यादित काम करत आहेत आणि पास झालेले पदवीधर,उच्च पदवीधर,पी.एच.डी.धारक विद्यार्थी सरकारी ,खाजगी क्षेत्रात नोकऱ्या करू लागतात आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे पाठ फिरवतात.विद्यापीठांनी डिग्री देण्यासोबतच लोकाभिमुख व्हायला हवं,उपलब्ध संसाधनांचा सर्वतोपरी वापर करुन प्रत्येक तालुक्यामध्ये शेतिविषयक कार्यशाळा घ्यायला हव्यात;वेळोवेळी शेतकऱ्यांशी संवाद साधायला हवा,नवी संशोधने त्यांच्या शेतशिवारांपर्यंत पोहोचवायला हवीत.प्रत्येक गावात शेतिविषयक प्रात्यक्षिके घेऊन नवशेतीतंत्रज्ञान शेतकऱ्यांना द्यायला हवं.अशाप्रकारे खऱ्या अर्थाने कृषी विद्यापीठे आणि कृषी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी शेतकरी,शेती,आणि शेतीच्या प्रश्नांबाबत संवेदनशील होऊन काम करण्यास सुरुवात केली तरचं शेतीचे प्रश्न सुटतील आणि शेती ,शेतकरी समृद्ध होईल अन्यथा.. *दुष्काळ... पेरणी...नापिकी...गारपीट...नुकसान...कर्ज...महागाई...मुलीचं लग्न...हुंडा... सावकार...गहान...वसुली...तगादे...आत्महत्या... आत्महत्या... आत्महत्या... शेवट...* 
@अमित जालिंदर शिंदे


टीप-वरील दोन्ही फोटो हे दिनांक ०१/०१/२०१८ च्या दै.अॅग्रोवन मध्ये प्रसिद्ध झालेले आहेत.

2 comments:

न्यूझीलंड,कोरोना,नागरीक आणि जेसिंडा आर्डर्न... न्यूझीलंड देशाचा राष्ट्रध्वज      न्यूझीलंड, प्रशांत महासागराने चौफेर वेढलेला एक बे...