Sunday, March 4, 2018

जलसंवर्धनाचे गर्भसंस्कार

                       जलसंवर्धनाचे गर्भसंस्कार
               
 
दुष्काळ
विदर्भ - मराठवाडा - प. महाराष्ट्र...भयाण माळरान...जिथं फक्त कुसळांचीच पिवळीधम्म शेती... उघडे बोडके उन्हाची सोनेरी झालर पांघरलेले टेकडीवजा डोंगर...मधूनच माना वर काढलेली चिलार- बाभळीची काटेरी झाडे... पाण्यासाठी आसुसलेली आणि बेभानपणे भटकंती करणारी गाई-गुरे- वासरे... मैलो न मैल पाण्यासाठी घडे - घागरी घेऊन चाललेली गावकरी बाई माणसांची पायपीट...आणि बरेच काही... ही परिस्थिती महाराष्ट्रात दरवर्षीच एप्रिल - मे मध्ये न सांगता उद्भवते.आता त्याला एका वाक्प्रचाराची जोड मिळाली आहे, "दुष्काळ आमच्या पाचवीलाच पुजलेला आहे".पण या दुष्काळावर मात करावी,पाण्याची बचत करावी,झाडे लावावी,पाणी अडवून जिरवाव या गोष्टींसाठी आमचा सदा न कदा होरपळलेला माणूस कधी तयारच झाला नाही.म्हणून जलसंवर्धन  करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने जलयुक्त शिवार मोहीम राबवली तर दुसरीकडे आमिर खानने  पाणी फाऊंडेशन ची स्थापना करून वॉटर कप स्पर्धेला सुरुवात केली.या स्पर्धेसाठी पाणी फाऊंडेशन स्वतः अगोदर गावकऱ्यांना चांगल्या कामासाठी  ट्रेनिंग देतं आणि नंतर आपल्या कामाची छाप निसर्गावर पाडून जल युक्त आणि दुष्काळमुक्त झालेल्या गावांना कोट्यवधी रुपयांची बक्षिसे देखील दिली जातात. जलयुक्त शिवार योजना आणि वॉटर कप स्पर्धेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील अनेक गावे आज कायमस्वरूपी दुष्काळमुक्त झाली आहेत.दरवर्षीप्रमाणेच याहीवर्षी वॉटर कप स्पर्धा २०१८ धूमधडाक्यात आणि नेहमीच्याच उत्साहात सुरू होणार आहे.या स्पर्धेच्या ट्रेनिंग चा कार्यक्रम महाराष्ट्रातील विविध केंद्रांवर तज्ञ मंडळींच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.यावर्षी एका ट्रेनिंग केंद्रांवर उमरखेड तालुक्यातील सोनधाबी गावातील अनिता साबळे नावाच्या व्यक्ती ट्रेनिंग घेत होत्या.अनिताताई ७ महिन्यांच्या गर्भवती आहेत.आणि आपल्या पोटात वाढणाऱ्या अभिमन्यू वर त्या द्रोपदिप्रमाने दुष्काळाचे चक्रव्यूह तोडण्याचे जणू गर्भसंस्कार च करत आहेत. राजे तुम्ही पुन्हा जन्माला या अशी नुसतीच आरोळी ठोकणाऱ्या आणि शिवाजी महाराज जन्माला यावेत तेही शेजाऱ्याच्या घरात या वृत्तीने जगणाऱ्या आजच्या समाजात अनिता साबळे यांच्यासारख्या जिजाऊ जन्माला आल्यात हीच एक जमेची बाब म्हणावी लागेल.यानंतरच्या काळात देखील त्यांचाच आदर्श डोळ्यांसमोर ठेऊन महाराष्ट्राच्या मातीत अश्या असंख्य जिजाऊ आईसाहेब जन्माला येतील.आणि समाजातील अनेक अनिष्ट गोष्टींच्या विरोधात लढण्यासाठी स्वतः जोमाने कामाला लागतील.आत्मनिर्भर होतील.लढवैया शिवाजी महाराजांच्या विचारांना जन्माला घालतील यात अनिता ताईंकडे पाहिलं की शंकाच उरत नाही.
अनिता साबळे ताईंच्या कामाला अनंत शुभेच्छा. त्यांचा गाव पाण्याने जल युक्त होवो.आणि माणसांमध्ये स्पर्धेच्या निमित्ताने आपुलकीचा ओलावा येवो हीच परमेश्र्वराकडे आपण सर्वजण मनोमन प्रार्थना करू.आणि आपणही पुढच्या काळात समाजकार्यासाठी कुठल्याही परिस्थितीत स्वतःला झोकून देऊ हाच संकल्प यानिमित्ताने करूयात.
@अमित जालिंदर शिंदे

No comments:

Post a Comment

न्यूझीलंड,कोरोना,नागरीक आणि जेसिंडा आर्डर्न... न्यूझीलंड देशाचा राष्ट्रध्वज      न्यूझीलंड, प्रशांत महासागराने चौफेर वेढलेला एक बे...