दप्तराच ओझं...
अलिकडच्या काळात विद्यार्थी आणि त्यांच दप्तर हा फारच चर्चेचा विषय झालाय.हा विषय आता विधीमंडळाच्या सभागृहात, न्यूज चँनेलच्या पँनल डीबेटमध्ये आणि वर्तमानपत्रांच्या हेडलाईन्समध्ये झळकु लागलाय.हे चित्र पाहात असताना माझ्या पिढीचे आणि माझ्या अगोदरचे सगळेच साक्षर त्यांच्या शालेय जीवनाच्या फ्लँशबँक मधे गेले नसतील तर नवलचं.माझ्या पिढीला हे दप्तर शाळेत घेऊन जाण्यासाठी पाठीवरच्या बँग बऱ्यापैकी मिळत होत्या.(आता सरसकट सगळ्यांकडेच असतात).२००० ते २००५ च्या माझ्या प्राथमिक शाळेच्या जीवनात काळी पाठी,पेंसिल,एखादीच वही,अंकलिपि,आणि पाठ्यपुस्तक मंडळाने दीलेली मराठी, इंग्रजी, परिसर अभ्यास ह्या ३ पुस्तकांव्यतिरिक्त अधिक कुठली गोष्ट वापरल्याच मला आठवत नाही(इयत्ता ३री,४थी ला इतिहासाचे पुस्तक).पण २००५ नंतरच्या काळात मुलांचा इंग्लिश मिडीयमकडे ओढा वाढला(मुलांपेक्षा पालकांचाच).आणि मग इंग्लिश मीडियमला जाणाऱ्या मुलांना चित्रे पाहायची वही वेगळी,ती रंगवायची वही वेगळी,ती गिरवायची वही वेगळी अशा एक ना अनेक भाराभर चिंध्या घेऊन शाळेत जायची वेळ वयाच्या अवघ्या ५-६ व्या वर्षीच आली.त्याचवेळी बंद पडत चाललेल्या प्राथमिक शाळांना स्वतःच अस्तित्व टीकविण्यासाठी इंग्लिश मिडीयम शाळांच्या उपक्रमांचे अनुकरण करण्याची वेळ आली आणि आपसुकच लहान लहान मुलांच्या पाठीवरचे ओझे वाढायला लागले,त्यास भर म्हणून की काय एका हातात डब्याची पिशवी अजून वाढली.कारण पाठीवरच्या बँगमधली डब्याची जागा वाढलेल्या वह्या-पुस्तकांनी घेऊन टाकली.
आम्ही माध्यमिक शिक्षण घेत होतो तेव्हा अर्ध्याहून अधिक मुले आठवड्याच्या बाजाराला वापरतो ती नायलॉनच्या वायरची पिशवी दप्तर म्हणून वापरायचे.३-४ कि.मी.अंतर चालुन शाळेला येणाऱ्या मुलांचे हात ती पिशवी धरून अवघडून जायचे.म्हणूनच कदाचित त्या पिढीच्या मनगटात शाळा करून घरची चार काम करण्याचदेखील बळ असायचं.त्यावेळी त्या वायरच्या पिशवीत ६ ते ८ वेगवेगळ्या विषयाच्या वह्या,तेवढीच पुस्तके आणि तेवढ्याच ग्रहपाठाच्या वह्या,जेवनाचा डबा,एक प्रयोगवही,कंपासपेटी अस बरचसं सामान असायचं.ते सगळ पिशवीत व्यवस्थित बसविण्याच टापटीपपणाचदेखील एक कौशल्य माझ्या समकालीन विद्यार्थ्यांमध्ये होत.त्या मुलांना तेवढ्या दप्तराच कधी ओझ वाटायच नाही,कारण आकरी (कच्च)दुध पिऊन,घरची चारदोन काम करुन ,अभ्यास करून मग शाळेला येणारी ती मुल शारिरीकद्रुष्ट्यादेखील तितकी सक्षम असायची.आताच्या हॉर्लिक्स पिऊन उंची वाढविण्याच्या आणि बॉर्न विटा पिऊन स्मरणशक्ती वाढविण्याच्या जमान्यातील मुले हायब्रिड धान्य खाऊन शारीरिकद्रुष्ट्या अतिशय क्षीण झालेली आहेत. त्यात भरीस भर म्हणून टि.व्ही. वरच्या मोटु-पतलु बघत बघत,व्हिडीओ,थ्री.डी.,एच.डी. गेम्स, आणि सोशल मिडीयाने मुलांचा मेंदूदेखील इतका क्षीण करून ठेवलाय की साध्या साध्या समस्यांची उत्तरे हल्लीच्या विद्यार्थ्यांना आत्महत्येसारख्या पर्यायांमध्ये शोधावी लागतात.
पुर्वी इयत्ता नववी आणि दहावी मध्ये बीजगणित-भुमिती,विज्ञान आणि तंत्रज्ञान, सामाजिक शास्त्रे,या तीन विषयांची परिक्षा प्रत्येकी १५० गुणांची असायची.आता ह्या तीनही विषयांची परिक्षा प्रत्येकी १०० गुणांची होते.गुण कमी झाले म्हणजे साहाजिकच प्रश्नांची संख्यादेखील कमी झाली.लिखानाच हे ओझ आता थोडस हलक झालयं.
प्रत्येक विद्यार्थ्याची बौद्धिक आणि शारीरिक पातळी एकसारखी नसली तरी शिक्षण हे साक्षर होण्याच साधन आता पुर्वीपेक्षा अनेक पटीने हलकं झालेल असताना दप्तराच्या ओझ्याचा उगीच बाऊ करण्यात काहीच अर्थ नाही. शिक्षण हे आता केवळ व्यक्तिला साक्षर बनविण्याचे आणि जगायला शिकविण्याचे साधन राहिले आहे.काहीतरी शिकला की कुठेतरी नोकरी मिळण्याचे दिवस आता राहिले नाहीत. जगाची स्पर्धा करीत असताना दप्तराच ओझ कमी करण्यापेक्षा विद्यार्थ्यांनाच ते ओझ उचलण्याइतपत सद्रुढ बनवायला हवं.त्यांच्या मेंदूच मानसिक खच्चीकरण करणारी गेमिंग आणि सोशल मीडियाची साधने त्यांच्यापासून दूरच ठेवून (किमान माध्यमिक शिक्षण पुर्ण होईपर्यंत) त्यांच्या मेंदूवरचे मानसिक ओझे हलके करायला हवे.खाजगीकरणाच्या या जमान्यात गुणांपेक्षा ज्ञानाला जास्त महत्त्व येत असल्याने पालकांनी गुणांच्या वाजवी अपेक्षांचे नाहक ओझे पाल्यांवर टाकण्यापेक्षा त्यांना ज्ञानाच्या महासागरात डुंबायची मोकळीक द्यावी तरच आजचादेखील विद्यार्थी उद्याच्या महासत्ता भारताची स्वप्ने साकार करू शकेल.
@अमित जालिंदर शिंदे
उत्कृष्ट अमित तुझं लिखाण आहे.
ReplyDeleteNice
ReplyDelete