Tuesday, October 1, 2019

आदरणीय बापूजी, तुम्ही अमर आहात.

 आदरणीय बापूजी,
 तुम्ही अमर आहात.                                                     
    

     आदरणीय बापूजी, मागील काही दीवसांमध्ये तुमच्या पुतळ्यावर एका साध्वीने गोळ्या घातल्या. पण बापू यात तुमचा मृत्यू झाला नाही कारण तुम्ही तुमच्या कार्याने या अगोदरच अमर झाला आहात.   स्वातंत्र्यापूर्वी आणि स्वातंत्र्यानंतर तुमच्या हत्येपर्यंत तुमच्यावर नऊवेळा शस्त्रास्त्र हल्ले झाले. खरतर कुठलही बुलेट प्रुफ जँकेट घातलेल नसताना. आयुष्यात कधी शस्त्राला हात लावलेला नसताना तुमच्यावर नऊ शस्त्रास्त्र हल्ले झाले. यावरूनच तुमच्या ताकदीचा अंदाज आम्हाला येतो. बापू पाचगणीला नथुराम सुरा घेऊन तुमच्या मागे लागला तेव्हा तुमच्या अनुयायांपासून नथुरामला तुम्हीच वाचवले. ज्या नथुरामला तुम्ही वाचवले त्याच नथुरामने पुढे तुमचा घात केला. आज तुमच्या मृत्यूपश्चात ७० वर्षांनी त्याच नथुरामचे चाहते तुमच्यावर परत गोळ्या झाडतात. कारण ७० वर्षांपूर्वी आणि आज ७० वर्षानंतर देखील ते फक्त तुमच्या देहावर गोळ्या घालू शकले. विचारांवर नाही. तुमचे विचार आजही आमच्यासारख्या तरुणांच्या मनावर गारुड घालून बसलेत.

    बापू, खेद एकाच गोष्टीचा वाटतो. तीन गोळ्या लागल्यानंतर तुम्ही राम नामाचा जप करत प्राण सोडलात. त्यावेळी तुमच्यावर गोळ्या घालणाऱ्या नथु'राम' च्या नावात राम आहे. आज तुमच्या पुतळ्यावर गोळ्या घालणाऱ्या साध्वी देखील रामाचेच नाव घेऊन स्वत:चे अस्तित्व टिकवते आहे. मग बापू तुमचा राम आणि त्यांचा राम यात फरक काय आहे??बापू तुम्ही ग्रामस्वराज्यासाठी रामराज्याची संकल्पना मांडत होतात. मग रामाच नाव घेऊन अस्तित्व टिकवणाऱ्यांना रामराज्य मान्य नव्हत का??
   बापू, आज देश तुमच्या जयंतीच हे १५० व वर्ष साजर करतोय. केंद्र सरकार व राज्य सरकार विविध उपक्रम राबवून तुमचे विचार अजरामर ठेवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. एकीकडे सरकार यासाठी प्रयत्न करीत असताना 'नथुराम देशभक्त था' म्हणणाऱ्या विक्रुतीला जनतेन खासदार म्हणून संसदेत पाठवलय याच खर दु:ख वाटतयं. बापू आजच्या तरुण पिढीला जेव्हा आम्ही सेवाग्राम बद्दल विचारतो तेव्हा आमचेच काही तरुण सहकारी 'तिथे झोपड्यांशिवाय आहेच काय??'अस विचारतात. तेव्हा मन सुन्न होत कारण बापू त्याच झोपडीत बसून तुम्ही देशभर स्वातंत्र्याच्या ज्वाळा पेटवल्या होत्या. त्याच झोपडीतून आलेल्या एका हाकेवर उभा हिंदूस्थान एक होऊन लढ्यात उतरत होता. आमच्या तरुण सहकाऱ्यांना सेवाग्राम मधल्या त्या झोपड्यांची ताकद आणि तिथुन मिळणाऱ्या देशभक्तीच्या ऊर्जेची महती सांगण्यात आम्हीच कमी पडलो. त्याबद्दल तुमची क्षमा मागतो. तुमच क्षमाशील व्यक्तिमत्त्व मला क्षमा करील आणि तुमच्या विचाराचा प्रसार करण्यासाठी शक्ती देईल एवढीच माफक अपेक्षा. भारतावर अनेक राजांनी महाराजांनी राज्य केलं. पण काश्मिर पासून कन्याकुमारीपर्यंत आणि लाहोर पासून अरुणाचल प्रदेश पर्यंत अखंड भारताने नेतृत्व मान्य केलेली तुम्ही पहिली व्यक्ती होतात.
     बापू, तुमच्या नावाची पांढरी गांधीटोपी घालून जेव्हा सुमार लोक उसण्या देशभक्तीबद्दल बोलतात तेव्हा माझ्यासारख्याला त्यांच्याकडून एकच अपेक्षा असते. स्वतःच्या स्वार्थी पोळ्या भाजण्यासाठी गांधी टोपी घालून खोट बोलण्यापेक्षा त्या टोपीतला विचार टोपीखालच्या डोक्यात पाझरु द्यात. बापू तुम्ही आत्मटिका करून स्वतःच्या चुका स्वतः सुधारत होतात. अलिकडे समाजात स्वतःची चुकच मान्य न करण्याची प्रवृत्ती वैगाने फैलावताना पाहिल्यावर जगभरात तुमच्या नावाने ओळखला जाणारा हा भारत देश खरच तुमचा राहिलाय का??असा प्रश्न पडतो. 
    बापू, सत्य अहिंसा आणि प्रेमाणे जग जिंकण्याचा तुमचा विचार आजच्या प्रत्येक तरुणाने अंगिकारला पाहिजे. ग्रामस्वराज्यासाठी रामराज्याची तुमची संकल्पना आजदेखील अंमलात आणण्याची गरज आहे. तुमची क्षमाशील व्रत्ती आणि औदार्य यांचे समाजामध्ये बीजारोपण होऊन शांत, सुखी, आणि सामाजिक सलोख्याने भारलेला समाज निर्माण व्हायला हवा. बापू संकल्प करतो या सगळ्या गोष्टींसाठी मी माझा खारीचा वाटा निश्चितपणाने उचलेन आणि इतरांनादेखील त्याची जाणीव करून देईन. आत्मटिका करुन स्वतःचे व्यक्तिमत्त्व पारदर्शक घडविण्याचा तुमचा गुण मी स्वतः आत्मसात करून माझ्या सहकाऱ्यांमधेही रुजविण्याचा प्रयत्न करीन. बापू यासाठी तुम्ही मला नेहमीच आशिर्वाद द्याल आणि तुमच्या विचाराची साथही द्याल एवढीच अपेक्षा करतो आणि तुम्हाला स्मरण करुन आदरांजली वाहातो.
बापू तुम्ही अमर आहात आणि अमर राहा.

                                                             तुमचाच 
                                               @अमित जालिंदर शिंदे

No comments:

Post a Comment

न्यूझीलंड,कोरोना,नागरीक आणि जेसिंडा आर्डर्न... न्यूझीलंड देशाचा राष्ट्रध्वज      न्यूझीलंड, प्रशांत महासागराने चौफेर वेढलेला एक बे...