Friday, December 7, 2018
Saturday, December 1, 2018
पाण्यासाठीचा विजयी संघर्ष...
यंदा सांगोल्यामध्ये पाऊस पडलाच नाही. दुष्काळाची दाहकता इतकी भयानक आहे की यंदा खरीप आणि रबी दोन्ही हंगाम १०० टक्के फेल गेले.डाळिंब,बोरी,पेरू,द्राक्षे अशी फळपिके घेऊन उत्पादनांचे विक्रम करणाऱ्या अनेक शेतकऱ्यांनी पाण्याची अवस्था पाहून फळबागा सोडून दील्या.ज्या शेतकऱ्यांनी धाडसाने पाणी पुरेल या आशेने बागांचे बहर धरले त्यांच्या बागांना नेमकं फळाच्या वाढीच्या काळात पाणी कमी पडू लागलं होत.पाण्याविना जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न देखील निर्माण झाला होता.टेंभू उपसा सिंचन योजनेतुन सांगोला तालुक्याच्या हक्काचे पाणी देखील सांगोल्याला आजपर्यंत मिळत नव्हते.५० वर्षांपूर्वी १९७२ च्या दुष्काळी परिस्थितीमधे रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून काढलेल्या नीरा उजवा कालव्याला अद्याप पर्यंत कधीच पाणी आले नव्हते ते यावर्षी ऑक्टोबर महिन्यामधे चाचणी घेण्याच्या निमित्ताने का होईना पण आले.त्या कालव्याची कामे सुरू असली तरी तालुक्याच्या हक्काचे पाणी यायला अजून किती दिवस लागतील हे सांगता येत नाही.टेंभू आणि म्हैसाळ योजनेच तालुक्याच्या हक्काचे पाणी आजपर्यंत शेजारच्या तालुक्यातील शेतकऱ्यांनीच वापरले.अशा पार्श्वभूमीवर सांगोल्यातील मान नदीकाठावरच्या चिनके पासून मेथवडे पर्यंत कायम पाण्यापासून वंचित राहिलेल्या गावातील तरुणांनी संघटित होऊन एक क्रुती समिती तयार केली.
२०१९ च्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील पाणी प्रश्न पेटणार होताच.आमदारकीचे सर्वच उमेदवार केवळ दुष्काळ आणि पाणी याच दोन मुद्द्यांवर एकमेकांवर गरळ ओकणार होतेच . वेगवेगळ्या कार्यक्रमांमधुन त्याची सुरुवात देखील झाली होती.पण तत्पूर्वी या १४ गावांतील जनतेने आंदोलनाची गुगली अशी टाकली की सर्वच नेते आणि त्यांच राजकारण बँकफुटवर गेलं आणि जनता फ्रंटफुटवर आली.
१)मान नदिवरचे १४ गावातील कोल्हापूर पद्धतीचे बंधारे हक्काच्या टेंभू योजनेच्या पाण्यातून भरून द्यावेत.
२)माण नदिला कालव्याचा दर्जा द्यावा.
३)नीरा उजवा कालव्याची कामे लवकरात लवकर पुर्ण करुन हक्काचे पाणी तालुक्याला मिळावे या आणि अशा आणखी काही मागण्या घेऊन १४ गावच्या जनतेने क्रुती समितीच्या नेतृत्वाखाली सांगोला तहसिल कार्यालयावर मोर्चा काढला.या मोर्चाचे फलित म्हणून टेंभू योजनेच्या पाण्याने बंधारे भरण्यासाठी १६ नोव्हेंबर ला पाणी माण नदीपात्रात सोडण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले होते.पण १६ तारीख उलटून गेली तरी पाणी सोडण्याबाबतीत कुठलीच क्रुती न झाल्याने.१४ गावांतील शेतकऱ्यांनी क्रुती समितीच्या नेतृत्वाखाली जनावरांसह तहसिल कार्यालयावर धरणे आंदोलनाला १७ नोव्हेंबरपासुन सुरुवात केली.सोबतच दिपक पवार व दत्ता टापरे या युवकांनी पाणी मेथवडे बंधाऱ्यांमधे पोहोचत नाही तोवर बेमुदत उपोषनाचा निर्णय घेतला.या आंदोनस्थळी तालुक्यातील सर्वच नेतेमंडळीनी भेटी दिल्या पण पाणी येण्यासाठी त्यांच्याकडून तातडीने जे प्रयत्न होणे गरजेचे होते ते झाले नाहीत.खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांनी जबाबदारी ओळखुन तोडगा काढण्याचा प्रयत्न केला.मंत्री विजयबापु शिवतारे आणि क्रुती समितीच्या झालेल्या बैठकीत तोडगा काढण्याचे प्रयत्न देखील झाले.उपोषणकर्त्यांच्या तब्येती बिघडल्या.२४० तास म्हणजे १० दिवस उपोषण केल्यानंतर,तळपत्या उनाची आणि रात्रीच्या थंडीची कसलीही तमा न करता शेतकरी आणि जनावरानी तहसिल कार्यालयावर ठीय्या मांडल्यानंतर आणि या आंदोलनात उष्माघाताने एका म्हशीचा बळी गेल्यानंतर या आंदोलनाला यश आले.२७ नोव्हेंबरला टेंभू योजनेचे पाणी मान नदीच्या दिशेने मार्गस्थ झाले.३० नोव्हेंबर ला अनेक अडथळे पार करत हे पाणी सांगोल्यातील चिणके गावामध्ये दाखल झाले.प्रचंड मोठा संघर्ष करून मिळालेल्या या पाण्याला पाहण्यासाठी चिणके येथे क्रुति समितीसह मोठ्या संख्येने लोक आले होते.एका दुष्काळी तालुक्याच्या आजपर्यंतच्या इतिहासात पाण्यासाठी झालेले हे आजपर्यंतचे सर्वात प्रभावी, आक्रमक आणि यशस्वी आंदोलन आहे.क्रुती समितीचे नियोजन,शेवटपर्यंत मागण्यांवर ठाम राहण्याचा संयम,एकी,जनावरांसह अद्यापपर्यंत तेथेच बसुन असलेल्या शेतकऱ्यांची सहनशीलता, उपोषणकर्त्यांचा धीर,आणि प्रसारमाध्यमांनी तालुक्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांनी शेवटपर्यंत दिलेली साथ,अनेकांनी जनावरांसाठी केलेली चारा आणि पाण्याची सोय सगळच कौतुकास्पद होतं.हा संघर्ष सुरू झाल्यापासून त्याला यश मिळेपर्यंतचा या आंदोलनाचा प्रवास थक्क करणारा वाटतो.एकप्रकारे यंदाच्या भीषण दुष्काळनेच शेतकऱ्यांना लढायला बळ दिले अस म्हणायला हरकत नाही. आणि लढण्याची ईच्छा असणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना एकीच्या वज्रमुठीत सामावून घेण्याची आणि त्यांच्यात चैतन्य निर्माण करण्याची किमया साधली क्रुति समितीच्या तरुण ,तडफदार युवकांनी. सर्वांनी या आंदोलनातील आपलीआपली जबाबदारी ओळखुन अतिशय चोखपणे ती निभावल्यानेच या पक्षविरहीत आंदोलनाला यश मिळाले.या आंदोलनातुन संघर्ष केल्याशिवाय आणि लोकप्रतिनिधी व प्रशासनाच्या माणगुटिवर बसल्याशिवाय आपली कामे होत नसतात हि अतिशय मोलाची शिकवनदेखील तालुक्याला मिळाली.
एकीकडे २३ते २६ नोव्हेंबर २०१८ या कालावधीत नागपुरमध्ये मध्य भारतातील सर्वात मोठे क्रुषी प्रदर्शन 'अँग्रो व्हिजन' नितीन गडकरीच्या नेतृत्वाखाली पार पडत होते.उद्घाटनाच्या कार्यक्रमामध्ये योगी आदित्यनाथ, केंद्रीय क्रुषीमंत्री राधामोहन सिंह,चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'दुष्काळाशी झगडत देखील सांगोला सर्वच प्रकारच्या फळबागांचा हॉर्टिकल्चरल झोन होत असल्याची माहिती दिली.' शेततळ्यांच्या माध्यामातुन तालुक्याने केलेल्या सुक्ष्म सिंचन क्रांतीचे कौतुक राज्यभरात होत असते.पण त्याच सांगोल्यातील शेतकऱ्यांना हि फळशेती टिकविण्यासाठी एवढा संघर्ष करावा रागत असेल तोही हक्काच्या पाण्यासाठी तर हि अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे.पण या आंदोलनाची गांभीर्याने दखल घेत शासण आणि प्रशासणाने लक्षात ठेवावे की सांगोल्यातला तरुण शेतकरी खडबडून जागा झालाय.आणि तो आता यापुढे त्यांच्या हक्काचे पाणी कधीच सोडणार नाही.हक्काचे पाणी तो मिळवणारच.सुदैवाने यापुढील काळात पाऊस वेळेत पडावा आणि निसर्गाचा सर्वांगीण समतोल राहावा जेणेकरून कोरडा दुष्काळ पडु नये.शेवटी १४ गावांची क्रुती समिती,समितीतील सर्व तरुण,आणि आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांचे अभिनंदन आणि आगामी काळासाठी हार्दिक शुभेच्छा.आपली शेती सम्रुद्ध व्हावी.
@अमित जालिंदर शिंदे
@अमित जालिंदर शिंदे
Friday, November 16, 2018
ह्या दुष्काळाच नक्की करायचं तरी काय??
ह्या दुष्काळाच नक्की करायचं तरी काय??
आज अवघ्या महाराष्ट्रावर दुष्काळाचे घनदाट ढग गडगडत आहेत. शेतीचा विचार दुरचं,प्यायच्या पाण्याची अवस्थादेखील भयंकर बिकट झाली आहे.मराठवाड्याला वरदायिनी असलेलं जायकवाडी रिकामच राहीलं.ते नगर आणि नाशिकमधल्या पाण्याने भरून घेण्यावरुन अगदी न्यायालयातुन निर्णय घ्यावा लागला.मागील काही वर्षांचा अभ्यास केला तर आपल्याला समजेल की पावसाचे प्रमाण प्रत्येक वर्षी कमीकमीच होतयं.यावर्षी तर महाराष्ट्राच्या काही भागात पाऊस कसलाच पडला नाही. मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात आजपर्यंतच्या सर्वात मोठ्या दुष्काळाची काळीभोर छाया आहे.दुष्काळमुक्तीसाठी जलसंवर्धन गरजेचे आहे हे एक सत्य आहेच पण पाऊसच पडणार नसेल तर कुठल्या पाण्याचे जलसंवर्धन आपण करणार आहोत??याच कारणामुळे कदाचित जलयुक्त शिवार आणि वॉटर कप सारख्या चळवळी होऊनदेखील भुजल पातळीत १ मीटरने घट झालीये.सांगोला-आटपाडी सारख्या तालुक्यांमध्ये १५०० फुट खोल बोअरवेल घेतले तरी नुसता धुरळाच उडताना पाहायला मिळतोय. दिवसेंदिवस माणूस निसर्गावर अतिक्रमण करू पाहतोय. आणि त्यातूनच मोठ्या प्रमाणावर झाडांच्या कत्तली होत आहेत. वनांच्या घटत्या टक्केवारीमुळेच हवेतील कार्बन डायऑक्साईड वाढतोय. आणि, जागतिक तापमानवाढीसारख्या संकटांचा आपल्याला सामना करावा लागतोय.ढगांतील सुक्ष्म जलकणांचे मोठ्या जलबिंदुत रुपांतर झाल्यानंतर झाल्यानंतर हे जलबिंदु हवेपेक्षा जड होऊन पाऊस पडतो.यासाठी वातावरणात गारवा असणे महत्त्वाचे असते.झाडे तोडली गेल्यामुळे आम्ही मात्र जागतिक तापमानवाढीचा सामना करतोय. कसा पडणार मग पाऊस??
सरकार दरवर्षी कोट्यावधी व्रुक्षलागवडीचा कार्यक्रम महिनाभर धुमधडाक्यात करते पण गरज आहे ती लावलेल्या झाडांचे संगोपन करण्याची आणि त्यासाठी वर्षभर कोट्यावधी व्रुक्षसंगोपन मोहीम राबविण्याची.'सरकारी काम आणि सहा महिने थांब' ही आपल्या सर्वच सरकारी योजनांची ओळख.असो,सरकार काय करतं यापेक्षा आपण सुजाण नागरिक काय करतो हे अधिक महत्त्वाचे आहे.आपण आपली शेती सम्रुद्ध ठेवण्यासाठी ,पाण्याचे दुर्भिक्ष टाळण्यासाठी स्वतःच आपल्या स्वतःच्या शेताच्या बांधावर,परसबागेमध्ये व्रुक्षलागवड करून त्यांचे संगोपन करणेही गरजेचे आहे.अन्यथा पाण्याविना विनाश फार काही दूर नाही.
पाण्याच्या तुट निर्माण होण्याला आणि भुजलपातळी खोलावण्याला वाढलेली लोकसंख्या हे देखील महत्त्वाचे कारण आहे.लोकसंख्या वाढली.लोकांच्या गरजा वाढल्या .गरजा भागविण्यासाठी परत व्रुक्षतोड झाली. पाऊस खूप कमी पडू लागला.१९४७ ला भारताची ३० कोटींच्या घरात असलेली लोकसंख्या चारपटीने वाढली तर पावसाचे प्रमाण चारपटीने कमी झाले. पाण्याची गरज भागविण्यासाठी विहिरी,आड आणि शेकडो फुटांच्या बोअरवेल खणल्या गेल्या. वीजेवरच्या इंजिनांच्या साहाय्याने भुगर्भातील पाण्याचा प्रचंड उपसा होत गेला.तुलनेत पाऊस कमीच पडू लागला.त्यामुळे आगामी काळात आपल्या जोशील्या तरुण भारताला व्रुक्षलागवड,व्रुक्षसंगोपन आणि जलसंवर्धनाबरोबरच लोकसंख्या नियंत्रण देखील ठेवावे लागणार आहे.आणि या गोष्टींसाठी शासकीय मोहीमा आणि योजनांपेक्षा लोकचळवळ आणि जाग्रुती होण्याची खरी गरज आहे.
चला तर मग येणाऱ्या दुष्काळाचा साहसाने सामना करताना निर्धार करुया व्रुक्षलागवडीचा,त्यांच्या संगोपनाचा,जलसंवर्धनाचा आणि लोकसंख्या नियंत्रणाचादेखील...
@अमित जालिंदर शिंदे.
⏺️सांगोल्यातील यंदाच्या दुष्काळाची दाहकता दाखवणारी काही छायाचित्रे
![]() |
| कधी नव्हे ते जनावरांच्या चाऱ्यासाठी कारखाण्यांच्या एफ.आर.पी.पेक्षा महाग दराने ऊस खरेदी करताना पशुपालक. हे चित्र असेच राहिले आणि शासणाने चाऱ्याची व्यवस्था केली नाही तर जनावरे मोकाट सोडावी लागतील |
Friday, November 2, 2018
Wednesday, October 24, 2018
Sunday, October 21, 2018
पंढरीची वारी
राधाबाई आज निवांत पडल्या होत्या.काही केल्या त्यांचा डोळा उघडत नव्हता.दररोज ह्या वक्ताला शेणघाण काढून,जणावरांना वैरण-पाणी करुन,स्वताच आवरुन,दुपारच्या जेवणाचं गाठोडं बांधून त्या सकवराबाईंची वाट बघत बसलेल्या असायच्या.दोघी मिळून कामावर जायच्या आणि स्वताची घरे चालवायच्या.नवऱ्याच्या अकाली मरणानंतर,ऐन तारुण्यात कपाळ पांढरं झालेल्या राधाबाईंनी गावात मिळेल त्याच्या शेतावर काम करून सुषमाचं शिक्षण पूर्ण केले,लाखभर रुपये हुंडा देऊन चांगला नोकरदार मुलगा शोधून गावाचे डोळे दिपवून टाकेल अस शाही लग्न लावून दीलं.
सुषमा ही राधाबाईची एकुलती एक मुलगी.आखीव-रेखीव चेहऱ्याची आणि गोऱ्यापान रंगाची सुषमा पहिल्या नजरेतचं कुणाच्याही डोळ्यात भरेल अशीच होती. लहानपणी डेंग्यूच्या तापाने मरणाच्या दारात पोहोचलेल्या सुषमाला राधाबाईने मुंबईच्या मोठ्या दवाखान्यात नेऊन जीवंत केले होते. सुषमाच्या दवाखान्यातील खर्चासाठी तिने शामराव पाटलाकडुन ५००००₹ कर्ज घेतल होतं.हे कर्ज फेडण्यासाठी पुढे वर्षभर राधाबाई पाटलाच्या घरी धुणीभांडी,झाडलोट, धारापाणी,खुरपणी करीत होती.सुषमाला पोटभर जेवायला मिळावं,तिला चांगले कपडे मिळावेत, वह्या-पुस्तकं वेळेत मिळावीत,तिला काही कमी पडू नये म्हणुन राधाबाई स्वतःच्या पोटाला चिमटा काढून,हौसमौज विसरून दररोज सुर्योदयापासुन,सुर्यास्तापर्यंत दुसऱ्यांच्या शेतात खपायची.अगदी गड्यावाणी काम करायची.अभ्यासात हुशार असलेल्या सुषमाचं कौतुक करताना तिचा ऊर भरून यायचा."माझी पोरगी मोठ्ठी सायबीन व्हयलं आणि मला चार चाकाच्या गाडीतनं पंढरीच्या विठुबाकडं न्हील"असा डंका राधाबाई सगळ्या गावात पिटत असे.
सुषमादेखील शिकून पुण्याला गेली.मोठ्या आय.टी.कंपनीमध्ये मोठ्या पदावर नोकरीला लागली. तिनं मोबाईल घेतला. आईला साधा फोन घेऊन दीला.पण लग्नानंतर जसजसं शहराच वारं तिला लागत गेलं तसतसे तिच्यात बदल होऊ लागले.काबाडकष्ट करून शिकविणाऱ्या आईचा तिला विसर पडू लागला.रोज होणारा फोन आता चुकून आठवण आली की १०-१५ दीवसातुन होऊ लागला.महिन्याभराला होणारी भेट आता सहा-सहा महिने होत नव्हती. पुर्वी आईला खर्चासाठी महीन्याला २०००₹ पाठविणारी सुषमा आता २००₹ देखील वेळेत पाठवत नव्हती .त्यामुळे आख्खं आयुष्य कष्टात घालविलेल्या राधाबाईच्या नशिबी परत दारिद्र्य आलेलं.म्हातारपणी दुबळं शरीर घेऊन आता परत वितभर पोट भरण्यासाठी कामाच्या शोधात दुसऱ्यांचे बांध पालथे घालण्याची वेळ आली होती. असं नव्हत की सुषमाला कामातुन वेळ मिळत नसेल किंवा शहरात पगार पुरत नव्हता,पण मिळालेला वेळ आणि पगारदेखील सुषमाला फँन्सी कपडे,मेक-अप,खाण्या-पिण्याच्या पार्ट्या,सिनेमे आणि इतर अव्याहत खर्चासाठी पुरत नव्हता.राधाबाईंना असही ऐकायला मिळाल होत की,"आय.टी.कंपनीत काम करुन गलेलठ्ठ पैसा मिळविणारी सुषमा नवऱ्यासोबतच दारुही प्यायला शिकलेली",पण शहरात थोड चालत असेल असा ग्रह करुन भाबड्या राधाबाईंनी मनाची समजूत घातलेली.
एव्हाना सकवराबाई,राधाबाईंच्या घरी येऊन पोहोचलेल्या. त्या राधाबाईंना हाकारुन उठवत होत्या,पण काही केल्या राधाबाई उठत नव्हत्या.नंतर त्यांनी राधाबाईंना गदागदा हलवून उठविण्याचा देखील प्रयत्न केला पण तरीही त्या उठेनात.सकवराबाईंनी एकच टाहो फोडला.त्यांच्या जीवाभावाची, २० वर्षे कामात साथ देणारी भोळीभाबडी राधा या जगात राहिली नव्हती.ती देवाला प्यारी झाली होती.सकवराने फोडलेला टाहो ऐकून,तिच्या आरडून-ओरडून रडण्याने सगळा गाव आणि राधाबाईची आख्खी पवाराची भावकी गोळा झाली होती. सगळा गाव हळहळत होता.एव्हाना दुपार झालेली,पण सुषमा अजून आली नव्हती.सकाळीच गावकऱ्यांनी तिला निरोप पोहोचवला होता.अंत्यसंस्कारासाठी ताठकळत बसलेल्या गावकऱ्यांचा संयम आता संपत आला होता.म्हणून त्यांनी एकदा सुषमाला शेवटचा फोन करून पाहायचं ठरवलं. शेवटी सरपंच शामराव पाटलांनी पुढाकार घेऊन फोन लावला.नशेत तर्र असलेल्या सुषमाने फोन उचलताच सरपंचांनी विचारले,
"ते नव्हं,सुषमा बाळ,तु कुठवर आली हायस??आम्ही अजून किती वकुत वाट पाहायची??"
सुषमा,"तुम्ही अंत्यसंस्कार करून घ्या.माझ्या येण्याने काही ती आता जीवंत नाही होणार,आणि माझ्याकडे आता तेवढा वेळ पण नाही."
सरपंच,"आगं पोरी आस वाईट-वंगाळ नगु बोलुस,आय हाय तुजी ती,तुला तिचा मुखडा शेवटचा एकदा बगु वाटत आसल की गं लेकरा??"
सुषमा,"मला तिचा फोटो व्हाट्स-अँप ला पाठवा की,वेळ मिळाला की पाहून घेईन मी."
सरपंच,"आगं यीडी का खुळी-बिळी झालीस तु,फुटुत तिच त्वांड मस्त बघशील ग पण तिच्या अस्थी पंढरीच्या चंद्रभागेत कोण ग सोडणार बाईई??"
सुषमा,"त्याच तुम्ही मला कुरिअर पाठवा,पुढचं माझ मी बघते,आणि खर्चाचं सांगा मी पैसे पाठवुन देते."
हे ऐकताच तळपायाची आग मस्तकात गेलेल्या शामरावांनी दणकन फोन आदळला.गावकऱ्यांनी राधाबाईंचे अंत्यसंस्कार यथोचित पार पाडले.सकवराचा थोरला ६ वी नापास झालेला लेक सुनीलने राधाबाईंना मुखाग्नी दीला.सुषमाला मात्र काबाडकष्ट करणाऱ्या आईचा विसर पडला.शिक्षित होऊन आय.टी.त काम करताना आणि शहरातल्या आभासी,अस्थायी जीवनाची भुरळ पडलेली सुषमा वास्तव जीवनातील स्थायी नाती विसरून गेली.आय.टी. तल्या यशाने तिला हुरळून घालवलं आणि कदाचित त्यामुळेच मातीशी असलेली नाळ तिने तोडली.शिकलेल्या लेकीच्या गाडीतून पंढरीच्या विठुबाकडं जायचं स्वप्न पाहणाऱ्या राधाबाईचं हे स्वप्न सुनील आणि शामरावांनी पुर्ण केलं ,तिच्या अस्थी विठुबाचरणी चंद्रभागेत अर्पण करुन.
माणुसकी हरवत चाललेल्या समाजात मुलामुलींच्या अशाच सुषमा निर्माण होऊ लागल्या तर कुटुंब व्यवस्था कोलमडून पडेल यात तिळमात्र शंका नाही.
@अमित जालिंदर शिंदे.
टिप-सदर कथेतील सर्व पात्रे आणि घटना काल्पनिक असुन त्यांचा वास्तवाशी काही संबंध नसला तरी त्या सद्यस्थितीवर भाष्य करतात.
Saturday, October 20, 2018
तरवडीच्या माळा
![]() |
| PHOTO-BY AMIT SHINDE |
म्हणुन या धकाधकीच्या जीवनात मनाला कधीतरी वाटत की गड्या आपला गाव भारी होता,तिथली ती भिंती चिरलेली मराठी शाळा बरी होती,शाळेत येणारे शर्टची बटणे खालीवर लावणारे बिलंदर दोस्त भारी होते.त्याना शिकवणारे मळक्या कपड्याचे अडाणी आई बाबा बरे होते. ती तरवडीची पिवळी फुले, त्यांच्या लांबलचक माळा ,गोड कडाकणी आणि आज्जीचे उपवास बरे होते.त्यानिमित्ताने खिचडी खायला मिळायची.
गेले ते दिवस आणि राहिल्या फक्त आठवणी,
मुले चालली इंग्रजी मीडियमला,फुले मात्र तशीच तरवडीला....
- @अमित जालिंदर शिंदे
Subscribe to:
Posts (Atom)
न्यूझीलंड,कोरोना,नागरीक आणि जेसिंडा आर्डर्न... न्यूझीलंड देशाचा राष्ट्रध्वज न्यूझीलंड, प्रशांत महासागराने चौफेर वेढलेला एक बे...
-
न्यूझीलंड,कोरोना,नागरीक आणि जेसिंडा आर्डर्न... न्यूझीलंड देशाचा राष्ट्रध्वज न्यूझीलंड, प्रशांत महासागराने चौफेर वेढलेला एक बे...
-
हो.... बड्डे अमोल, हो बड्डे अमोल परवा २१ तारखेला माझा तारखेनुसार वाढदिवस होता. तारखेनुसार म्हणण्याच एक कारण आहे. योगायोगाने म...
-
म्हणुनच की काय मला सकाळची शाळा खूप आवडायची आमच्या भाषेत सकाळची,आज्जीच्या भाषेत बेस्तुर वार ची एकपारगी शाळा असायची, उशिरा उठल्यामुळे माझ...










