Sunday, February 18, 2018

मी कुणबी बोलतोय

                         मी कुणबी बोलतोय...
आज शेतकरी चोहोकडूंन मरतोय,
कधी दुष्काळाने करपतोय तर कधी गारपिटीने गारठतोय,
हाती आलेल्या पिकांवर निसर्गच अतिवृष्टीचा नांगर फिरवतोय,
मी या साऱ्या आस्मानी संकटांचा नरबळी बोलतोय,
होय तरीही न डगमगणारा मी कणखर कुणबी बोलतोय.

आस्मानाशी लढता लढता सुल्तानाशीही लढतोय,
विकासाच्या समृद्धीतल्या काळ्या आईच्या मोबदल्यासाठी मी झगडतोय,
सहन न होणाऱ्या लाचारीसाठी मी कधी मंत्रालयात विषही पितोय,
होय मी या पाशवी व्यवस्थेचा नरबळी बोलतोय,
मी या व्यवस्थेशी लढणारा लढवय्या कुणबी बोलतोय.

ऊसाच्या दरांसाठी कधी मी रस्त्यावर येतोय,
तुरी आणि सोयाबीन मधे सरकारी राक्षसच मला फसवतोय,
कापसातला बीटी मला बोंडअळीत तसाच दीसतोय,
या साऱ्यांच्या खर्चापायी अनुदानासाठी सरकारपुढे हात पसरतोय,
जगाला पोसुनदेखील मीच लाचार होतोय,
होय मी स्वाभीमानासाठी धडपडणारा कुणबी बोलतोय.

मी संकटे झेलतोय,
परत मातीत बिया टाकून शेतीचा सट्टा लावतोय,
कष्टाच्या घामाने नशिब आजमावतोय,
होय मी हार न मानता परत उभा राहणारा जिद्दी कुणबी बोलतोय.
@अमित जालिंदर शिंदे

Wednesday, February 7, 2018

शेतकऱ्याची आशावादी प्रतिमा.


सर्वसाधारणपणे शेतकरी म्हणलं की डोळ्यांसमोर एक चित्र उभा राहतं.आजच्या रंगीत दूनियेतदेखील हे चित्र ब्लॅक अँड व्हाइट च दिसतं.शेतकरी म्हणल की डोळ्यासमोर येते ती वर्षानुवर्षे दुष्काळाच्या झळा सोसलेली,पावसाच्या प्रत्येक थेंबासाठी आसुसलेली,भेगाळलेली काळीभोर जमीन;त्या जमिनीमध्ये उंचच उंच वाळलेल्या चिलार- बाभळी आणि काटेरी झुडुपे;त्या झुडूपांच्या आडोश्याला अनवाणी पायाने बसलेला,सडपातळ बांध्याचा काळ्याकभिन्न देहाचा आणि पावसाची वाट पाहात आकाशाकडे पाहणारा एक सुरकुतल्या चेहऱ्याचा जीव.पण या प्रतिमेला छेद देणारा एक फोटो सध्या इंस्टाग्राम वर प्रचंड व्हायरल होतोय.आदित्य गुंड नावाच्या तरुणाने इंस्टाग्राम वर पोस्ट केलेल्या या फोटोमध्ये एक ८-१० वर्षे वयाचा शेतकरी आपल्या नजरेस पडतो.आदित्य ने टिपलेल्या शेतकऱ्याच्या या प्रतीमेमध्ये दुष्काळाचा,शेताला पडलेल्या भेगांचा, नापिकीचा,कर्जबाजारीपणाचा लवलेशदेखील नाही.ह्या प्रतीमेतला शेतकरी कसल्याच निराशेच्या गर्तेत अडकलेला दिसतं नाही,यासाऱ्याच्या उलट शेतीची गोडी लागलेला हा शाळकरी पोरं उद्याच्या कृषिप्रधान भारताच्या समृद्ध शेतीच प्रतिकच मानावा लागेल.यांच्यासारख्या असंख्य सुशिक्षित शेतकऱ्यांची आज भारतीय शेतीला निश्चितपणे गरज आहे.कारण आजचा शेतकरी आत्महत्या शेती पिकली नाही म्हणून करत नाही तर पिकलेल योग्य दरात विकल नाही म्हणून करतो.आणि पिकलेले कसं योग्य दरात विकायचं याचं शहाणपण शेतीच वेड असल्याशिवाय आणि ग्राहकांचं मन ओळखल्याशिवाय येत नाही.हे शहाणपण या चिमुरड्याला नक्कीच आल असेल कारण या चिमुरड्याच्या डोळ्यात शेतीच्या बळावर जग जिंकण्याचा ,आणि शेती समृद्ध करण्याचा आशावाद निर्भेळपणे दिसतोच आहे.तो आशावाद ना लपवला जाऊ शकतो ना तो पाहणाऱ्याच्या दृष्टीआड होऊ शकतो.शेतीची आणि शेतकऱ्याची ही आशावादी प्रतिमा अशीच टिकून राहिली तर नक्कीच उद्याच्या शेतीला चांगले दिवस येतील यात शंका नाही.
@अमित जालिंदर शिंदे

Tuesday, January 30, 2018

म्हणुनच की काय मला सकाळची शाळा खूप आवडायची

म्हणुनच की काय मला सकाळची शाळा खूप आवडायची
आमच्या भाषेत सकाळची,आज्जीच्या भाषेत बेस्तुर वार ची एकपारगी शाळा असायची,
उशिरा उठल्यामुळे माझी ग्रहापाठाची वही रिकामीच असायची,
शाळेला जाताना सकाळच्या प्रहरी थंडी जरा जास्तच असायची,
तेव्हा मास्तरांची छडी जरा जास्तच लागायची,
शाळा लवकर सुटायची,
तेव्हा आज्जी नेमाने बेस्तूर वार चा उपास करायची,
त्यामुळे दुपारी शाबुची खिचडी खायला मिळायची,
 म्हणूनच की काय मला सकाळची शाळा खूपच आवडायची.
घरी आल्यावर मित्रांची लपाछपी, सुरपारंब्या खेळायची तयारी असायची,
आमच्या आजोबांची मात्र आम्हाला न्हाव्याकडे हजामतीला न्यायची घाई असायची,
तिकडे आज्जीची आजोबांकडे बाजारात विकायला अंडी द्यायची घाई असायची,
हजामती नंतर आम्हाला बाजारातील भजी खायला मिळायची,
आणि म्हणूनच की काय मला सकाळची शाळा खूपच आवडायची.
घरी आल्यावर आई घासून अंघोळ घालायची,
आठवड्याभराची दुर्गंधी क्षणात दुर व्हायची,
तोवर सांज झालेली असायची,
सगळीकडे दिवेलागणीची तयारी सुरु असायची आणि आई अभ्यास करा म्हणून पाठी लागायची,
आम्ही भावंडांनी लागलीच अभ्यासाची नाटकी करायची,
निष्कारण पेन्सिल- खोडरबर साठी भांडण करायची,
तोवर पप्पांची एन्ट्री व्हायची,
आम्ही लगेच वाह्यापुस्टके हातात घ्यायची,
पोरं अभ्यास करताना पाहून पप्पांनी चॉकलेट द्यायची
आणि म्हणूनच की काय मला सकाळची शाळा खूपच आवडायची .
@अमित जालिंदर शिंदे

Tuesday, January 23, 2018

आठवणींचे पत्र...



     संस्कृती ही अशीच आपल्या रोजच्या जीवनाचा भाग असते आणि हा वसा आपल्या माय मराठी मातीचा आपण पुढच्या पिढीला द्यायचा..तोच आपल्या मनात दरवळणारा ओल्या मातीचा सुगंध म्हणजे हा मृद्गंध’ आपला हाच संस्कृतीचा वसा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित करण्यासाठी, आपल्या मनातील मृद्गंध आपल्या वारसांना पोहोचविण्यासाठी कला  हे माध्यम म्हणून काम करीत असतात.असाच ६४ कला आणि १४ विद्यांचा संगम असलेला,मातीतच जन्मलेल्या शेतकरी भुमिपुत्रांनी आपल्या कलाविष्कारांनी साकारलेला, संगीत,गायण,वादन,नाट्य,नृत्य, आणि सर्वप्रिय अशा शेलापागोट्यांच्या फुलपाकळ्यांनी सजलेला,बहरलेला आजचा हा दीमाखदार सोहळा म्हणजे मृद्गंध २०१८,या मृद्गंध च्या निमित्ताने आपल्या सर्वांना म्हणजेच AGRICOS-2014 BATCH ला उद्देशून                                                                   
प्रिय मित्र मैत्रिणींनो
नमस्कार🙏🏻,
      दि-१९/०८/२०१४;आपण सर्वांनी प्रथम वर्ष कृषि पदवीच्या वर्गामध्ये प्रवेश केला.याचक्षणी आपल्यापैकी काही जणांची कृषिला प्रवेश घेण्याची स्वप्ने पूर्ण झाली,तर काहीजण स्वतःची इंजिनीरिंग आणि मेडीकल ची भंगलेली स्वप्ने भूतकाळाच्या गाभाऱ्यात सोडून नवीन ऊर्जेने शेतकरी, अधिकारी,शास्त्रज्ञ होण्यासाठी बी.एस.सी.(ऍग्री) च्या उंबरठ्यावर आलो.या महाविद्यालयातील १२० जणांची आपली पहिलीच बॅच होती.आपण नियमित कॉलेजला येऊ लागलो.नंतर ही नियमितता अवघड-अवघड कॉन्सेप्ट न समजण्याने कमी झाली.ते सॉईल, बायोटेक,पॅथ कधी समजलच नाही ओ;आणि बाकीचे अॅग्रो,हॉर्ट,जे सोप्प होत ते लक्षात कधी राहीलच नाही.ह्या काळात काहीजणांना ह्या वातावरणाशी जुळवून घ्यायला,घरापासून दुर राहायची सवय व्हायला थोडा वेळ लागला.तितक्यात नोटिस बोर्डांच्या काचा मयुरपंख, स्पोर्टस्,आणि अविष्कारच्या नोटीसांनी चमकू लागल्या.आपल्या बॅचनेही या स्पर्धांना अभूतपूर्व प्रतिसाद दिला.पहिल्या वर्षी विशेष गुणवत्ता कुणालाही मिळाली नसली तरी सहभागाचा तो प्रतिसाद दापोलीला आवाज चढवून सांगत होता, "अगले साल आयेंगे तो चॅम्पियन बनके जायेंगे". त्या पराभवातूनच पुढच्या वर्षीच्या विजयाच्या तयारीसाठी १२ हत्तींच बळ मिळालं होत;आणि म्हणूनच की काय दुसऱ्या वर्षी आपण तब्बल ५ बक्षिसे मयुरपंख आणि तितकीच अॅथलेटीक्समध्ये मिळवुन विद्यापीठात दुसरा क्रमांक मिळविला.दुसऱ्या बाजूला पहिल्याच सत्र परीक्षेला एक्स्टर्णल म्हणून आलेल्या पागरकर सरांनी "MAKE A SINGLE FOLD" म्हणत म्हणत घामचं फोडला की राव.त्यानंतर झालेल्या पहिल्या वर्षातील पहिल्याच महाविद्यालयीन गॅदरींग,स्पोर्टस् मधील आपल्या क्लास मधील जिगरबाज खेळाडू आणि कलाकारांच्या डोळे दिपवणाऱ्या कामगिरीने आपलाच डंका वाजवला.फर्स्ट इअर चा अपवाद वगळता सलग ३ वर्षे आपण निर्विवादपणे जनरल चॅम्पियनशिप वर दिमाखात राज्य करतोय.
          आपल्या अनेक आठवणी चिरकाल टिकणाऱ्या आहेत.दुसऱ्या सत्रात राणेकाकांना  फसवुन फोंड्याची एंट्री करून घोणसरी डॅमला दिलेली व्हिजीट, हॉस्टेलच्या पाठीमागच्या खाणीमध्ये मनमुरादपणे घेतलेल्या डुंबण्याच्या आठवणी,पाठीमागच्या टेकड्यांमध्ये करवंदाची जाळी शोधता शोधता कोंडये-करंजे पर्यंतची बेभानपणे केलेली पायपीट ,एरवी एकमेकांशी कमीच बोलणाऱ्या आपण मेसमध्ये मात्र एकमेकांना मुद्दाम हाका मारायचो आणि उगीचच सरावलेल्या पुढाऱ्यांप्रमाणे म्हणायचं नमस्कार आमदार साहेब वगैरे, वगैरे...
        आबांच्या हातून काही पडूनच बघावं आणि या संधीचा फायदा घेऊन आपण बेभानपणे फोड फोड म्हणून ओरडाव हे एक समीकरणच झालेलं होतं.इतकंच नव्हे तर राहुलदादा पुंगावकरांच उगीचच मोठ्ठं बोलणं, राहुलदादा कणवाडेंच नेहमीच कन्फ्युज राहणं,ओंकार कुंजीरच उगीचच राक्षसी हसणं, अमरचं दात न दाखवताच हसणं,अमित जोके,गणेश चव्हाण यांचं क्षणार्धात गोळवणकर सरांच्या कॅरॅक्टर मध्ये घुसनं,सप्रे बंधुंच नेहमीच जगापासून अलिप्त राहणं,शुभम ढाणेच लगेच शास्त्रज्ञ होणं आणि आमच्यासारख्या सामान्यांच्या डोक्यावरून जाईल असं काहीतरी निष्फळ बडबडणे,किशोर च पेडनेकर सरांना घाबरून नेहमीच बाथरूम मध्ये पळण,तर विश्रांतीच्या सगळीचं लेक्चर करण्याच्या सवयीने सगळ्यांनाच येणार डोईजड टेंशन,अमृता भगत आणि माधुरी केंगरे च नेहमीच पेपर सुरू होईपर्यंत वाचत बसणं.ह्या साऱ्या आठवणींनी आज जरी गालांवर स्मितहास्य येत असलं तरी त्यावेळी हेच गाल फुगून टम्म व्हायचे.
       नुसत्या चांगल्याच नव्हे तर काही वाईट आठवणी देखील आपल्यासोबत आहेतच.त्यातली म.गांधी जयंती आपण विसरण कसं शक्य आहे.याचदिवशी झालं होत ना आपलं दोन विंगमधल महाभारत.या महाभारताचे पडसाद तर पुढे वर्षभर शीतयुद्धाच्या रूपाने वेगवेगळ्या कारणांनी पडायचे.त्याकाळात तर फक्त संचारबंदीच लागायची राहिली होती;पण पुढे हरकुळच्या त्या मंतरलेल्या NSS कॅम्प मध्ये इना च्या कोला साँग ला हरकुळ गीत करून बेधुंद नाचलो,त्या कॅम्प मध्ये गोळवणकर सरांनी केलेली ती लावणी,अनुसे सरांनी तापविलेल पाणी आणि आपण रात्रभर काढलेले आवाज प्रयत्न करूनही विसरत नाहीत आणि याच सुंदर दिवसांनी आपल्यातलं शीतयुद्ध शमण्याची बीजे रुजली.आज आपल्या या एकीचा,शांततेचा,विशाल वृक्ष झालाय.
          आपल्या १२० जणांमध्ये काहीजण वाढले काहीजण कमीही झाले पण शिवराज,शिवानी सारखे कलाकार;संदेश, शिवम,रोहन, अर्जुन, श्वेता ,गौरी सारखे खेळाडू;प्रदीप,चरण,प्रियांका,स्नेहल,सारखे टॉपर; सुरज सारखा ऑल राऊंडर;सुहेल,संग्राम सारखे नेते;अमोल बाबर,सागर साळुंके सारखे विचारवंत आणि सोबतच काही दंगेखोर,प्रेमवेडेदेखील होतेच,आपल्या या सगळ्यांच्या सोबत असण्यानेच आपली ४ वर्षे परिपूर्ण होती.यानंतरच्या काळात आपण जेव्हा या विस्तीर्ण समुद्रारुपी स्वातंत्र्यातुन जबाबदारीच्या घागरीत भरले जाऊ तेव्हा या आपल्या सर्वांच्या सोबतीच्या आठवणींनी आपल्या डोळ्यांमध्ये ओसांडलेल्या घागरीप्रमाने नक्कीच अश्रु ओघळतील.या जगात गांधींसारखी मवाळ आणि हिटलर सारखी जहाल माणसेच फक्त अमर होतात बाकीचे कालौघात कालवश होतात.आपण त्या हिटलरप्रमाने जहाल कधीच होऊ शकणार नाही पण गांधींप्रमाने मवाळ होऊन आपल्यातले मतभेद विसरून शेवटच्या या दिवसांमध्ये पुन्हा एक होऊयात.तेवढीच सुखाच्या ४ क्षणांची चव आयुष्याच्या शिदोरीला बांधता तरी येईल.आणि हो आपण इथून कायमचं नाही जायचं,आपण परत इथे यायचाय,याच व्यासपीठावर यायचय,समाजात स्वतःची कर्तृत्व सिद्ध करून मराठे साहेबांच्या हातून सत्कार स्वीकारण्यासाठी इथ यायचाय.
       सर्वांना भावी आयुष्यासाठी अनंत शुभेच्छा💐💐
शतायुषी व्हा!!💐कीर्तिवंत व्हा!!💐💐
                                                                                                            आपला मित्र                                                          अमित जालिंदर शिंदे


ता.क.-मी आपल्या सर्वांना उद्देशून लिहिलेल्या या पत्रात कमी शब्दांमध्ये जास्त गाभार्थ घेण्याच्या माझ्या प्रयत्नांमुळे मी आपल्या सर्वांच्या नावाचा उल्लेख करु शकलेलो नाही आणि जर माझ्या या लिखाणातून कुणाला माणसिक ठेस पोहोचली असेल तर  मनस्वी क्षमा असावी...

Friday, January 12, 2018

लोकशाही

स्वातंत्र्यप्राप्तीच्या ७० वर्षांनंतरदेखील मतांसाठी लावला जातो गुलाल-भंडारा आमच्या माथी,
मटनाचा अर्धवट शिजलेला तुकडा आणि रश्शाच पाणी पिऊन नेत्यांसाठी कार्यकर्ते जागतात काळ्याकुट्ट राती,
नसलेलं अवास्तव प्रेम दाखवुन आणि अस्मितांची भाषणे करून भडकवल्या जातात जाती,
असुरक्षित मतांच्या व्यवहारासाठी ओतली जातात पैशाची पोती,
या साऱ्या गोंधळात होत नाही चांगल्या उमेदवारांची स्वीकृती,
निवडुन येतात त्याच शाही अपवृत्ती,
म्हणुन प्रश्र्न पडतो; हा देश प्रामाणिक प्रचाराचा की जाती,आमीषे आणि पैसासंपत्तीच्या प्रसाराचा??
हा देश लोकशाहीचा की शाही लोकांचा??
@अमित जालिंदर शिंदे

Sunday, December 17, 2017

होय, त्यालाही शिकायचंय...

   

 होय, त्यालाही शिकायचायं...
     
      तो त्याचा जन्म १९९८साली झाला.मुळ जन्मदिनांक मलाही ठाऊक नाही.आपल्या देशातील'विविधता'या सुंदर शब्दाखाली अनेक जातीधर्माच्या गुंत्यामधे स्प्रृश्य-अस्प्रृश्यतेच्या घाणेरड्या गोष्टी अगदी आजही चालतात.आजच्या २१ व्या स्पर्धेच्या शतकात प्रचंड व्यस्त असलेल्या किंवा उगीचच व्यस्ततेची नाटके करीत असलेल्या मानवजातीला स्पृश्य-अस्पृश्यतेचा कांगावा करायला मात्र भरपूर वेळ भेटतो.असो,
     माझ्या आजच्या ब्लॉगच्या नायकाचा जन्मदेखील अस्पृश्यतेच्या काळ्याभोर कोंदटलेल्या अंधारातच झाला.नायकाच्या जन्मापुर्वीच त्याचे आजी आजोबा स्वर्गवासी झाले झालेले.माझ्या नायकाला कधी आजोबांच्या खांद्यावर बसुन चांदण्यारात्री बालपणाच्या गोष्टी ऐकत फिरायचं असेल, आज्जीकडून मिळणाऱ्या प्रेमळ ग्रामीण रेसिपींनी तयार झालेल्या चवदार-पोषक पदार्थांच्या आस्वाद घेण्याचं असेल किंवा आजी-आजोबांच्या उबदार कुशीचे असेल सुख कधी मिळालंच नाही.वयाच्या ३-४थ्या वर्षाच माझ्या नायकावर ईश्र्वराने अजुन संकटांचे जाळे टाकुन त्याच्या आयुष्यातल्या निरागस नकळत्या वयामध्येच त्याला आईवडीलांविना पोरक केलं.क्रुर यमराजाने ना त्याच्या बालकत्वाचा विचार केला ना त्याच्या निरागसतेचा.या लहानशा लेकराच्या हसण्याखेळण्याच्या, आईच्या कमरेवर बसुन लडीवाळपणे बोबडे बोल बोलत आपल्या बालिश स्वप्नविश्वात रमण्याच्या, बाबांच्या बोटाला धरून चालायला-धावायला शिकण्याच्या वयातच देवाने त्याच्या आई-वडिलांना स्वर्गवासी केले.या त्याच्या संकटांच्या काळात चुलत्यामालत्यांकडुन माझ्या नायकाला आधार मिळायला हवा होता.पण,स्वताच्या पायांवर कसेबसेच उभा राहू शकणारा माझा लडीवाळ नायक जेव्हा भिंतीचा आधार घेऊन आईचे वात्सल्य आणि बाबांचा आधार या गोष्टींचा शोध त्याला भेटणाऱ्या प्रत्येक व्यक्तिच्या डोळ्यात घेत होता आणि वात्सल्य आणि आधार कुठेच दिसत नसल्याने मोठ्याने हंबरडा फोडायचा तेव्हा त्याचे चुलते कंपनी त्याची सगळी स्थावर मालमत्ता लुबाडण्याच्या कामात दंग होती.
     शेवटी माझ्या नायकाला आधार मिळाला.त्याच्या मावस आज्जी आजोबांनी त्याचा हंबरडा ऐकला आणि त्याला पोटाशी धरले.त्याचा चांगल्या संस्कारामध्ये सांभाळ केला.त्याच्या फक्त पोटाचीच नव्हे तर शिक्षणाचीदेखील सोय केली.माझा नायक आता त्यांना पोटच्या लेकरापेक्षादेखील जवळचा झाला.त्यांच्या विश्वासाला तो नेहमी खरा उतरु लागला आणि अगदी पहीली पासुनच शाळेत पहील्या नंबराने पास होऊ लागला. कौतुकाची थाप मिळवू लागला. इयत्ता पाचवी मध्ये त्याने नवोदयची प्रवेश परीक्षा देखील पास झाला पण उतरत्या वयातील आज्जीच्या हट्टापायी आणि प्रेमापायी त्याने नवोदयला प्रवेश घेतलाच नाही.माझा नायक त्याच्या या मावस आज्जी-आजोबारूपी आईवडीलांकडे म्हणजे माझ्याच गावी शिक्षण घेऊ लागला.नायकाने मार्च २०१५ मध्ये १०वी बोर्ड परिक्षेत ९०हुन अधिक %गुण मिळवले.पुढे उपमहाविद्यालयीन शिक्षणादरम्यान इयत्ता १२वी मध्ये त्याने गणित आणि जीवशास्त्र हे दोन्ही ऐच्छीक विषय घेऊन परिक्षा देण्याचा निर्णय घेतला.ऐन परिक्षेच्या अगोदर काही महिने माझ्या नायकाला आधार देणारा आधारवडदेखील कोसळला आणि आजोबांनाही देवाघरची हाक आली.आता त्याच्याकडे फक्त आजीरुपी वात्सल्य शिल्लक होतं पण त्या वात्सल्याचा आधारदेखील संपल्याने माझा नायकसुद्धा निराशेच्या गर्तेत गेला.परिणाम १२ वीच्या परिक्षेवर झाला आणि नायकाला ७८% मार्क शास्त्र शाखेतुन मिळाले. या साऱ्या परिस्थितीतदेखील हे त्याच्यासाठी एकप्रकारे उत्तुंग यशच होत.
     १८ वर्षे पूर्ण केलेल्या माझ्या नायकाच्या मनगटात आता प्रचंड बळ आलं होतं.जन्माला आलोच आहोत, संकटेदेखील आलीच आहेत तर संकटांचा सामना पुर्ण ताकदीनिशी करायचाच आणि प्रचंड संघर्षातुन या जगात स्वताला सिद्ध करून दाखवायचं या जिद्दीने माझा नायक आता पेटुन उठला होता.१२ वीच्या परिक्षेनंतर आजी आणि तो या त्यांच्या द्विसदस्यीय कुटुंबाची जबाबदारी त्याने खांद्यावर घेतली.ज्या सुतगिरणीत गेली २१वर्षे माझे वडील काम करतात त्याच सुतगिरणीत माझा नायकदेखील काम करु लागला.४ महीने सुट्टीत काम करुन आणि घरचे खर्च भागवून नायकाच्या खिशात आज १००००₹शिल्लक होते.आणि डोक्यात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दीलेला शिका, संघटीत व्हा, संघर्ष कराचा मंत्र होता.कारण हो, त्यालाही शिकायचंय...तेही परिस्थितीवर मात करून, संघर्षाच्या रथाच्या अश्वांवर जिद्दीने स्वार होऊन.हो, त्यालाही शिकायचंय...
     माझ्या नायकाला सांगली जिल्ह्यातील एका प्रसिद्ध महाविद्यालयामधे Mechanical Engineering ला प्रवेश मिळालायं.वार्षिक फी २१०००₹,४वर्षाचे जवळपास १ लाख रुपये.काही समाज बदलण्याची आशा ठेवून काम करणाऱ्या प्रयत्नवादी लोकांच्या प्रयत्नांतून त्याला समाजकल्याण विभागाच्या वसतीगृहात प्रवेश मिळालाय.आता त्याच्या राहाण्याची आणि जेवण्याची सोय झालीयं.एकुन १६०००₹ भरुन त्याचा प्रवेशदेखील झालाय.होय,तो आता शिकतोय...त्याची जिद्द, चिकाटी,शिकण्याची इच्छा, लढण्याची तयारी, जबरदस्त आहे.त्याच्या डोळ्यांसमोर अजून ३ वर्षाच्या फी चा प्रश्र्न त्याला खूप सतावतोय.आजी गावाकडे मालमजुरी करून तिचं पोट आणि या लाडक्या लेकराच्या दैनंदिन गरजा भागवतेय.पण यापुढच्या काळात त्याला मदतीची गरज आहे.इंजिनीयरींगचे शिक्षण घेत असताना हातात वेळ खुप कमी राहातो त्यामुळे माझा नायक सध्या कुठेही काम करत नाही.पण,आजही मिळणाऱ्या प्रत्येक सुट्ट्यांमधे तो सुतगिरणीत काम करतो आणि आयुष्याला अर्थ यावा म्हणून शिक्षण घेण्यासाठी चलनी अर्थ उभा करतोय.त्याने अद्यापपर्यंत कुणापुढेही हात पसरलेला नाही.त्यामुळे त्याला मदत करताना त्याच्या मनामध्ये कसलीही परोपकाराची भावना निर्माण न होता त्याला मदत करायला हवी.एखाद्याच्या आयुष्य  उभारणीच्या कामात आपण सर्वजण हातभार लावुन त्याच्या शिक्षणाच्या काटेरी मार्गावर चालण्यासाठी त्याला सामर्थ्य,बळ द्याल अशी आशा मला आहे.मी आपल्या सर्वांपर्यंत पोहोचु शकत नाही म्हणून या ब्लॉगचा सहारा घेतला आहे.माझ्या या नायकाला मदत करू इच्छिणाऱ्या प्रत्येक व्यक्तिचा मी स्वता ऋणी तर असेनच पण माझ्या नायकाची सर्व माहिती विस्तृतपणे मी आपल्याला देईन आपण आपली मदत त्याच्या फी स्वरुपात भरावी.कारण हो, त्यालाही शिकायचंय...
@अमित जालिंदर शिंदे
@अमित जालिंदर शिंदे
⏺️सदर विद्यार्थ्याला या ब्लॉगमुळे २०००₹ ची मदत मिळाली.






Monday, December 4, 2017

अस्वस्थ करणाऱ्या प्रश्र्नांची पेरणी...

             अस्वस्थ करणाऱ्या प्रश्नांची पेरणी...
     दि-१८/०८/२०१७ शुक्रवार,दै.सकाळ वर्तमानपत्रामधे एक बातमी नजरेस पडते, " *कोमेजल्या जीवांना रयतची संजीवनी"* . या शीर्षकाने प्रसिद्ध झालेल्या बातमीने मनामध्ये विचारांची खलबते सुरू केली आणि मनामध्ये अनेक अस्वस्थ करणाऱ्या प्रश्नांची पेरणी उत्तराचे पिक मिळवण्यासाठी सुरू झाली. याच साऱ्या बीजरुपी प्रश्नांचा पिकरुपी उत्तरे मिळवण्यासाठी सुवर्ण महोत्सवी महाराष्ट्रातील प्रत्येक नवतरुणाच्या मेंदुमधील कल्पनारुपी खत वापरुन घेण्यासाठी केलेला हा लेखनप्रपंच.....
 " *स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद* " हे ब्रीद घेऊन महाराष्ट्रातील गोरगरीबांच्या मुलांच्या हातातील नांगराच्यामुठी सोडवून त्यामधे लेखणी-पुस्तक देऊन त्यांना साक्षर करण्यासाठी कर्मवीर भाऊराव पाटील यांनी सातारा येथे रयत शिक्षण संस्थेची स्थापणा केली. आजदेखील भाऊरावांचा तोच विधायक उद्देश डोळ्यांसमोर ठेवून रयतने आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या  ४१ मुलांना सातारा येथे खुद्द भाऊरावांनीच सुरू केलेल्या धनीनीच्या बागेतील शाहु बोर्डिंग मधे प्रवेश देऊन त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मोफत शिक्षणाची व्यवस्था केली आहे.
ही बातमी वाचली आणि आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना मिळालेल्या आधाराबद्दल आणि रयतने दाखवलेल्या सामाजिक जाणिवेबद्दल जितके कौतुक वाटले अगदी तितकेच मन विषण्ण झाले ह्या बातमीच्या मथळ्यातील " *आत्महत्या* "या महाराष्ट्रातील शेतक-यांच्या आयुष्याला ब्रेक लावणाऱ्या क्रुर शब्दाने.रोज येणाऱ्या वर्तमानपत्रामधे एकतरी काळजाला घाव घालणारी  शेतकऱ्याच्या आत्महत्येची,हृदय पिळवटून टाकणारी करुण कहानी वाचायला मिळते.कुठे कर्जबाजारी शेतकरी आत्महत्या करतो,कुठे एस.टी.पासला पैसे नाहीत म्हणुन शेतकऱ्याची अंकुरासारखी कोवळी पोरगी आत्महत्या करते,कुठे हुंडा देण्यासाठी पैसे नाहीत म्हणुन शेतकऱ्याची वयात आलेली सोण्यासारखी मुलगी आत्महत्या करते.तर कुठे कर्जाच ओझ कमी होईना म्हणुन शेतकरी आपल्या लेकरांना पोटाला बांधुन विहीरीत उडी घेतो.
या अशा घटनांमुळे मनात पहीलाच प्रश्न येतो *"कृषीप्रधान"* असा सोनेरी मुकुट शिरावर अभिमानाने मिरवणाऱ्या,महासत्तेची स्वप्ने पाहणाऱ्या,डिजिटल क्रांतीच्या दीशेने पावले टाकणाऱ्या,मेक इन इंडीया चे डोहाळे लागलेल्या,बुलेट ट्रेनमधुन प्रवास करु इच्छिणाऱ्या,सर्जिकल स्ट्राइक चे धाडसी कृत्य करणाऱ्या,गोरक्षणाचे शिवधनुष्य लिलया पेलणाऱ्या माझ्या सारे जहाँ से अच्छा असलेल्या आणि अच्छे दीनों मे जगणाऱ्या भारतामध्ये अवघ्या जगाला पोसणारा पोशिंदा बळीराजाच का स्वतःच्या जीवाची आहुती देतो??कारण??
 कारण खुप सोप्पयं,कारण माझ्या राजाला पावसाने लागोपाठ दगा दीलायं, पेरलेल्या पिकाला कोंबच    फुटले नाहीत, घरशेतावर काढलेल कर्ज वाढतच गेलं.आणि  म्हणुन माझा शेतकरी बा सारख्या विचांरात असायचां.एक दिवस बानं रात्री झोपायच्या आधी माझ्या न् तायडीच्या चेहऱ्यावरुन हात फिरवला.बानं माझ्या भाबड्या कष्टाळु माईकडं बघीतलं अन् तोंड फिरवून त्यो झोपाय गेला. मलानं तायडीला सकाळी जाग आली ती आईच्या हंबरड्यानं. माझा बाप घरातल्या तुळवीला लटकला होता.आयुष्यभर ज्यानं धरणीला माई मानलं, कपाळी कुंकवाचा नव्हे तर मातीचा मळवट भरला,बैलांना ज्यानं पोटच्या लेकरावानी जीव लावला,टीफन-नांगराला ज्यानं स्वताची ताकद मानलं, लेकरांच्या हट्टापायी ज्यानं बैलगाडी चा रथ केला,दुष्कालाला ज्यानं वेळोवेळी पराभवाचं आस्मान दाखवलं, वाळल्या मातीत फुटणाऱ्या अंकुराला ज्यानं कष्टाच्या घामाचा अभिषेक घातला,वाढणाऱ्या पिकाच्या डोक्यातुन हात फिरवून ज्यानं वात्सल्यानं आंजारल- गोंजारल आणि मिळालेल उत्पन्नाच २४ कँरेट सोन कवडीमोल दामानं बाजारात विकुन बापाप्रमाने अवघ्या जगाच्या पोटाची भुक भागवली त्याच माझ्या शेतकरी बालां आयुष्याचं वाक्य पुर्ण होण्याआधीच आत्महत्येसारखा पुर्णविराम द्यावा लागला आणि अस्वस्थ करणाऱ्या प्रश्नांच दुसर बीजं माझ्या मनाच्या कसदार मातीमध्ये रुजलं आणि अंकुररुपी प्रश्न मनातून बाहेर पडले,माझ्या बालां कर्जाच्या खाईत ओढणारा सततचा दुष्काळ,हातातोंडाला आलेल पीक मातीमोल करणारी गारपीट, अवकाळी पावसासारखी संकट, सतत गडगडलेले शेतपिकांचे बाजारभाव तर गगणाला भिडलेल्या खते-बियाण्यांच्या किंमती,व्यापाऱ्यांकडून होणारी पिळवणुक,शासकीय योजनांमध्ये होणारी फसवणुक, कृषीपुरक व्यवसायांना लागणारं अपुर भांडवल,या आणि *अशा अनेक संकटांमधून माझ्या बालां कोन बाहेर काढणार??त्याला "समृद्ध शिवार सुखी शेतकरी"या संकल्पनेतला सुखी शेतकरी कोन बनवणार??दुष्काळ, गारपीट या संकटांमधून शेती कशी व कोन वाचवणारं??शेतपिकांना योग्य बाजारभाव कोन मिळवून देणार??खते आणि बियाण्यांवरच्या शेतकऱ्याच्या अतिरिक्त खर्चावर टाळे ठोकुन पर्यायी योजना कोन करणार??बाजारातील व्यापाऱ्यांकडून होणारी पिळवणुक कोन थांबवणार??शासकीय योजना थेट शेतशिवारापर्यंत कोन पोहोचवणार??* हे व असे असंख्य प्रश्न मनःपटलावर अस्वस्थतेचा तांडव घालत असताणाच याच सर्व प्रश्नांची उत्तरेदेखील अस्वस्थ करणारीच मिळतात.
शेतकऱ्यांच्या या अडचणींवर तोडगा काढण्याची जबाबदारी शहरी भारतीयांनी घेतली तर??पण नाही, असे होने नाही कारण माझ्या भारताच्या शहरांच रुपांतर  आधुनिक इंग्रजाळलेल्या इंडिया मध्ये झालयं आणि म्हणुनच एकीकडे खेड्यांमधे शेतकरी अगोदरच गळ्याभोवती आलेला कर्जाचा गळफास आवळुन आत्महत्या करत असताना शहरांमध्ये कुणी सेल्फीच्या नादात स्वतःचा जीव गमावतं, कुणी मद्यधुंद अवस्थेत रिक्षा चालवताना अनेक निष्पापांचे बळी घेते,तर कुणी तरुण ड्रग्ज आणि हेरॉईनची नशा करुन रेव्ह पार्ट्या करण्यात दंग आहेत त्यामुळे भारतातील शहरी नागरिकांकडून अशी अपेक्षा करणेच चुकीचे आहे.
त्यामुळे या सगळ्या अडचणींच्या अंधारात शेतकऱ्यांना एकच आशेचा कीरण मिळू शकतो आणि तो म्हणजे सध्या कृषीक्षेत्रामधे शिक्षण घेणारा विद्यार्थी. सध्या महाराष्ट्रामध्ये जवळपास १५००० मुले दरवर्षी कृषीपदवीचे शिक्षण पुर्ण करतात.या सर्व विद्यार्थ्यांपैकी किमान ८५% विद्यार्थी शेतकऱ्यांचीच मुले आहेत.पण तरीदेखील या मुलांमध्ये सध्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांबद्दल म्हणावी तितकी संवेदनशीलता आलेली नाही. खरतरं या विद्यार्थ्यांना शेतकऱ्यांचे सर्व प्रश्न ठाऊक आहेत.त्याबरोबरच कृषिसुशिक्षीत असल्याने आपल्याच शेतकरी वडीलांचे प्रश्न ही मुलं योग्य पद्धतीने हाताळुन अभ्यासाने सर्व अडचणींवर तोडगा काढु शकतात आणि शेतकरी वडीलांना आपल्या कल्पक बुद्धिमत्तेच्या जोरावर समृद्ध करू शकतात.
अजून एक मुद्दा म्हणजे मुळातच भारतामध्ये विद्यापीठांची निर्मिती होत असताना समाजातील अनेक अडचणी सोडवून समाजामध्ये आमुलाग्र बदल घडवणे हा एकमेव उद्देश ठेवण्यात आला होता.पण महाराष्ट्रातील कृषि विद्यापीठे या उद्देशापासुन भरकटताना दीसत आहेत.ती फक्त विद्यार्थ्यांना शिक्षण देणे आणि फक्त परीक्षा घेऊन पास करणे एवढेच मर्यादित काम करत आहेत आणि पास झालेले पदवीधर,उच्च पदवीधर,पी.एच.डी.धारक विद्यार्थी सरकारी ,खाजगी क्षेत्रात नोकऱ्या करू लागतात आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे पाठ फिरवतात.विद्यापीठांनी डिग्री देण्यासोबतच लोकाभिमुख व्हायला हवं,उपलब्ध संसाधनांचा सर्वतोपरी वापर करुन प्रत्येक तालुक्यामध्ये शेतिविषयक कार्यशाळा घ्यायला हव्यात;वेळोवेळी शेतकऱ्यांशी संवाद साधायला हवा,नवी संशोधने त्यांच्या शेतशिवारांपर्यंत पोहोचवायला हवीत.प्रत्येक गावात शेतिविषयक प्रात्यक्षिके घेऊन नवशेतीतंत्रज्ञान शेतकऱ्यांना द्यायला हवं.अशाप्रकारे खऱ्या अर्थाने कृषी विद्यापीठे आणि कृषी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी शेतकरी,शेती,आणि शेतीच्या प्रश्नांबाबत संवेदनशील होऊन काम करण्यास सुरुवात केली तरचं शेतीचे प्रश्न सुटतील आणि शेती ,शेतकरी समृद्ध होईल अन्यथा.. *दुष्काळ... पेरणी...नापिकी...गारपीट...नुकसान...कर्ज...महागाई...मुलीचं लग्न...हुंडा... सावकार...गहान...वसुली...तगादे...आत्महत्या... आत्महत्या... आत्महत्या... शेवट...* 
@अमित जालिंदर शिंदे


टीप-वरील दोन्ही फोटो हे दिनांक ०१/०१/२०१८ च्या दै.अॅग्रोवन मध्ये प्रसिद्ध झालेले आहेत.

न्यूझीलंड,कोरोना,नागरीक आणि जेसिंडा आर्डर्न... न्यूझीलंड देशाचा राष्ट्रध्वज      न्यूझीलंड, प्रशांत महासागराने चौफेर वेढलेला एक बे...