Monday, September 10, 2018

पांडुरंग करो आणि पाऊस पडो...



PHOTO-BY AMIT SHINDE
@AKOLA(WASUD,TAL-SANGOLA
पिढ्यानपिढ्या कोरड्या दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या सांगोला तालुक्यात सप्टेंबर उजाडला पण अद्याप पावसाचा थेंब पडला नाही.पाण्याअभावी खरीपाच्या पेरण्या झाल्याच नाहीत. काही तुरळक शेतकऱ्यांनी धाडसाने तुरी-बाजरी-मुग-मटकी पेरली पण जमीनीत ओलावाच नसल्याने बी ला अंकुर फुटलेच नाहीत. पावसाळ्यातल्या कडक उन्हाने बोरीचे मोहोर जळुन गेले.यंदा आशा होती डाळिंबाला तरी चांगले दर मिळतील पण यंदाच्या खराब वातावरणामुळे सरसकट डाळिंब बागांमध्ये तेल्या रोगाने शिरकाव केला.अद्याप पाऊसच नाही त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.कांद्याची रोपे तयार आहेत पण लागवडीसाठी पाणीच नसल्याने टँकरने पाणी विकत घेऊन कांदालागवड सुरू आहे.१०००-१२०० फुटांपर्यंत बोअरवेल घेतल्या तरी फक्त धुरळाच उडतो इतकी भुजल पातळी खाली गेली आहे.पाण्याच्या आणि पावसाच्या या भयावह परिस्थितीमुळे सध्या शेतातील पिके तर वाया गेलीच आहेत पण आगामी काळात माणुस आणि जणावरे यांची तहान भागविण्यासाठी सुद्धा पाणी उरणार नाही. पाणीच नसल्याने गुरांना हिरवा चारा देखील मिळायचा बंद झालाय.त्यामुळे सध्या तालुक्यातील दुध उत्पादक शेतकरी हिरव्या चाऱ्यासाठी शेजारच्या पंढरपूर,अकलूज भागातुन ऊसाची खरेदी करतोय.एकिकडे दुधाचे दर मातीमोल झाले असताना दुसरीकडे चाऱ्याचे दर मात्र गगणाला भिडले आहेत.सध्या सांगोल्यातला दुध उत्पादक शेतकरी ३०००₹ प्रतिटन दराने उसाची खरेदी जनावरांच्या चाऱ्यासाठी करतोय. त्याच ऊसाला जिल्ह्यातील साखर कारखाने एफ.आर.पी.सह २५००-२७००₹ प्रतिटनापेक्षा जास्त दर देत नाहीत. जो ऊस कारखानदारांना साखर करायला २७००₹ प्रतिटन घ्यायला परवडत नाही,तोच ऊस सांगोला तालुक्यातला पावसाच्या प्रतीक्षेत पिचलेला आणि पावसाअभावी शेतातील नापिकीने डबघाईला आलेला शेतकरी जनावरांच्या चाऱ्यासाठी ३०००₹ प्रतिटन दराने खरेदी करतोय.एवढा महागडा चारा घेऊनदेखील उत्पादित होणाऱ्या दुधाचे दर मात्र स्वताचे पोट भरण्याइतपतदेखील मिळत नाहीत.मुळातच शेतकऱ्यांचा हा खटाटोप उत्पन्न मिळविण्यापेक्षा पोटच्या लेकराप्रमाणे सांभाळलेली जणावरे जगविण्यासाठी चाललाय.आगामी काळात जर पाऊस पडलाच नाही तर तालुक्यातील शेतकऱ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठा संघर्ष तर करावाच लागेल पण जनावरे विकण्याची आणि शेती सोडून रोजगारासाठी दुसरे मार्ग शोधण्याची देखील वेळ येऊ शकते.शासणाने यापुढे व्रुक्षलागवडीसोबतच व्रुक्षजतनाकडे लक्ष देऊन पर्यावरणीय समतोल सांभाळुन या गंभीर संकटाला तोंड देण्याची तयारी ठेवायला हवी.
पांडुरंगाच्या आशिर्वादाने पाऊस व्हावेत आणि हे भीषण संकट दुर व्हावे हिच सदिच्छा...
@अमित जालिंदर शिंदे

Sunday, July 29, 2018

सुस्तावलेले अधिकारी थंडावलेली व्यवस्था...

  सुस्तावलेले अधिकारी आणि थंडावलेली व्यवस्था 
यावर्षी म्हणजेच शैक्षणिक वर्ष सण २०१८/१९ साठी  च्या पदव्युत्तर  कृषी पदवीची प्रवेश प्रक्रिया अद्याप म्हणजे दि -२७/०७/२०१८ पर्यंत सुरु झाली नव्हती.मागील वर्षी हि प्रवेश प्रक्रिया दि -१०/०७/२०१७  ला सुरु झाली होती.मागील वर्षी प्रवेश पूर्ण होऊन दि १२/०८/२०१७ ला कॉलेज सुरु झाली होती. २५/०३/२०१८ ला सामाईक परीक्षा होऊनदेखील प्रवेश प्रक्रियेला उशीर  झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये घबराट आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.आणि यासंबंधी अधिक माहिती मिळवण्यासाठी किंवा चौकशी करण्यासाठी प्रवेश प्रक्रिया राबवणाऱ्या महाराष्ट्र कृषी शिक्षण आणि संशोधन परिषद पुणे याना कॉल केले असता सकाळी १० तर संध्याकाळी ५ या वेळेत त्यांचा फोन बंद असायचा आणि इतर वेळी मात्र रिंग व्हायची .त्यामुळे दि -२७/०७/२०१८ रोजी मी दैनिक ऍग्रोवन यांचे पुणे जिल्ह्यातील वार्ताहर मा.मनोज कापडे सर यांच्याकडे या संबंधित तक्रार केली.तक्रार केल्यानंतर दि -२८/०७/२०१८ रोजीच्या दैनिक ऍग्रोवन ला प्रवेश प्रक्रिया सोमवारपासून म्हणजेच दि -३०/०७/२०१८ पासून राबविण्यात येत असल्याचे विधान शिक्षण संचालक श्री हरिहर कौसडीकर यांनी केल्याचे छापून आले.या संपूर्ण घटनेवरून असेच लक्षात येते कि सुस्तावलेल्या अधिकाऱ्यांना हलवून जागे केल्याशिवाय थंडावलेली व्यवस्था गतिमान होत नाही.
दि-२८/०७/२०१८ च्या दै.अँग्रोवन मध्ये आलेली बातमी..
या फोटोमध्ये आपण केलेली तक्रार आणि सरांनी दिलेले आश्वासन यांचा उल्लेख आहे.


Wednesday, July 25, 2018

बेंदूर

   
 
     महाराष्ट्र हा शेतकऱ्यांचा प्रदेश आणि विठ्ठल हा शेतकऱ्यांचा देव.त्यामुळे खरिपाच्या पेरण्या झाल्यावर पिकाने माना वर काढल्या कि शेतकरी विठुरायाच्या वारीला जायला रिकामा होतो.जेष्टी पौर्णिमेच्या नंतर सातव्या किंवा आठव्या दिवशी संत तुकाराम महाराज,माउली ज्ञानेश्वर महाराज,आणि सर्व संतसज्जनांच्या पालख्या पंढरीकडे प्रस्थान करतात .उभ्या जगाला पोसणार पोशिंदा बळीराजा देखील या संतसज्जनांच्या सोबतीने सावळया पांडुरंगाच्या दर्शनाची आस घेऊन पायी  पंढरीची वाट चालतो.आषाढी एकादशीला हा वारकरी शेतकरी पंढरीत विठ्ठल आणि रखुमाईचं दर्शन घेतो.चंद्रभागेच्या तीर्थामध्ये पुण्याची डुबकी घेतो आणि प्रसन्न मनाने आपल्या घराकडे जातो.वारीच्या या दिवसांमध्ये तो घरदार,संसार सगळं विसरून फक्त विठ्ठलभक्तीत तल्लीन होऊन जातो.कारण २०-२२ दिवसांच्या या प्रवासात घराचा आणि त्याचा संपर्क होतच नाही.कारण काही वर्षांपूर्वीपर्यंत हे मोबाईल नावाचं फ्याड शेतकऱ्याला मिळालंच नव्हतं.वारी म्हणजे सांसारिक आणि कष्टाच्या ताणतणावातून मुक्तीचे अनमोल क्षण असायचे.या वारीमध्ये कुणी लहान नसतो कि कुणी मोठा नसतो.कुणी गरीब नसतो कि कुणी श्रीमंत नसतो.कुणी स्त्री नसते कि कुणी पुरुष नसतो.कुणी स्पृश्य नसतो कि कुणी अस्पृश्य कारण विठुरायाच्या या मांदियाळीत प्रत्येकजण फक्त माउली असतो.हि आषाढी वारी झाली कि घरी जाताच बेंदूर आलेला असतो.आषाढीच्या निमित्ताने धन्याची दिवाळी झालेली असते पण धन्यासाठी काम करणाऱ्या त्याच्या बैलांची,दूध दुभती देणाऱ्या म्हशींची,खत गोमूत्र दूध देणाऱ्या गायीची ,ताजा पैसा मिळवून देणाऱ्या शेळ्यामेंढ्यांची दिवाळी मात्र बेंदरालाच असते.

     घरच्या मुक्या जीवांच्या प्रति क्रुतज्ञता व्यक्त करण्याचा हा एक मराठी सण आहे. शेतकरी मुक्या जीवांची पूजा करतात. महाराष्ट्रासारख्या शेतीप्रधान राज्यात, व तेथील शेतकऱ्यांत या सणाला विशेष महत्त्व आहे.

     या दिवशी बैलांंचा,गायी-म्हशींचा थाट असतो. त्यांना कामापासून आराम असतो. या दिवशी जनावरांना आवरण्यासाठी चाबुक(आसुड) वापरण्यात येत नाही. बेंदुराच्या आदल्या दिवशी जनावरांना ज्वारीचा खिचडा खायला देण्यात येते. बेंदुराच्या दिवशी त्यांना नदीवर/ओढ्यात नेउन त्यांना अंघोळ घालण्यात येते. नंतर चारून घरी आणण्यात येते. या दिवशी बैलाच्या खांद्याला हळद व तुपाने शेकतात. याला 'खांद शेकणे' म्हणतात.यावेळी जनावरांना विशेष करुन बैलांना पाठीवर  नक्षी केलेली झूल, सर्वांगावर गेरूचे ठिपके, शिंगांना बेगड, डोक्याला बाशिंग,  गळ्यात कवड्या व घुंगरांच्या माळा, नवी वेसण, नवा कासरा पायात चांदीचे वा करदोड्याचे तोडे घालतात. त्याला खायला गोड पुरणपोळी व सुग्रास अन्नाचा नैवेद्य देतात. जनावरांची निगा राखणाऱ्या घरगड्यास नवीन कपडे देण्यात येतात.

     या सणासाठी शेतकऱ्यांमध्ये उत्साह असतो. गावात निघणाऱ्या मिरवणुकीत आपला बैल उठून दिसावा यासाठी शेतकरी आपल्या ऐपतीप्रमाणे त्याचा साजशृंगार खरेदी करतात. बैल सजवितात व हलगीच्या ठोक्यावर बैलांना गावातुन मिरवून आणतात.अलिकडच्या काळात मात्र माणसाच्या बदलत्या जीवनशैलीमुळे हे गावरान गावाकडचे सण साजरे करण्याच्या पद्धतीही बदलत चालल्या आहेत.ग्रामीण भागात देखील नागरी संस्कृती रुजत असल्या कारणाने काही भागात बेंदुर साजरा करणे म्हणजे केवळ ते कर्तव्य पार पाडणे असे झाले आहे.त्यातील मुक्या जणावरांविषयीची आपुलकी कमी झाली आहे.बेंदुर साजरा करण्याची हि आपली संस्कृती जतण करणे गरजेचे आहे तरच ती संस्कृती पुढच्या पिढीला ज्ञात होईल अन्यथा नामशेष होईल.
@अमित जालिंदर शिंदे

Saturday, July 14, 2018

महाराज तुम्ही खुशाल निघा...

     दि-१२ आणि १३ जुलै १६६० चा तो दिवस,हिंदवी स्वराज्याच्या इतिहासात सुमारे ३०० मावळ्यांनी रक्ताच्या अभिषेकाने घोडखिंडीला पावणखिंड बणविण्याचा दिवस,स्वराज्याच्या रयतेच्या धन्यास वाचविण्यासाठी प्रतिशिवाजी बनुन शत्रूच्या गोटात जाऊन साक्षात म्रुत्यु ला आलिंगन देण्याच्या वीर शिवा काशिद च्या धाडसाच्या अमरत्वाचा दिवस.स्वामीनिष्टा काय असावी याच सर्वोत्तम उदाहरण म्हणजे वीर शिवा काशिद यांचे बलिदान.पुढे पन्हाळगडाचा वेढा...सिद्दी जौहर...२०,००० पायदळ,१५,००० घोडदळ,आधुनिक तोफा आणि मोजक्या बंदुका...शिवा काशिद यांचे बलिदान... महाराज विशाळगडाकडे रवाना...सिद्दी मसुदने केलेला पाठलाग... बाजी प्रभु आणि फुलाजी प्रभु देशपांडे बंधूंचा दैदिप्यमान पराक्रम... घोडखिंडीत निकराची लढाई... महाराज विशाळगडावर... तोफांचे आवाज...३०० मावळ्यांसह बाजी प्रभू चे हौतात्म्य हि शिवइतिहासातील जाज्वल्य घटना तमाम मराठी जनांनाच नव्हे तर अखंड हिंदुस्थानाला मुखोद्गत आहेच.आज वीर शिवा काशिद, बाजी प्रभू आणि फुलाजी प्रभू देशपांडे बंधू आणि ३०० मावळ्यांच्या हौतात्म्याला ३५८ वर्षे पुर्ण झाली.पण या अमर कहाणी तुन आजचा आमचा महाराष्ट्र काय शिकतो हे अधिक महत्त्वाचे आहे कारण महाराजांच्या नावाने नुसतीच घोषणाबाजी करण्यापेक्षा महाराजांच्या आणि त्यांच्या मावळ्यांच्या चित्तथरारक इतिहासातुन आम्ही चांगले विचार आत्मसात करणे हिच सर्वात मोठी आदरांजली त्या इतिहासाला आणि महाराजांना असेल यात शंका नाही.सोशल मीडिया वरच्या बेधुंद आणि ध्येयाचे रस्ते चुकलेल्या तरुणाईला शिवा काशिद आणि बाजी प्रभुंचे बलिदान कसे प्रेरणादायक आहे आणि त्यातुन आजच्या तरुणाईने आणि अखंड समाजाने काय शिकावे हेच आज मला एका व्हिडीओ च्या माध्यमातून आपल्याला दाखवायचे आहे.१७ मिनिटांचा हा व्हिडीओ नक्कीच तुमच्या आयुष्यात आमुलाग्र बदल घडवून आणेल आणि आपल्या सर्वांना स्वताच्या ध्येयसाधनेसाठी आत्मबळ मिळवुन देईल अशी मला अपेक्षा आहे. शिववक्ते श्री.विनोद अनंत मेस्त्री यांनी सादर केलेले हे घोडखिंडीच्या पावणखिंड होण्याचे स्फुर्तीदायक कथानक नक्की पाहा आणि हौतात्म्यांना आदरांजली वाहा हिच विनंती🙏🏻🙏🏻🙏🏻
 टीप - या व्हिडीओ सोबत च श्री.विनोद मेस्त्री यांचीच महाराज तुम्ही खुशाल निघा ही कविता मुद्दाम जोडली आहे.


                     महाराज तुम्ही खुशाल निघा,
                     महाराज तुम्ही खुशाल निघा.
  हिंमत काय शत्रुची ही खिंड ओलांडायची जोवर इथं पर्वत                           बनुन तुमचा बाजी उभा,
                     महाराज तुम्ही खुशाल निघा.
      माहितीये मला असं निघण जड जातय राजे तुम्हाला,
   आम्हाला अस सोडून जाणं लागत असेल तुमच्या जीवाला.
        लढण्याच बळ तुम्ही दीलं आणि जगण्याला दीशा,
      तुमच्यासाठी हजारदा मरु तुम्ही स्वराज्यासाठी जगा,
                    महाराज तुम्ही खुशाल निघा.
       कल्पना आहे येतील हजारो घोंघावत वादळापरी,
    हटणार नाही किंचीतही मागे कोसळले बनुन लाट जरी.
       ताकद नाही कशातही हरवण्याची या हिंमतीला,
        निश्चयाची मुळे खोलवर रोवून राहीन मी उभा,
                    महाराज तुम्ही खुशाल निघा.
       विशाळगडावर महाराज बाजींसाठी व्याकुळलेले,
        आले बाजी पालखीमधुनी अंग अंग विखुरलेले.
     म्रुत्युलाही थोपविले त्यांनी दोन प्रहर जिद्दीने झुंजून,
          असंख्य वार झेलून शरीर गेले होते पिंजुन.
       तोफांचा आवाज होता म्रुत्युलाही हायसे वाटले ,
                   गेले बाजी खिंड पावण झाली,
            ३०० मावळ्यांच्या पराक्रमाची शर्थ झाली.
             आसवांना माझ्या मी आवर घालू कसा, 
                  माझा बाजी असा जाईनच कसा.
   अरे अमर झाला आठवेल तो सतत खिंडीच्या तोंडाशी उभा          विनवित मला आकांताने महाराज तुम्ही खुशाल निघा,
                   महाराज तुम्ही खुशाल निघा.
@अमित जालिंदर शिंदे

Tuesday, May 22, 2018

क्रिडामंत्र्यांचा नवा अध्याय

                  
                    क्रीडामंत्र्यांचा नवा अध्याय
          आज भारताचे क्रीडा आणि महिती प्रसारण मंत्री मा.राजवर्धन सिंग राठोड यांनी आज त्यांच्या ट्विटरवर एक व्हिडिओ पोस्ट केलाय.हा व्हिडिओ आजच्या तरुणांना शारीरिक फिटनेस चे महत्व सांगणारा आहे.यामध्ये स्वतः मंत्रीमहोदय भारतीय तरुणांना भारताचे पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी यांचे समर्पक उदाहरण देऊन फिटनेस संबंधी प्रेरित तर करीत आहेतच पण स्वतःच्या केबिन मध्ये ते पुश अप्स देखील करून दाखवीत आहेत.आजकालच्या महिती तंत्रज्ञानाच्या आधुनिक जगामध्ये एकीकडे तरुणाईच्या बळावर भारताला महासत्ता बनविण्याची स्वप्ने स्वतः पंतप्रधान पाहत असताना भारतीय तरुणाई मात्र त्याच आधुनिकीकरणाची आणि तंत्रज्ञानाची बळी पडुन शारीरिक दृष्ट्या क्षीण होत चाललेली दिसते.आणि याचाच परिणाम तरुणाईच्या कामाच्या क्षमता कमी होण्याच्या रूपामध्ये दिसून येत आहे.आज स्वतः भारताचे पंतप्रधान आणि त्यांचे काही सहकारी दिवसाचे जवळपास १७-१८ तास काम करीत असल्याची उदाहरने आम्ही रोज ऐकत असतो,पण भारतीय तरुण मात्र शारीरिक अस्वास्थ्यामुळे कामाकडे पाठ फिरविताना आणि टाळाटाळ करताना आम्ही पाहतो.त्यामुळे भारताला महासत्ता बनवायचे असेल तर आमची तरुणाई अगोदर मजबूत बनविली पाहिजे.फिटनेस चे महत्व तरुणांच्या मनावर बिंबवलं पाहिजे आणि त्यांना प्रेरित केलं पाहिजे.आणि ही प्रेरणा देण्याचे काम स्वतः क्रीडा खात्याचे मंत्री असलेल्या राजवर्धन सिंग राठोड यांनी सुरू केलेल आहे.त्या व्हिडिओ मध्ये स्वतः मंत्री महोदय किती तंदुरुस्त आहेत हेदेखील आपण पाहू शकतो.                राजवर्धन सिंग राठोड स्वतः हे क्रीडा क्षेत्राशी संबंधित असलेले बहुधा पहिलेच क्रीडामंत्री असावेत आणि म्हणूनच आजवर भारताच्या कुठल्याच क्रीडामंत्र्यांना शारीरिक तंदुरुस्तीचे महत्व वाटले नसावे पण ते राजवर्धन सिंग राठोड याना पटले आहे.त्यांच्या या अभिनव उपक्रमाबद्दल त्यांचे मनपूर्वक अभिनंदन!!!
         राठोड सरांच्या या उपक्रमामध्ये सहभागी होऊन मी आज संकल्प करतो आणि आपण माझ्या सर्व वाचक तरुण मित्र मैत्रिणींना विनंती करितो की आपण देखील दररोज किमान अर्धा तास व्यायाम करून स्वतःच्या फिटनेस कडे लक्ष देऊया आणि एका मजबूत तरुण महासत्ता भारताची पायाभरणी करूया.
धन्यवाद!!
                      अमित जालिंदर शिंदे

Wednesday, May 9, 2018

बापू

                                           बापू
फोटोमध्ये डावीकडून तात्या,महेश शिंदे(बापूंंचे चिरंजीव) आणि बापू गप्पा मारत आहेत.

          यांच नाव गोविंदराव शिंदे,पण त्यांना सगळा गाव बापू म्हणुनच ओळखतो.हे आमच्याच शिंदेवस्तीचे.पण एल.आय.सी. या विमा कंपणीमध्ये असलेल्या नोकरीच्या निमित्ताने ते पंढरपुरलाच स्थायीक झालेत.गावात यांची भरपुर मोठी शेती होती,अजुनही आहे.शेतामध्ये आंबा,नारळ,चिकु,सिताफळ,डाळींब अशा फळबागा होत्या.ह्यांच्या शेतातली अजुन एक गोष्ट प्रसिध्द असायची ती म्हणजे हुरड्याची ज्वारी कारण मित्र कंपणी सोबत घेऊन सर्वाधिक हुरडा पार्ट्या करणारा गावातला हा एकमेव इसम.हे            बापु आणि माझे आजोबा तात्या हे एकाच वयाचे आणि त्यामुळेच कदाचित एकमेकांचे अतिशय जवळचे मित्र.
बापू जेव्हा जेव्हा शेतात चक्कर मारायला म्हणुन पंढरपूर हुन गावी  येतात त्या प्रत्येक वेळी तात्यांना भेटायच्या निमित्ताने ते घरी येतातच.यावेळीही श्री. सिद्धनाथाच्या चैत्र यात्रेच्या निमित्ताने बापू गावी आले आणि लगोलग तात्यांना भेटायला घरीही आले.
          मी बापुंना तब्बल ४ वर्षानंतर पाहात होतो.त्यांचा चेहरा आणि एकुनच त्वचा सुरकुतलेली होती.देहयष्टी कमरेतून थोडीशी समोरच्या बाजुला झुकलेली.हातांमधली ताकद कमी झालेली आणि बोलताना थोडासा थकवा वाटायचा.आज वयाच्या ८५ व्या वर्षी तात्या आणि बापु दोघांची शारिरीक अवस्था एकसारखीच आहे हे मला जाणवलं.आणि मला नकळत माझ बालपण आठवायला लागल.कुठलीही नोकरी कर भले कंडाक्टर हो पण सरकारी नोकरी कर अस तात्यांच नेहमीच सांगण असतं अगदी मला कळतदेखील नव्हत तेव्हापासून. वडीलांव्यतीरीक्त आमचं भावंडांच शाळेच प्रगतीपुस्तक पाहणारी बापू ही एकमेव व्यक्ति. मी अगदी ५-६ वीला असल्यापासुन बापू मला करियर मार्गदर्शन करायचे.एवढेच नव्हे तर माझं हस्ताक्षर सुधारण्यासाठी मराठी आणि इंग्रजी अक्षरे गिरवायच्या प्लास्टिकच्या पाट्या मला बापुंनीच दिल्या होत्या.म्हणुनच आज माझ्या हस्ताक्षराला सगळीकडे प्रशंसा मिळते.आज समाजात निर्व्याजपणे गरजवंताला मार्गदर्शन करणारे बापू अतिशय नगण्य आहेत.पण तरीदेखील जोपर्यंत अशी थोडीफार माणसे समाजात आहेत,तोपर्यंत समाजातील तरुणांवर चांगले शैक्षणिक संस्कार होत राहतील यात शंकाच नाही.
@अमित जालिंदर शिंदे

Sunday, March 4, 2018

जलसंवर्धनाचे गर्भसंस्कार

                       जलसंवर्धनाचे गर्भसंस्कार
               
 
दुष्काळ
विदर्भ - मराठवाडा - प. महाराष्ट्र...भयाण माळरान...जिथं फक्त कुसळांचीच पिवळीधम्म शेती... उघडे बोडके उन्हाची सोनेरी झालर पांघरलेले टेकडीवजा डोंगर...मधूनच माना वर काढलेली चिलार- बाभळीची काटेरी झाडे... पाण्यासाठी आसुसलेली आणि बेभानपणे भटकंती करणारी गाई-गुरे- वासरे... मैलो न मैल पाण्यासाठी घडे - घागरी घेऊन चाललेली गावकरी बाई माणसांची पायपीट...आणि बरेच काही... ही परिस्थिती महाराष्ट्रात दरवर्षीच एप्रिल - मे मध्ये न सांगता उद्भवते.आता त्याला एका वाक्प्रचाराची जोड मिळाली आहे, "दुष्काळ आमच्या पाचवीलाच पुजलेला आहे".पण या दुष्काळावर मात करावी,पाण्याची बचत करावी,झाडे लावावी,पाणी अडवून जिरवाव या गोष्टींसाठी आमचा सदा न कदा होरपळलेला माणूस कधी तयारच झाला नाही.म्हणून जलसंवर्धन  करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने जलयुक्त शिवार मोहीम राबवली तर दुसरीकडे आमिर खानने  पाणी फाऊंडेशन ची स्थापना करून वॉटर कप स्पर्धेला सुरुवात केली.या स्पर्धेसाठी पाणी फाऊंडेशन स्वतः अगोदर गावकऱ्यांना चांगल्या कामासाठी  ट्रेनिंग देतं आणि नंतर आपल्या कामाची छाप निसर्गावर पाडून जल युक्त आणि दुष्काळमुक्त झालेल्या गावांना कोट्यवधी रुपयांची बक्षिसे देखील दिली जातात. जलयुक्त शिवार योजना आणि वॉटर कप स्पर्धेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील अनेक गावे आज कायमस्वरूपी दुष्काळमुक्त झाली आहेत.दरवर्षीप्रमाणेच याहीवर्षी वॉटर कप स्पर्धा २०१८ धूमधडाक्यात आणि नेहमीच्याच उत्साहात सुरू होणार आहे.या स्पर्धेच्या ट्रेनिंग चा कार्यक्रम महाराष्ट्रातील विविध केंद्रांवर तज्ञ मंडळींच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.यावर्षी एका ट्रेनिंग केंद्रांवर उमरखेड तालुक्यातील सोनधाबी गावातील अनिता साबळे नावाच्या व्यक्ती ट्रेनिंग घेत होत्या.अनिताताई ७ महिन्यांच्या गर्भवती आहेत.आणि आपल्या पोटात वाढणाऱ्या अभिमन्यू वर त्या द्रोपदिप्रमाने दुष्काळाचे चक्रव्यूह तोडण्याचे जणू गर्भसंस्कार च करत आहेत. राजे तुम्ही पुन्हा जन्माला या अशी नुसतीच आरोळी ठोकणाऱ्या आणि शिवाजी महाराज जन्माला यावेत तेही शेजाऱ्याच्या घरात या वृत्तीने जगणाऱ्या आजच्या समाजात अनिता साबळे यांच्यासारख्या जिजाऊ जन्माला आल्यात हीच एक जमेची बाब म्हणावी लागेल.यानंतरच्या काळात देखील त्यांचाच आदर्श डोळ्यांसमोर ठेऊन महाराष्ट्राच्या मातीत अश्या असंख्य जिजाऊ आईसाहेब जन्माला येतील.आणि समाजातील अनेक अनिष्ट गोष्टींच्या विरोधात लढण्यासाठी स्वतः जोमाने कामाला लागतील.आत्मनिर्भर होतील.लढवैया शिवाजी महाराजांच्या विचारांना जन्माला घालतील यात अनिता ताईंकडे पाहिलं की शंकाच उरत नाही.
अनिता साबळे ताईंच्या कामाला अनंत शुभेच्छा. त्यांचा गाव पाण्याने जल युक्त होवो.आणि माणसांमध्ये स्पर्धेच्या निमित्ताने आपुलकीचा ओलावा येवो हीच परमेश्र्वराकडे आपण सर्वजण मनोमन प्रार्थना करू.आणि आपणही पुढच्या काळात समाजकार्यासाठी कुठल्याही परिस्थितीत स्वतःला झोकून देऊ हाच संकल्प यानिमित्ताने करूयात.
@अमित जालिंदर शिंदे

न्यूझीलंड,कोरोना,नागरीक आणि जेसिंडा आर्डर्न... न्यूझीलंड देशाचा राष्ट्रध्वज      न्यूझीलंड, प्रशांत महासागराने चौफेर वेढलेला एक बे...