Thursday, August 15, 2019

महापुर

महापुर
     पुराच पाणी वाढतच होत. काही वेळापुर्वी घोट्याला लागणारं पाणी आता गुडघ्यापर्यंत आलं होतं. कृष्णामाई पहिल्यांदाच एवढी कोपली होती. नुकतीच बाळंतीण झालेली सदा आबा ची थोरली लेक अजून ओल्याची सुकी झाली नव्हती. वाढत पाणी बघुन धाकला राजू तिला घेऊन घटकाभरापूर्वीच शिरढोणाला मामाकडे गेला होता. पुराच्या वाढत्या पाण्यात बुडता संसार सदाआबा ला उघड्या डोळ्यांनी दिसत होता, पण बाळंतीण थोरली लेक आणि एकुलता एक राजू दोघांना सुखरूप मामाकडे धाडल्याचं वेगळचं समाधान त्याच्या चेहऱ्यावर दिसत होत. पावसाने जोर धरला होता. वरुणराजा काळ बनून बरसत होता. पाणी वाट मिळेल त्या दिशेने प्रवाह बदलत होतं. एकापाठोपाठ एक घरात घुसत होत. सदा आबाचं सारवलेल अंगण कधीच उखडल होतं. जणावरांची दावण पाण्याखाली गेली होती. बैलांना पाणी लागु नये म्हणून घराच्या बाजूलाच घातलेल्या बांधावर त्यान बैलांच्या खुंट्या मारल्या होत्या. शेजारच्या गावात सकाळीच पाणी घुसल्याने आणि तेथील जीवंत जनावर पुराच्या पाण्यात वाहुन गेल्यामुळे राऊतवाडी थोडी सावध झाली होती. पण घरातली राजू ची महत्त्वाची कागदपत्रे, वह्या पुस्तके, जमीनींचे दस्त, धान्य ,पिठं, आणि पाणी लागल्याने खराब होणारं सामान आवरून माळ्यावर टाकण्याच्या नादात त्याची जित्राब दोन बैल आणि एक म्हैस गावाबाहेर टेकाडावर असलेल्या पाटलाच्या मळ्यात नेता आली नाहीत.पाणी अजून वाढतच होत. आता माळ्यावरची जागाही संपली होती. भांडीकुंडी, कपडेलत्ते, अंथरूणे, इ. गोष्टी तशाच जिथल्या तिथ जागेवर पडलेल्या होत्या. आता पाणी बैलांच्या पायाला लागायला लागलं तस सदा आबाच्या काळजात धस्स झालं. एव्हाना वस्तीवरच्या सगळ्याच शेजारी पाजाऱ्यांची जमेल तेवढ सामान आटोपून घराबाहेर पडायची लगबग सुरू झालेली. सदा आबानं बायको रुक्मिणीला थोडे कपडे आणि मौल्यवान दागदागिने घेऊन घरातून बाहेर आणलं. दारावर मोठ टाळ ठोकलं, म्हशीचा दोर सोडून रुक्मिणीच्या हातात दिला. तिला म्होर घालून सदा आबा दोन्ही बैलांचे दोर घेऊन टेकावरच्या पाटलाच्या मळ्याची वाट चालू लागला. ३-४ कि.मी. अंतरावर असलेल्या पाटलाच्या मळ्यात सगळ्या राऊतवाडीच्या जनावरांची छावणी पडलेली. तिथून हाकेच्या अंतरावर जि.प. च्या प्राथमिक शाळेत गावातल्या बायकापोरांचा गलका झालेला. गावातली गडीमाणस अजून गावात अडकलेली जनावर, म्हातारी माणसं, जेवणाखाण्याच सामान गोळा करून शाळेत आणून टाकत होती. सदाआबा आणि रुक्मिणी झपाझप पावले टाकत होती. वरुन आभाळ गळतच होतं. खाली पाण्याची पातळी वाढुन पाणी कमरेला लागलं होतं. जनावरांचे पाय उचलत नव्हते. पाण्याच्या प्रवाहात तोल सावरत नव्हता. चिखलात पाय जास्तच अडकत होते. पावसान आणि पुराच्या पाण्यानं हैदोस घातला होता. दोघांचाही जीव रडकुंडीला आला होता. पण पाण्यात जलसमाधी मिळायच्या अगोदर पाटलाच्या मळ्यात पोचायच होतं. 
     सदा आबा आणि रुक्मिणी आता निम्म्याहून जास्त अंतर चालून आले होते. अंधार पडायला लागला होता. दिवस मावळायच्या अगोदर समोरचा पिंपळओढा पार करायचा होता. दुथडी वाहणारा आणि पुराच्या पाण्यानं पात्र विस्तारलेला पिंपळओढा ओलांडला की पुढं पाण्याची पातळी कमी होणार होती. राऊतवाडीच्या एका बाजूने कृष्णामाई आणि दुसऱ्या बाजूने पिंपळओढा वाहात होता. सदा आबाच्या ५७ वर्षाच्या जीवनात पहिल्यांदाच कृष्णामाईने पिंपळओढा गाठलेला होता. नदी आणि ओढ्याच पात्र एकच झालं होत. सगळ्या राऊतवाडीत पाणी घुसल होतं. पिंपळओढ्यावर पक्का पुल नव्हता. लाकडाच्या फळ्या एकमेकांना जोडून आणि लोखंडाचे डांब आडवे टाकून त्यावरून पलिकडे जायला रस्ता केलेला. एरवी या रस्त्यावरून फक्त पायी शेतात जाणारी माणसं  आणि एखाद दुसरा सायकल सवारीच जायचा. ओढ्यावचा रस्ता देखील पाण्याखालीच गेलेला. पण पाटलाच्या मळ्यात नेहमी ये-जा असल्याने सदा आबाला तो चांगलाच अंगवळणी पडला होता. रस्त्याचा अंदाज घेऊन त्यान रुक्मिणी ला पुढे जायला सांगितलं. रुक्मिणी आणि तिच्या पाठोपाठ सदा आबाची म्हैसदेखील ओढा पार करून पलिकडे गेली. पलिकडे पाणी कमी होत. आता सदा आबाला जरा हायस वाटत होतं. तोही रुक्मिणीपाठोपाठ ओढा ओलांडायला लागला. त्याच्या पाठोपाठ त्याचे दोन्ही बैल एकदमच ओढा ओलांडायचा प्रयत्न करीत होते. अरुंद फळ्यांच्या त्या रस्त्यावर दोन बैल बसणार नव्हते. इतक्यात सर्जा चा सावळ्याला धक्का बसला. सावळ्याचा एक पाय फळीवरुन खाली घसरला. गारठलेला सावळ्या ओढ्याच्या पाण्यात आडवा झाला. चिखल तुडवून तुडवून आणि कमरेएवढ्या पाण्यात चालून थकलेल्या सावळ्याला उठता येईना. सावळ्या पाण्यात आडवा झाल्याने बुजलेला सर्जा कधीच धाऊन ओढ्यापलीकडे गेलेला. जाताना सदाआबालाही धक्का देऊन गेलेला. सदाआबाने पाण्यात पडूनदेखील सावळ्याच दाव हातातून सोडलं नव्हतं. सावळ्या ओढ्याच्या प्रवाहात वाहत होता. पाय हलवुन उठण्याचा प्रयत्न करत होता. पण प्रवाहाला वेग असल्यामुळे तो अजून पुढे जात होता. सदा आबा सावळ्याला सोडायला तयार नव्हता. तोहि सावळ्यासोबत प्रवाहात ओढला जात होता. रुक्मिणी धाय मोकलून रडत होती. आरडाओरडा करत होती. अंधार पडायला लागला होता. रुक्मिणी आणि सदाआबा सोडून सगळेच पाटलाच्या मळ्यात होते. रुक्मिणीचा टाहो कुणाच्याच कानी पडत नव्हता. इतक्यात वाहणाऱ्या सदाआबाच्या हाती ओढ्याकाठच्या वडाची पारंबी लागली. सदा आबाने ती घट्ट पकडली. दुसऱ्या हातात सावळ्याच्या गळ्यात बांधलेला दोर होता. प्रवाहाबरोबर सावळ्या पुढ ओढ घेत होता. सदा आबाने वडाची पारंबी घट्ट पकडून सदाआबा ओढ्याच्या काठाला यायचा प्रयत्न करत होता. त्यामुळे सावळ्याच्या गळ्यातला दोर सावळ्याला फास आवळत होता. सावळ्या मोठ्यानं हंबरडा फोडत होता. शेवटी निसरडा झालेला दोर सदा आबाच्या हातून निसटला आणि सावळ्या ओढ्याच्या प्रवाहात पाण्याच्या गतीने वाहायला लागला.सावळ्यानं जेव्हा हंबरडा फोडला तेव्हाच गळ्याला फास लागुन जीव सोडला होता. त्यामुळे पुराच्या पाण्यातून वाहताना उभा राहण्यासाठीची त्याची धडपडदेखील बंद झालेली. सदा आबा च्या हातातून सावळ्याचा दोस सुटला पण सुटताना हात कापून सुटला. सदा आबा च्या हातातून रक्ताची लाल भडक धार पाण्यात पडत होती . वाहत्या पाण्यात पडताच नाहिशी होत होती. सावळ्या वाहुन जाताना पाहून तो सुन्न झाला होता. सदा आबाच्या दारातच जन्म झालेल्या सावळ्याला त्याच्या रंगामुळे सदा आबाने सावळ्या नाव ठेवलं होत. पोटच्या पोराप्रमाणे सावळ्याला सांभाळल होतं. सावळ्यानदेखील धन्याची मनोभावे सेवा केली होती. सावळ्या आणि सदा आबा च नात पितापुत्रासारख होत. सदा  आबा कधी बाहेर गेला तर सावळ्या गवताच्या काडीलादेखील तोंड लावत नसे. आणि सावळ्याच्या काळजीपोटी सदा आबा पण कधी घर सोडून बाहेर कुण्या पै-पाहुण्यांकडे मुक्कामी जात नव्हता. एका क्षणात सावळ्याचा सगळा जीवनप्रवास सदा आबाच्या डोळ्यासमोरून तरळून गेला. सावळ्या कधीच नजरेच्या कक्षेबाहेर गेला होता. एव्हाना तो कृष्णामाईच्या कुशीत पोहोचलादेखील असेल. अंधार चांगलाच दाटून आला होता. आणि ओढ्यापलीकडे गेलेली रुक्मिणी सदा आबाच्या मागे येऊन पाठीवरून हात फिरवत उभी होती. सावळ्याच्या दुखःत आकंठ बुडालेला सदा आबा भानावर आला. अजून १-१.५ कि.मी. अंतर चालायच होतं. सर्जा आणि म्हशीला तरी सुरक्षित न्यायच होत. सदा आबा चा पाय त्या जागेवरून निघत नव्हता. पण आपणच धीर सोडला तर पाठीमाग उभ्या असलेल्या रुक्मिणीने काय करायच?? 
     सदा आबा तिथुन माघारी फिरला रुक्मिणी ला पुढे घालून आणि सर्जा ला आणि म्हशीला घेऊन झपाझप पावले टाकू लागला. सावळ्याला सोडून जायला मन तयार होत नव्हतं पण आता पर्याय नव्हता. आपल्या संसाराचा मोडका बैलगाडा समर्थपणे ओढणारा सावळ्या तसाच डोळ्यासमोर दिसत होता. हुंदका आवरत नव्हता. डोळ्यातून एकसारखे अश्रू वाहात होते. पण प्रचंड महापुर आणि मुसळधार पावसासमोर सदा आबाच्या अश्रूंचा निभाव लागत नव्हता. साडेतीन, चार तास चालून आल्यानंतर सदा आबा आणि रुक्मिणी पाटलाच्या मळ्यात पोहोचले. सदा आबा ने सर्जा ला आणि म्हशी ला सर्जेराव पाटलाच्या शेडमध्ये दावनीला बांधलं, रुक्मिणी ला देखील सावळ्या च्या जाण्याने अतीव दुखः झालं होत. पण अगोदरच हळव्या झालेल्या नवऱ्यासमोर ते दाखवून चालणार नव्हतं. पाटलाच्या मळ्यात जो तो सदा आबा ला सावळ्याला कुठं सोडलंस म्हणून विचारत होता?? हे विचारताच सदा आबा ला हुंदका आवरत नव्हता आणि तो ढसाढसा रडायचा. शांत स्वभावाचा सावळ्या सगळ्या गावाचा लाडका होता. अगदी लहान पोरा-सोरांपासून, गावातल्या थोरामोठ्यांपर्यंत कुणीही सावळ्याच्या जवळ जाऊन त्याला कुरवाळू शकत होत, औता-गाडीला जुंपू शकत होत. सावळ्या गेल्यानंतर ४ दिवसात पुर ओसरला. पाटलाच्या मळ्यात गोळा झालेला गाव आपापल्या घराकडे पांगला. सदा आबा देखील आपल्या बायकोला आणि जित्राबांना घेऊन घरी गेला. बाळंतीन झालेली लेक मामाकडेच ठेवून राजूही घरी परत आला. सदा आबा च कुठल्याच कामात लक्ष लागत नव्हतं ,घराला कुलूप लावलेल असल्याने घरातील काहीच वाहुन गेल नव्हतं, पण सगळ्या घरात चिखलाचं साम्राज्य झालं होतं. रुक्मिणी आणि राजू सगळी आवराआवरी आणि स्वच्छता करत होती. सदा आबा मात्र दावनीला बाधलेल्या सर्जा च्या तोंडावर हात फिरवत होता. सर्जानेही त्याच तोंड सदा आबाच्या मांडीवर ठेवलं होतं. सावळ्याला जाऊन ४ दिवस झाले मात्र ना सर्जा च्या डोळ्याची धार थांबत होती ना सदाआबाच्या डोळ्याची धार थांबत होती. दोघेही एकसारखे सावळ्याच्या आठवणीत रडत होते. शेवटी त्यांच्या आयुष्याचा सखासोबती त्यांना सोडून गेला होता. तेवढ्यात दारासमोर महिंद्राचा पिक अप येऊन उभा राहिला. त्यातून राजू चा मामा खाली उतरला सोबत घरच्या गायीला वर्षाभरापूर्वी झालेल वासरू सदा आबा ला द्यायला घेऊन आलेला. सदा आबाने त्या पांढऱ्याशुभ्र वासरालापण सावळ्या हेच नाव ठेवलं. सदा आबा आता रडायचा कमी झालाय. लहानशा सावळ्याला सांभाळण्यात आणि त्याचे लाड पुरवण्यात सदा आबा  आता चांगलाच रमतो.
...............................................................................................
वरील कथा आणि कथेतील सर्व पात्रे काल्पनिक आहेत.
...............................................................................................
     सांगली आणि कोल्हापूरला आलेल्या महापुरातदेखील अशा हजारो सदा आबांच्या गायी, म्हशी, बैल, वासरे वाहुन गेली. जीवंतपणी त्यांना जलसमाधी मिळाली. कित्येकांची संपूर्ण घरदार वाहुन गेली. अंगावरच्या कपड्यांशिवाय काहीच उरल नाही. आयुष्यभर कष्ट करून उभारलेला संसार होत्याचा नव्हता झाला. ऊसाचे फड आडवे झाले. नवीन केलेली लागण जमीनीवरच्या मातीसकट वाहुन गेली. बैलांसोबत बैलगाड्या गेल्या, घरातली भांडीकुंडी गेली. स्वयंपाकाला चुली राहिल्या नाहीत की तेल-मीठ उरल नाही. लहानसहान पोरांची वह्या-पुस्तकं गेली. तरूणांची स्वप्ने पुर्ण करणारी पुस्तक स्वप्नासहित भिजून चिंब झाली. अनेक छोटे छोटे पुल वाहुन गेले. गावोगावी रस्त्यांवर, घराघरातून चिखलान आपलं साम्राज्य उभा केलं. सरकारदरबारी गरीब-श्रीमंत सगळे एकाच तराजूत मोजले जावू लागले 'पुरग्रस्त'. आता पुर ओसरल्यानंतर परत एकदा या प्रत्येकाचा संसार नव्याने उभा करायचायं. वाहुन गेलेली घर पुन्हा उभा करायची आहेत. चिखलानी माखलेली घरदारं स्वच्छ करायची आहेत. लहान मुलांना वह्या-पुस्तके, गणवेश, कपडेलत्ते पुरवायला हवेत. प्रत्येक कुटुंबाला जीवनावश्यक साहित्य, चटणी-मीठ,तेल,धान्य, कपडे,भांडी द्यायला हवीत. तरुणांच्या हाताला काम देऊन त्यांची स्वप्ने पुर्ण करायला हवीत. शेतकऱ्यांना शेती परत उभा करायला. बी-बियाणे,खते-औषधे,संपूर्ण मशागतीच्या खर्च द्यायला हवा. यासाठी सबंध महाराष्ट्राला पुरग्रस्त लोकांसोबत मदतीचा सक्षम हात देऊन उभा राहायला हवं. मदत करताना पुरग्रस्त बांधवांच्या डोळ्यात उपकारांची भावना निर्माण न होऊ देता आपले सगेसोयरे,बांधव म्हणून मदत करायला हवी. कथेतल्या सदा आबाला लहानसं वासरु देऊन त्यांच्या मेहुन्याने आनंद दिला.आशा आहे की कोल्हापूर- सांगलीच्या अशा हजारो सदा आबांना आपल्यासारखी लोक पुन्हा उभा करतील. स्वाभिमानी सांगली कोल्हापूर करांची मन न दुख वता त्यांना मदत करून आपण सारे त्यांना या परिस्थितीवर मात करण्याची ऊर्जा देऊयात...त्यांना उभा करुयात...
@अमित जालिंदर शिंदे


Monday, July 29, 2019

आठवणीतले जे.आर.डी.टाटा

आठवणीतले जे.आर.डी.टाटा


     JRD TATA म्हणजेच जहांगीर रतनजी दादाभॉय टाटा,एअर इंडियाचे जनक आणि वैमानिक होण्याचा परवाना मिळविणारे पहिले भारतीय वैमानिक, जगद्-विख्यात उद्योगपती.जर मनात आणल असत तर कधीच जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती झाले असते.पण त्यांना व्यवसाय पैसे कमविण्यासाठी नव्हे तर जगाला कमी पैशात दर्जेदार सेवा पुरविण्यासाठी करायचा होता.इंग्लिश खाडी विमानाद्वारे पहिल्यांदा पार करणाऱ्या सुप्रसिद्ध फ्रेंच वैमानिक लुईस ब्लेरिअट यांच्या जीवनकार्याने जेआरडी खुप प्रभावित झाले होते.त्यामुळे त्यांनीही वैमानिक होण्याचा ध्यास घेतला.सर जमशेदजी टाटांनी उभारलेल्या टाटा उद्योग समुहाचे चेअरमन म्हणून त्यांची वयाच्या अवघ्या ३४ व्या वर्षी निवड झाली.त्यांनी त्या वयातदेखील १४ कंपन्या असलेल्या टाटा उद्योग समुहाच्या चेअरमनपदाची जबाबदारी लिलया पेलली आणि पुढची तब्बल ५३ वर्षे टाटा उद्योग समुहाच्या विकासाची विमाणे अशी चालवली की आज भारताच्या अवघ्या उद्योग विश्वाचे अवकाश या विमाणांनी व्यापून टाकले आहे.जेआरडी टाटांच्या काळात टाटा उद्योग समुहामध्ये ९१ नव्या कंपन्यांची भर पडली.
     आपण व्यावसायिक आहोत आणि आपण फक्त व्यवसाय करायला हवा या संकुचित विचाराने कधीही त्यांच्या मनाला शिवले नाही. आणि म्हणूनच सामाजिक भाण म्हणून जेआरडी टाटांनी भारतात मुलभूत संशोधन होऊन सर्वसामान्य माणसांचे जीवन सुखकर व्हावे या हेतूने टाटा समाजविज्ञान संस्था(१९३६) आणि टाटा मूलभूत संशोधन संस्था(१९४५) स्थापन केल्या.इतकेच नव्हे तर आशिया खंडातील पहिले कर्करोग रुग्णालय त्यांनी मुंबई येथे सुरु करुन रुग्णसेवेला देखील प्राधान्य दिले.
     जेष्ट समाजसेविका आणि प्रसिद्ध लेखिका सुधाताई मुर्ती जेआरडी टाटांची एक आठवण सांगतात.एकदा जेआरडी टाटा चेअरमन असलेल्या टाटा उद्योग समुहाच्या टेल्को या कंपनीला ट्रेनी इंजिनिअर्स हवे होते.तशी जाहिरात टेल्को ने वर्तमानपत्रामधे दिली होती. ती जाहिरात सुधाताईंनी पाहिली.सुधाताई जाहिरातीतील पात्रतेच्या सर्व अटी पुर्ण करु शकत होत्या पण जाहिरातीच्या शेवटी एक वाक्य लिहिले होते,"महिलांनी या नोकरीसाठी अर्ज करू नयेत." पात्र असतानादेखील केवळ आपण महिला आहोत म्हणून आपल्याला नोकरी मिळत नाही हि गोष्ट सुधाताईंच्या मनाला पटत नव्हती. सुधाताईंनी लगेचच जेआरडी टाटांना एक पत्र लिहिले.
 "आदरणीय सर,
     टाटा हे नेहमीच बदलांचे आद्यप्रवर्तक राहिले आहेत.त्यांनीच भारतात पहिल्यांदा पायाभूत सुविधा पुरविणाऱ्या उद्योगांची सुरुवात केली.आज टाटा सर्वच क्षेत्रात काम करतात.टाटांनी भारतात ई.स. १९०० पासून उच्च शिक्षणासाठी प्रयत्न केले आहेत आणि भारतात इंडियन इंस्टिट्यूट ऑफ सायन्स सुरु करण्यामध्ये टाटांची मुख्य भुमिका होती.आणि योगायोगाने मी त्यामध्येच शिक्षण घेतले आहे.पण मला आश्चर्य वाटतयं कि टाटा चालवित असलेल्या टेल्को सारख्या कंपनीमधे नोकरीसाठी लिंगभेद कसा असु शकतो??".


       सुधाताईंनी लिहिलेले हे पत्र स्वता जेआरडींनी वाचले आणि स्वता सुधाताईंना मुलाखतीसाठी बोलावून टेल्को मधे त्यांची निवड केली.एवढ्या मोठ्या उद्योग समुहाचा चेअरमन असलेली व्यक्ती सर्वसामान्य कुटुंबातील मुलीचे पत्र स्वता वाचतात आणि तिला बोलावून घेतात.हे फक्त जे आर डी टाटाच करू शकतात.नंतरच्या आयुष्यात सुधाताईंनी नारायण मुर्तींशी विवाह केला.ईन्फोसिस सारखी सॉफ्टवेअर कंपनी उभारण्यात मोलाचे योगदान दिले.समाजसेवेसाठी ईन्फोसिस फाऊंडेशनची स्थापना केली.सुधाताई बेस्ट सेलिंग लेखिका झाल्या.पण आजही त्या या यशाचे श्रेय जेआरडी टाटांनाच देतात.माणसे उगाच महान होत नसतात त्यासाठी माणुसकी आणि समाजिक भान जागृत ठेवावे लागते.जेआरडींनी ते ठेवले होते.साधेपणा त्यांच्या अंगी होता.कामगारांप्रति आपुलकीची भावना त्यांच्या ठायी होती.देशाप्रती आदर,निष्टा आणि देशभक्ती त्यांच्याकडे होती.बदल करण्याची प्रचंड ईच्छाशक्ती त्यांच्याकडे होती.आणि म्हणून जेआरडी टाटा भारतातल्या सर्वात महान १० व्यक्तीमधे गणले जातात.त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून जेआरडी टाटांना भारत सरकारने १९९२ साली भारतरत्न देवून सन्मानित केले.अशा जेआरडी टाटांना त्यांच्या जयंती दिनानिमित्त विनम्र अभिवादन.
@अमित जालिंदर शिंदे

Monday, July 15, 2019

आदर्श समाजसेवक:प्रा.नानासाहेब लिगाडे

         आदर्श समाजसेवक:प्रा.नानासाहेब लिगाडे

     माजी राष्ट्रपती आर.व्यंकटरमण संस्थापक असलेल्या गांधी फोरमच्या सोलापूर जिल्हा शाखेकडून दरवर्षी दिला जाणारा आदर्श समाजसेवक पुरस्कार सन २०१९ साठी अकोला गावचे सुपूत्र, शेतकरी सहकारी सुतगिरणी मर्यादित,सांगोला चे चेअरमन,रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य प्रा.नानासाहेब लिगाडे सरांना आज दि.-१५/०७/२०१९ रोजी सायंकाळी ४:३० वाजता हिराचंद नेमचंद वाचनालय,सोलापूर येथे मा.पालकमंत्री विजकुमार देशमुख यांच्या शुभहस्ते प्रदान होत आहे. प्रथम लिगाडे सरांचे हार्दिक अभिनंदन आणि त्यांच्या पुढील सामाजिक वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.
     भाई जगन्नाथराव लिगाडे (तात्या)  चँरिटेबल ट्रस्ट व रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून केलेल्या सामाजिक कार्यासाठी लिगाडे सरांना आदर्श समाजसेवक पुरस्कार मिळाला आहे.सरांनी भाई जगन्नाथराव लिगाडे(तात्या) चँरिटेबल ट्रस्ट च्या माध्यमातून आजपर्यंत नेत्रतपासणी शिबिर, स्त्रियांसाठी सर्वरोग निदान शिबिर, विविध विषयांवर प्रबोधनपर व्याख्याने,माजी सैनिक सन्मान सोहळा,२००७ पासून दरवर्षी राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा आयोजित केल्या आहेत.शिक्षण आणि व्यक्तिमत्व विकास या सरांच्या आवडीच्या गोष्टी असल्याने रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून सरांनी स.शा.लिगाडे विद्यालय व भाई जगन्नाथराव लिगाडे ज्यू.कॉलेज अकोला,शिवाजी विद्यालय व ज्यू.कॉलेज महुद बु.,मांजरी हायस्कूल मांजरी,यशवंत विद्यालय पंढरपूर यांच्या विविध विकासकामांमध्ये मोलाचे योगदान दिले आहे.या सर्व शाळांमधील ५वी ते १० वी च्या विद्यार्थ्यांना सरांनी रोख रकमेची बक्षीसे ठेवून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याचे काम देखील केले आहे.
     मी ५वीला गेल्यावर लिगाडे सरांना प्रथम माझ्या शाळेमध्ये पाहिले. ओघवती भाषणशैली,नेहमी शाळेच्या विकासाचाच ध्यास,आमच्या शाळेच्या मुख्याध्यापक,शिक्षक,आणि विद्यार्थ्यांना नेहमी वेगवेगळ्या विषयावर मार्गदर्शन यामुळे विद्यार्थीदशेत मला सरांच्या व्यक्तिमत्त्वाचे विशेष आकर्षण होते.सरांचे वडील आणि माणदेशी जनसेवक,सांगोला तालुक्यामध्ये होऊन गेलेला सच्चा लोकनायक,सांगोला सुतगिरणीचे चेअरमन जगन्नाथ तात्यांचे २९ डिसेंबर २००५ रोजी अकाली निधन झाले.तात्यांच्या निधनानंतर दि २१ डिसेंबर २००६ रोजी सरांची सांगोला सुतगिरणीचे चेअरमन म्हणून निवड झाली. कापड आणि सुतगिरणी व्यवसाय जगभरात मंदिच्या सावटात अडकला असतानादेखील आपल्या प्रशासकीय कौशल्याच्या जोरावर सर सांगोला सुतगिरणी मोठ्या सचोटीने चालवित आहेत.सुतगिरणीच्या चेअरमन पदावर काम करत असताना गिरणीतल्या कामगारांसोबत त्यांनी नेहमीच सलोख्याचे संबंध ठेवले.
     सरांनी आम्हा भावंडांना क्वचितच पाहिलेले पण आमच्या वडिलांना जेव्हा कधी काही कामानिमित्त त्यांना भेटाव लागे तेव्हा सर त्यांच्याकडे नेहमीच माझ्या आणि माझ्या छोट्या भावाच्या शिक्षणाबद्दल आपुलकीने विचारपूस आणि मार्गदर्शन करीत.
     मागच्या वर्षी १ व २ ऑगस्ट २०१८ रोजी औरंगाबाद येथे शेतकरी कामगार पक्षाचे १७ वे अधिवेशन भरले होते. राजकीय विषयाची आवड म्हणून मी सरांसोबत या अधिवेशनाला गेलो होतो.त्या कालावधीत लाभलेला सरांचा सहवास निश्चितच प्रेरणादायी होता.रयत शिक्षण संस्थेसारख्या आशिया खंडातील सर्वात मोठ्या शिक्षण संस्थेचा जनरल बॉडी सदस्य, कोट्यवधी रुपयांचे भागभांडवल असलेल्या सुतगिरणीचा चेअरमन असलेली व्यक्ती आपल्यासोबत राहते,सोबत आलेल्या प्रत्येक कार्यकर्त्याची आपुलकीने विचारपूस करते ह्या गोष्टी खरच शिकण्यासारख्या होत्या.दोन दिवसाच्या त्या सहवासात मी सरांना अनेकवेळा अनेक प्रश्न विचारले.शेतकरी कामगार पक्षाची स्थापना, इतिहास, मार्क्सवादी विचारसरणी,एकेकाळचा काँग्रेसचा महाराष्ट्रातील प्रमुख विरोधी पक्ष पण सध्या झालेली वाताहत,रयत शिक्षण संस्था, कर्मवीर भाऊराव पाटील, मराठा आरक्षण,सांगोला सुतगिरणी आणि अडचणीतला वस्त्रोद्योग या व अशा अनेक विषयांवर मी सरांना प्रश्न विचारले व सरांनी मुक्तकंठाने त्या सर्व प्रश्नांची समाधानकारक उत्तरे दिली.
     साधी राहणी आणि उच्च विचारसरणी या उक्तिला सर नेहमीच समानार्थी राहिले. शिस्तीचे भोक्ते,सामाजिक जाण,प्रशासकीय कौशल्य,विद्यार्थी कामगार आणि राजकीय पुढाऱ्यांशी आपुलकीचे संबंध या गुणांमुळे सर नेहमीच सर्वाना आपलेसे वाटतात.
     कधीही अडचण आली तर भेट म्हणून सांगणारे सर नेहमीच एक आदर्श गुरुदेखील वाटतात.अशा अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाला आदर्श समाजसेवक म्हणून मिळालेला पुरस्कार म्हणजे त्यांच्या कामाची पोचपावतीच होय.सरांना परत एकदा हार्दिक अभिनंदन आणि त्यांची भावी वाटचाल अशीच यशस्वी होवो ह्या शुभेच्छा.
@अमित जालिंदर शिंदे

Sunday, January 20, 2019

गोल्ड मेडल...

*गोल्ड मेडल...* 
     २१ व्या शतकाला एक समानार्थी शद्ब आहे,स्पर्धेचे जग.लोकसंख्या प्रचंड वाढल्यामुळे खरतर जगण्याचीच स्पर्धा निर्माण झालीये.त्यातुनच हार -जीत नावाच्या संकल्पना देखील निर्माण झाल्या.रोजच्या जीवनात अशा अनेक स्पर्धा चालू असतात. या स्पर्धांमध्ये जिकणाऱ्यांना मेडल्स किंवा ट्रॉफी वगैरे बक्षीसे दिली जातात.अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय असे मानाचे पुरस्कार देखील ठराविक रकमेचे मानधन आणि मेडल याच स्वरूपात दिले जातात.मग ते बक्षीस किंवा पुरस्कार ऑलिम्पिक चा असो,भारतरत्न चा असो किंवा नोबेल चा असो.शाळा महाविद्यालयांमध्ये देखील त्यांच्या गुणवंतांना मेडल देऊन सन्मान करण्याची प्रथा सुरु झालीये.पण मी प्राथमिक शाळेत प्राथमिक शिक्षण घेत होतो त्याकाळी मला ही मेडल वगैरे या गोष्टी फक्त चित्रात किंवा टि.व्ही.मधे पाहुन माहिती होत्या,पण स्पर्धा माहिती होती कारण मी ४ थी मधे असताना माझा लहान भाऊ १ ली मधे होता.तरीदेखील आमच्या मार्कांची त्यावेळी एकमेकांशी स्पर्धा व्हायची.अर्थात ती स्पर्धा  आम्हीच करायचो ,त्याला एक कारणदेखील होतं.आम्ही दोघ जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत जायचो तेव्हा आम्हाला अभ्यासाची सवय लागावी म्हणून आमच्या दोघांपैकी ज्याला पैकीच्या पैकी मार्क पडतील त्याला २ रू.आणि दुसऱ्याला १ रू. च नाण बक्षीस म्हणून आजोबांकडून मिळायचं.२००१-२००५ चा तो काळ होता. त्यावेळी २ ₹ ला पण आवडीच्या गोळ्या,छोटी सुटी खारी बिस्किटे, पापड्या असा खाऊ जवळच्या दुकानामध्ये मिळायचा.मग तो खाऊ मिळवायचा म्हणून आम्ही भरपूर अभ्यास करायचो.चांगले मार्क मिळवायचो.बऱ्याचदा दोघांनाही पैकीच्या पैकी मार्क मिळायचे.आणि दोघेही घराच्या बाजूला कुठेतरी शेळ्या फिरवणाऱ्या आजोबांच्याकडे धावत जाऊन २₹ मागायचो.हातावर पडणार ते २₹ च नाण आम्हाला गोल्ड मेडल मिळाल्यासारखच वाटायचं. ते घेताना मनातला आनंद चेहऱ्यावर फुलणाऱ्या हास्यातुन स्पष्टपणे झळकायचा.त्या गोल्ड मेडलची बरोबरी आयुष्यात दुसऱ्या कुठल्याच मेडलने आणि बक्षीसाने होऊ शकणार नाही. कारण माणसाला माणूस म्हणून जगण्यासाठी आवश्यक असणाऱ्या शिक्षणाच्या प्राथमिक वर्गांचा पाया त्या मिळणाऱ्या गोल्ड मेडलरुपी नाण्यांनी मजबूत केला.माझ्या बालपणापासून ते आता २०१९ येईपर्यंतच्या या १२-१५ वर्षांच्या काळात आम्ही सज्ञान झालो.मतदानासारखा नागरिक म्हणून जबाबदारी दाखवणारा हक्क मिळाला.आम्ही क्रुषीपदवीधर झालो.सगळ काही बदलल पण ती बक्षीसरुपी नाणी आजही शिकायला आणि कोणतही काम करायला प्रेरणा देतात.त्या गोल्ड मेडलसारख्या वाटणाऱ्या २₹ च्या नाण्यांची किंमत आज लाखो रुपये मोजूनदेखील होऊ शकणार नाही.
@अमित जालिंदर शिंदे.

Tuesday, January 8, 2019

दप्तराच ओझं...

                             दप्तराच ओझं...
     अलिकडच्या काळात विद्यार्थी आणि त्यांच दप्तर हा फारच चर्चेचा विषय झालाय.हा विषय आता विधीमंडळाच्या सभागृहात, न्यूज चँनेलच्या पँनल डीबेटमध्ये आणि वर्तमानपत्रांच्या हेडलाईन्समध्ये झळकु लागलाय.हे चित्र पाहात असताना माझ्या पिढीचे आणि माझ्या अगोदरचे सगळेच साक्षर त्यांच्या शालेय जीवनाच्या फ्लँशबँक मधे गेले नसतील तर नवलचं.माझ्या पिढीला हे दप्तर शाळेत घेऊन जाण्यासाठी पाठीवरच्या बँग बऱ्यापैकी मिळत होत्या.(आता सरसकट सगळ्यांकडेच असतात).२००० ते २००५ च्या माझ्या प्राथमिक शाळेच्या जीवनात काळी पाठी,पेंसिल,एखादीच वही,अंकलिपि,आणि पाठ्यपुस्तक मंडळाने दीलेली मराठी, इंग्रजी, परिसर अभ्यास ह्या ३ पुस्तकांव्यतिरिक्त अधिक कुठली गोष्ट वापरल्याच मला आठवत नाही(इयत्ता ३री,४थी ला इतिहासाचे पुस्तक).पण २००५ नंतरच्या काळात मुलांचा इंग्लिश मिडीयमकडे ओढा वाढला(मुलांपेक्षा पालकांचाच).आणि मग इंग्लिश मीडियमला जाणाऱ्या मुलांना चित्रे पाहायची वही वेगळी,ती रंगवायची वही वेगळी,ती गिरवायची वही वेगळी अशा एक ना अनेक भाराभर चिंध्या घेऊन शाळेत जायची वेळ वयाच्या अवघ्या ५-६ व्या वर्षीच आली.त्याचवेळी बंद पडत चाललेल्या प्राथमिक शाळांना स्वतःच अस्तित्व टीकविण्यासाठी इंग्लिश मिडीयम शाळांच्या उपक्रमांचे अनुकरण करण्याची वेळ आली आणि आपसुकच लहान लहान मुलांच्या पाठीवरचे ओझे वाढायला लागले,त्यास भर म्हणून की काय एका हातात डब्याची पिशवी अजून वाढली.कारण पाठीवरच्या बँगमधली डब्याची जागा वाढलेल्या वह्या-पुस्तकांनी घेऊन टाकली.
आम्ही माध्यमिक शिक्षण घेत होतो तेव्हा अर्ध्याहून अधिक मुले आठवड्याच्या बाजाराला वापरतो ती नायलॉनच्या वायरची पिशवी दप्तर म्हणून वापरायचे.३-४ कि.मी.अंतर चालुन शाळेला येणाऱ्या मुलांचे हात ती पिशवी धरून अवघडून जायचे.म्हणूनच कदाचित त्या पिढीच्या मनगटात शाळा करून घरची चार काम करण्याचदेखील बळ असायचं.त्यावेळी त्या वायरच्या पिशवीत ६ ते ८ वेगवेगळ्या विषयाच्या वह्या,तेवढीच पुस्तके आणि तेवढ्याच ग्रहपाठाच्या वह्या,जेवनाचा डबा,एक प्रयोगवही,कंपासपेटी अस बरचसं  सामान असायचं.ते सगळ पिशवीत व्यवस्थित बसविण्याच टापटीपपणाचदेखील  एक कौशल्य माझ्या समकालीन विद्यार्थ्यांमध्ये होत.त्या मुलांना तेवढ्या दप्तराच कधी ओझ वाटायच नाही,कारण आकरी (कच्च)दुध पिऊन,घरची चारदोन काम करुन ,अभ्यास करून मग शाळेला येणारी ती मुल शारिरीकद्रुष्ट्यादेखील तितकी सक्षम असायची.आताच्या हॉर्लिक्स पिऊन उंची वाढविण्याच्या आणि बॉर्न विटा पिऊन स्मरणशक्ती वाढविण्याच्या जमान्यातील मुले हायब्रिड धान्य खाऊन शारीरिकद्रुष्ट्या अतिशय क्षीण झालेली आहेत. त्यात भरीस भर म्हणून टि.व्ही. वरच्या मोटु-पतलु बघत बघत,व्हिडीओ,थ्री.डी.,एच.डी. गेम्स, आणि सोशल मिडीयाने मुलांचा मेंदूदेखील इतका क्षीण करून ठेवलाय की साध्या साध्या समस्यांची उत्तरे हल्लीच्या विद्यार्थ्यांना आत्महत्येसारख्या पर्यायांमध्ये शोधावी लागतात.                 
     पुर्वी इयत्ता नववी आणि दहावी मध्ये बीजगणित-भुमिती,विज्ञान आणि तंत्रज्ञान, सामाजिक शास्त्रे,या तीन विषयांची परिक्षा प्रत्येकी १५० गुणांची असायची.आता ह्या तीनही विषयांची परिक्षा प्रत्येकी १०० गुणांची होते.गुण कमी झाले म्हणजे साहाजिकच प्रश्नांची संख्यादेखील कमी झाली.लिखानाच हे ओझ आता थोडस हलक झालयं.
प्रत्येक विद्यार्थ्याची बौद्धिक आणि शारीरिक पातळी एकसारखी नसली तरी शिक्षण हे साक्षर होण्याच साधन आता पुर्वीपेक्षा अनेक पटीने हलकं झालेल असताना दप्तराच्या ओझ्याचा उगीच बाऊ करण्यात काहीच अर्थ नाही. शिक्षण हे आता केवळ व्यक्तिला साक्षर बनविण्याचे आणि जगायला शिकविण्याचे साधन राहिले आहे.काहीतरी शिकला की कुठेतरी नोकरी मिळण्याचे दिवस आता राहिले नाहीत. जगाची स्पर्धा करीत असताना दप्तराच ओझ कमी करण्यापेक्षा विद्यार्थ्यांनाच ते ओझ उचलण्याइतपत सद्रुढ बनवायला हवं.त्यांच्या मेंदूच मानसिक खच्चीकरण करणारी गेमिंग आणि सोशल मीडियाची साधने त्यांच्यापासून दूरच ठेवून (किमान माध्यमिक शिक्षण पुर्ण होईपर्यंत) त्यांच्या मेंदूवरचे मानसिक ओझे हलके करायला हवे.खाजगीकरणाच्या या जमान्यात गुणांपेक्षा ज्ञानाला जास्त महत्त्व येत असल्याने पालकांनी गुणांच्या वाजवी अपेक्षांचे नाहक ओझे पाल्यांवर टाकण्यापेक्षा त्यांना ज्ञानाच्या महासागरात डुंबायची मोकळीक द्यावी तरच आजचादेखील विद्यार्थी उद्याच्या महासत्ता भारताची स्वप्ने साकार करू शकेल.
@अमित जालिंदर शिंदे

Saturday, December 1, 2018

पाण्यासाठीचा विजयी संघर्ष...

                    पाण्यासाठीचा विजयी संघर्ष...
वरील सर्व छायाचित्रे सदर वर्तमानपत्रांच्या ई-पेपरमधुन घेतले आहेत.

     यंदा सांगोल्यामध्ये पाऊस पडलाच नाही. दुष्काळाची दाहकता इतकी भयानक आहे की यंदा खरीप आणि रबी दोन्ही हंगाम १०० टक्के फेल गेले.डाळिंब,बोरी,पेरू,द्राक्षे अशी फळपिके घेऊन उत्पादनांचे विक्रम करणाऱ्या अनेक शेतकऱ्यांनी पाण्याची अवस्था पाहून फळबागा सोडून दील्या.ज्या शेतकऱ्यांनी धाडसाने पाणी पुरेल या आशेने बागांचे बहर धरले त्यांच्या बागांना नेमकं फळाच्या वाढीच्या काळात पाणी कमी पडू लागलं होत.पाण्याविना जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न देखील निर्माण झाला होता.टेंभू उपसा सिंचन योजनेतुन सांगोला तालुक्याच्या हक्काचे पाणी देखील सांगोल्याला आजपर्यंत मिळत नव्हते.५० वर्षांपूर्वी १९७२ च्या दुष्काळी परिस्थितीमधे रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून काढलेल्या नीरा उजवा कालव्याला अद्याप पर्यंत कधीच पाणी आले नव्हते ते यावर्षी ऑक्टोबर महिन्यामधे चाचणी घेण्याच्या निमित्ताने का होईना पण आले.त्या कालव्याची कामे सुरू असली तरी तालुक्याच्या हक्काचे पाणी यायला अजून किती दिवस लागतील हे सांगता येत नाही.टेंभू आणि म्हैसाळ योजनेच तालुक्याच्या हक्काचे पाणी आजपर्यंत शेजारच्या तालुक्यातील शेतकऱ्यांनीच वापरले.अशा पार्श्वभूमीवर सांगोल्यातील मान नदीकाठावरच्या चिनके पासून मेथवडे पर्यंत कायम पाण्यापासून वंचित राहिलेल्या गावातील तरुणांनी संघटित होऊन एक क्रुती समिती तयार केली.
२०१९ च्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील पाणी प्रश्न पेटणार होताच.आमदारकीचे सर्वच उमेदवार केवळ दुष्काळ आणि पाणी याच दोन मुद्द्यांवर एकमेकांवर गरळ ओकणार होतेच . वेगवेगळ्या कार्यक्रमांमधुन त्याची सुरुवात देखील झाली होती.पण तत्पूर्वी या १४ गावांतील जनतेने आंदोलनाची गुगली अशी टाकली की सर्वच नेते आणि त्यांच राजकारण बँकफुटवर गेलं आणि जनता फ्रंटफुटवर आली. 
     १)मान नदिवरचे १४ गावातील कोल्हापूर पद्धतीचे बंधारे हक्काच्या टेंभू योजनेच्या पाण्यातून भरून द्यावेत.
२)माण नदिला कालव्याचा दर्जा द्यावा.
३)नीरा उजवा कालव्याची कामे लवकरात लवकर पुर्ण करुन हक्काचे पाणी तालुक्याला मिळावे या आणि अशा आणखी काही मागण्या घेऊन १४ गावच्या जनतेने क्रुती समितीच्या नेतृत्वाखाली सांगोला तहसिल कार्यालयावर मोर्चा काढला.या मोर्चाचे फलित म्हणून टेंभू योजनेच्या पाण्याने बंधारे भरण्यासाठी १६ नोव्हेंबर ला पाणी माण नदीपात्रात सोडण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले होते.पण १६ तारीख उलटून गेली तरी पाणी सोडण्याबाबतीत कुठलीच क्रुती न झाल्याने.१४ गावांतील शेतकऱ्यांनी क्रुती समितीच्या नेतृत्वाखाली जनावरांसह तहसिल कार्यालयावर धरणे आंदोलनाला १७ नोव्हेंबरपासुन सुरुवात केली.सोबतच दिपक पवार व दत्ता टापरे या युवकांनी पाणी मेथवडे बंधाऱ्यांमधे पोहोचत नाही तोवर बेमुदत उपोषनाचा निर्णय घेतला.या आंदोनस्थळी तालुक्यातील सर्वच नेतेमंडळीनी भेटी दिल्या पण पाणी येण्यासाठी  त्यांच्याकडून तातडीने जे प्रयत्न होणे गरजेचे होते ते झाले नाहीत.खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांनी जबाबदारी ओळखुन तोडगा काढण्याचा प्रयत्न केला.मंत्री विजयबापु शिवतारे आणि क्रुती समितीच्या झालेल्या बैठकीत तोडगा काढण्याचे प्रयत्न देखील झाले.उपोषणकर्त्यांच्या तब्येती बिघडल्या.२४० तास म्हणजे १० दिवस उपोषण केल्यानंतर,तळपत्या उनाची आणि रात्रीच्या थंडीची कसलीही तमा न करता शेतकरी आणि जनावरानी तहसिल कार्यालयावर ठीय्या मांडल्यानंतर आणि या आंदोलनात उष्माघाताने एका म्हशीचा बळी गेल्यानंतर या आंदोलनाला यश आले.२७ नोव्हेंबरला टेंभू योजनेचे पाणी मान नदीच्या दिशेने मार्गस्थ झाले.३० नोव्हेंबर ला अनेक अडथळे पार करत हे पाणी सांगोल्यातील चिणके गावामध्ये दाखल झाले.प्रचंड मोठा संघर्ष करून मिळालेल्या या पाण्याला पाहण्यासाठी चिणके येथे क्रुति समितीसह मोठ्या संख्येने लोक आले होते.एका दुष्काळी तालुक्याच्या आजपर्यंतच्या इतिहासात पाण्यासाठी झालेले हे आजपर्यंतचे सर्वात प्रभावी, आक्रमक आणि यशस्वी आंदोलन आहे.क्रुती समितीचे नियोजन,शेवटपर्यंत मागण्यांवर ठाम राहण्याचा संयम,एकी,जनावरांसह अद्यापपर्यंत तेथेच बसुन असलेल्या शेतकऱ्यांची सहनशीलता, उपोषणकर्त्यांचा धीर,आणि प्रसारमाध्यमांनी तालुक्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांनी शेवटपर्यंत दिलेली साथ,अनेकांनी जनावरांसाठी केलेली चारा आणि पाण्याची सोय सगळच कौतुकास्पद होतं.हा संघर्ष सुरू झाल्यापासून त्याला यश मिळेपर्यंतचा या आंदोलनाचा प्रवास थक्क करणारा वाटतो.एकप्रकारे यंदाच्या भीषण दुष्काळनेच शेतकऱ्यांना लढायला बळ दिले अस म्हणायला हरकत नाही. आणि लढण्याची ईच्छा असणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना एकीच्या वज्रमुठीत सामावून घेण्याची आणि त्यांच्यात चैतन्य निर्माण करण्याची किमया साधली क्रुति समितीच्या तरुण ,तडफदार युवकांनी. सर्वांनी या आंदोलनातील आपलीआपली जबाबदारी ओळखुन अतिशय चोखपणे ती निभावल्यानेच या पक्षविरहीत आंदोलनाला यश मिळाले.या आंदोलनातुन संघर्ष केल्याशिवाय आणि लोकप्रतिनिधी व प्रशासनाच्या माणगुटिवर बसल्याशिवाय आपली कामे होत नसतात हि अतिशय मोलाची शिकवनदेखील तालुक्याला मिळाली.
     एकीकडे २३ते २६ नोव्हेंबर २०१८ या कालावधीत नागपुरमध्ये मध्य भारतातील सर्वात मोठे क्रुषी प्रदर्शन 'अँग्रो व्हिजन' नितीन गडकरीच्या नेतृत्वाखाली पार पडत होते.उद्घाटनाच्या कार्यक्रमामध्ये योगी आदित्यनाथ, केंद्रीय क्रुषीमंत्री राधामोहन सिंह,चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'दुष्काळाशी झगडत देखील सांगोला सर्वच प्रकारच्या फळबागांचा  हॉर्टिकल्चरल झोन होत असल्याची माहिती दिली.' शेततळ्यांच्या माध्यामातुन तालुक्याने केलेल्या सुक्ष्म सिंचन क्रांतीचे कौतुक राज्यभरात होत असते.पण त्याच सांगोल्यातील शेतकऱ्यांना हि फळशेती टिकविण्यासाठी एवढा संघर्ष करावा रागत असेल तोही हक्काच्या पाण्यासाठी तर हि अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे.पण या आंदोलनाची गांभीर्याने दखल घेत शासण आणि प्रशासणाने लक्षात ठेवावे की सांगोल्यातला तरुण शेतकरी खडबडून जागा झालाय.आणि तो आता यापुढे त्यांच्या हक्काचे पाणी कधीच सोडणार नाही.हक्काचे पाणी तो मिळवणारच.सुदैवाने यापुढील काळात पाऊस वेळेत पडावा आणि निसर्गाचा सर्वांगीण समतोल राहावा जेणेकरून कोरडा दुष्काळ पडु नये.शेवटी १४ गावांची क्रुती समिती,समितीतील सर्व तरुण,आणि आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांचे अभिनंदन आणि आगामी काळासाठी हार्दिक शुभेच्छा.आपली शेती सम्रुद्ध व्हावी.
@अमित जालिंदर शिंदे

न्यूझीलंड,कोरोना,नागरीक आणि जेसिंडा आर्डर्न... न्यूझीलंड देशाचा राष्ट्रध्वज      न्यूझीलंड, प्रशांत महासागराने चौफेर वेढलेला एक बे...