कळसुली: निसर्गरम्य कोकणी खेडं
अडीच वर्षापूर्वी म्हणजे दी-१७/०६/२०१७ रोजी आमच्या बी.एस्सी. (कृषी) च्या शिक्षणाचा भाग म्हणून मी आणि माझे इतर दहा सहकारी अशी आमची ११ जणांची टीम मु. पो. कळसुली, ता- कणकवली, जि- सिंधुदुर्ग या गावामध्ये २० आठवड्यांचा ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रम पुर्ण करण्यासाठी दाखल झालो. ३ वर्षे महाविद्यालयात शेतीबद्दल जे काही शिकलो ते शेतकऱ्यांच्या बांधावर प्रायोगिक तत्त्वावर प्रत्यक्षात उतरवून अनुभवण्याचा, अनोळखी लोकांच्या गावात राहण्याची, जेवणाची व्यवस्था करण्यापासून ते शेतीची विविध प्रात्यक्षिके घेणे, तज्ञ व्यक्तिंचे शेतीउपयोगी मार्गदर्शनाचे कार्यक्रम घेण्यापर्यंत आणि एकंदरीतच स्वताच्या हिंमतीवर जगायला शिकविणारा हा २० आठवड्यांचा ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रम. शिवराज देवकर या सहकाऱ्याच्या नेतृत्वात आणि आमच्या महाविद्यालयाच्या प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला हा कार्यक्रम पार पाडायचा होता. सुरुवातील आम्ही आमच्या इच्छेविरुद्ध मिळालेल गाव म्हणून नाराज होतो पण नंतर इथल्या लोकांनी आम्हाला दिलेल्या अभूतपूर्व प्रतिसादामुळे आम्ही या गावात चांगलेच रमलो.
२३७१ हे. क्षेत्रफळ असलेल्या कळसुलीमध्ये कमीत कमी ५६६ हे क्षेत्रामध्ये दरवर्षी खरीपामध्ये मोठ्या जोमाने भातपीकाची लागवड केली जाते, आणि त्यातून दरवर्षी विक्रमी उत्पादनदेखील घेतले जाते.म्हणूनच कळसुली हे गाव कणकवली तालुक्यातील भाताचे कोठार म्हणून ओळखले जाते. भाताचे उत्पादन अजून वाढविण्यासाठी सध्या कळसुली ग्रामपंचायत गावातील काही प्रगतीशील शेतकऱ्यांच्या शेतामध्ये कृषी सहाय्यकांच्या मार्गदर्शनाने डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या भाताच्या वेगवेगळ्या जाती आणि भातलागवडीच्या चारसुत्री, श्री यांसारख्या विकसित पद्धतींची प्रात्यक्षिके घेत आहे. कळसुली गावातील सेवानिवृत्त विस्तार अधिकारी श्री. भास्कर सावंत आम्हाला सांगत होते की," काही वर्षांपूर्वी गावात भातउत्पादनाच्या स्पर्धा भरवल्या जायच्या. भाताचे विक्रमी उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना यथोचित सत्काराबरोबरच आकर्षक बक्षीसे दिली जायची. त्याकाळी शेतकऱ्यांना दीलेल्या या प्रोत्साहनामुळेच कळसुलीतील भातशेतीमध्ये आमुलाग्र बदल झाले आणि भातपीक उत्पादन वाढीस चालना मिळाली.
शेतीची प्रचंड आवड असणारे आणि आंब्याची खुंटी कलमे बांधण्यात तरबेज असलेले शेतीमित्र श्री तेली सर सांगतात की कळसुलीमध्ये आजही पूर्वापार चालत आलेली 'बुचडी' ही भातलागवडीची पद्धत बरेच शेतकरी वापरतात. त्यांच्या या पद्धतीनुसार उन्हाळ्यामध्ये शेताला शेणखत घालत असताना त्या शेणामध्ये भाताच्या बिया मिसळून घालतात. पाऊस पडला की या बिया उगवून येतात. या पद्धतीमुळे शेताला खताचा पुरवठा तर होतोच पण शेतकऱ्यांच्या वेळेची आणि कष्टाची मोठ्या प्रमाणात बचतही होते.
श्री. प्रविण दळवी यांनी आणि त्यांच्यासारख्या काही उत्साही तरुण शेतकऱ्यांनी सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या कळसुलीच्या डोंगराउतारावर काजू आणि बांबूंची लागवड केली आहे. अशा तरुण उत्साही शेतकऱ्यांनीच कळसुलीच्या फळबाग शेतीची धुरा आपल्या खांद्यावर समर्थपणे सांभाळली आहे. शेती करायची तर कष्ट आणि उत्साहाबरोबरच अनुभवाची शिदोरीही असावी लागते. गावातील जेष्ट मंडळी आपल्या अनुभवाचा परिपूर्ण वापर करून तरुणांना वेळोवेळी मार्गदर्शन करीत असतात आणि याच कारणाने गावातील प्रत्येक कुटुंबातील तरुण आणि जेष्ट या दोन पिढ्यांमध्ये अतिशय खेळीमेळीचे वातावरण दीसून येते.
कळसुली आणि भागातील शेतीच्या विकासासाठी आणि उन्हाळ्यातील पाण्याचा तुटवडा कमी करण्यासाठी परिसरातील तीन मोठ्या ओढ्यांवर धरणाची निर्मिती झाली आहे. हे कळसुली धरण म्हणजे गावाच्या माथ्यावरचा सुवर्णमुकूटच होय. याच धरणामुळे परिसरात सध्या ऊसलागवडीखालील क्षेत्राची वाढ होत असून इथले काही तरुण पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करून स्वतःबरोबरच इथल्या शेतीलादेखील सुशिक्षित करू पाहात आहेत. त्यांच्या या प्रयत्नांना यश मिळाल्यास कळसुलीच्या शेतीला सोन्याचे दीवस यायला आणि शेतकरी परत राजा व्हायला नक्कीच जास्त दीवस लागणार नाहीत.
गावातील लोकांनी फक्त शेतीकडेच लक्ष दिले असे नाही. या लोकांनी इथली शेती सम्रुद्ध करण्याकडे तर लक्ष दीलंच आहे आणि सोबतच शिक्षणाकडेदेखील लक्ष दीले आहे. म्हणूनच ३१०८ लोकसंख्येच्या या गावामध्ये ७ प्राथमिक शाळा, १ हायस्कूल आणि ज्यू. कॉलेजदेखील आहे. आज हे गाव १००% साक्षर असून गावातील बरेचसे लोक सरकारी नोकरीत आहेत. पंतप्रधानांच्या स्वच्छ भारत अभियानाला सर्वतोपरी प्रतिसाद देत गावकऱ्यांनी गावाला आरोग्याच्या बाबतीतदेखील साक्षर बणविण्यात यश संपादन केलेले आहे. नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी गावात प्राथमिक आरोग्य केंद्र आणि केंद्र शासणाचे आरोग्य उपकेंद्रसुद्धा आहे. माणसांच्या आरोग्याबरोबरच जनावरांचे आरोग्य व्यवस्थित ठेवण्यासाठी गावात शासकीय पशुवैद्यकीय दवाखाना सुरू आहे.
गावातील लोकांच्यामध्ये सामाजिक सलोका, एकीची भावना टीकून राहावी तसेच मराठी संस्कृतीचा ठेवा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे देण्यासाठी गावातील काही आध्यात्मिक मंडळींनी आवर्जून मंदिरांमध्ये ग्रंथवाचनाचे कार्यक्रम सुरू केले आहेत. वेगवेगळ्या ग्रंथांच्या वाचनातून रामाच्या,श्रीकृष्णाच्या, संत ज्ञानोबा आणि तुकामाऊलींच्या गोष्टी सांगितल्या जातात. कोकणात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो हे आजपर्यंत फक्त ऐकले होते. पण कळसुलीत आल्यावर इथला गणेशोत्सव प्रत्यक्ष पाहिला आणि अनुभवलासुद्धा. घरच्या पाटावर खरेखुरे दागिने, व्हेलवेटचे कपडे वापरून बनवलेल्या गणपतीच्या मुर्त्यांमधला जीवंतपणा अप्रतिम असाच असतो. गणेशोत्सवाच्या निमित्ताने संपूर्ण गावच्या गाव भक्तीरसात डुंबून जाते. भजन आणि किर्तनांच्या कार्यक्रमात लहानथोर सर्वचजण तल्लीन होऊन जातात. दशावतारी नाटके आणि डबलबारीचे कार्यक्रम ही तर कोकणाची खासीयतचं. कळसुलीत कोकण अनुभवायला मिळाला.
आकाशातून कोसळणाऱ्या धो-धो पावसाची कसलीही तमा न करता गुडघाभर चिखलात दीवसभर भातलागवडीची कामे करणारा इथला कणखर शेतकरी रात्रीच्या काळोखात देव महापुरुष, भोगनाथ आणि गिर्बादेवी मंदिराकडे भक्तीरसात तल्लीन होऊन ग्रंथवाचन ऐकण्यासाठी आणि आत्मिक शांती प्राप्त करण्यासाठी धाव घेतो. देवाकडे आपल्या सुंदर मालवणी भाषेत गार्हाणेदेखील घालतो.
अरे ये देवा रवळनाथा,भोगनाथा...
मी तुका भरलेल फळ ठेवतय रे महाराजा...
आणि बारा पाचाक पाण ठेवतय रे महाराजा...
मी चतुसुत्री भातलागवड करतय, म्रुदापरिक्षण करतय,
मोजूनमापून खत घालतय आणि वाहत्या पाण्याक बांध घालतय रे महाराजा...
ह्या जा काय करतय ता शेतीभातीसाठी करतय त्यात माका यश दे रे महाराजा...
खरच कळसुली म्हणजे निसर्गाला पडलेलं सुंदर स्वप्नच होय.
@अमित जालिंदर शिंदे
..........................................................................................
कळसुलीतील छायाचित्रे-
@अमित जालिंदर शिंदे
..........................................................................................
कळसुलीतील छायाचित्रे-
परबवाडी येथील गणपतीशाळेत गणपती बनवताना परबकाका |
भोगनाथवाडी येथील प्राथमिक शाळेत ध्वजारोहण प्रसंगी ग्रुप लीडर शिवराज देवकर |
कळसुली इंग्लिश स्कूल येथे आयोजित विद्यालयीन भजन स्पर्धा |
कळसुली इंग्लिश स्कुल येथे ग्रामीण क्रुषी कार्यानुभव अंतर्गत क्रुषी पर्यटन विषयावरील मार्गदर्शन कार्यक्रम |
कळसुली येथील भातशेती व नारळीच्या बागा |
भातशेतीमध्ये मशागत करताना शेतकरी |
कळसुली हायस्कूल येथे शिक्षक व संचालक मंडळी सोबत आम्ही ११ सहकारी |
कळसुली इंग्लिश स्कुल,कळसुली |